परिवर्तनात सनदी लेखापालांची निर्णायक भूमिका

परिवर्तनात सनदी लेखापालांची निर्णायक भूमिका

Published on

पुणे, ता. १६ ः ‘‘भारत ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटरचे (जीसीसी) जागतिक केंद्र बनत असून या परिवर्तनाच्या प्रक्रियेत सनदी लेखापाल (सीए) निर्णायक भूमिका बजावतील. ‘जीसीसी’च्या माध्यमातून भारतीय सेवा क्षेत्राला जागतिक स्तरावर मोठ्या संधी उपलब्ध होत आहेत,’’ असे मत अ‍ॅक्सेंचरचे व्यवस्थापकीय संचालक निर्मल जैन यांनी केले.
‘ग्रुप टू प्रमोट इंडिया अ‍ॅज अकाउंटिंग जीसीसीज’ (डीआयटीएस व वर्ल्ड ट्रेंड ऑर्गनायझेशन संचालनालय) आणि ‘दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया’ (आयसीएआय) पुणे शाखेतर्फे ‘लेजर ते जागतिक नेतृत्व ः ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटरला आकार देणारे सीए’ या संकल्पनेवर आयोजित दोन दिवसीय चौथ्या जीसीसी समिटच्या उद्‍घाटन सोहळ्यात निर्मल जैन बोलत होते.
ग्रुपचे संयोजक संजीब संघी, सहसंयोजक अभय छाजेड, ‘आयसीएआय’चे माजी अध्यक्ष अनिकेत तलाठी, समिटचे संचालक केंद्रीय समितीचे सदस्य चंद्रशेखर चितळे, प्रमोद जैन, डॉ. एस. बी. झावरे, उमेश शर्मा, दुर्गेश काबरा, आयसीएआय पुणेचे अध्यक्ष सचिन मिणीयार, सचिव नीलेश येवलेकर, उपाध्यक्ष प्रणव आपटे आणि खजिनदार नेहा फडके यावेळी उपस्थित होते. चंद्रशेखर चितळे यांच्या कल्पनेतून साकार झालेल्या ‘पुणे पंचायत’ या उपक्रमाचे, तसेच आयसीएआय पुणेच्या अद्ययावत संकेस्थळाचे यावेळी लोकार्पण झाले.
निर्मल जैन म्हणाले, ‘‘जीसीसी आता केवळ बॅक ऑफिसपुरते मर्यादित राहिलेले नाही. आज त्या नवोन्मेष, रणनीती, निर्णयप्रक्रिया आणि मूल्यनिर्मितीच्या जागतिक केंद्रांमध्ये रूपांतरित होत आहेत. डेटा एनालिटिक्स, तंत्रज्ञान, जोखमीचे व्यवस्थापन आणि जागतिक वित्तीय कार्यपद्धती यांसारख्या महत्त्वपूर्ण प्रक्रिया आता मोठ्या प्रमाणात सनदी लेखापालांच्या नेतृत्वाखाली होत आहेत.’’
दोन दिवसीय या समिटमध्ये ‘जीसीसी’मधील उदयोन्मुख ट्रेंड्स, डिजिटल फायनान्स, टॅलेंट ट्रान्सफॉर्मेशन, ऑपरेशनल एक्सलन्स, गव्हर्नन्स फ्रेमवर्क आणि भावी नेतृत्व या विषयांवर सत्रे होणार आहेत. सचिन मिणीयार यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. नेहा फडके यांनी सूत्रसंचालन केले. नीलेश येवलेकर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com