अशास्त्रीय सल्ल्यांमुळे शरीराचे नुकसान
पुणे, ता. १७ ः ‘तुम्हाला वजन कमी करायचेय? तर अमुक खा किंवा खाऊ नका, तंदुरुस्त राहायचेय? तर हा काढा प्या, कमी कॅलरी असलेले हे पदार्थ खा’ असा सल्ला मोबाईलच्या माध्यमातून समाजमाध्यमांवर देणारे आरोग्यतज्ज्ञ उदंड झाले आहेत. आपण सुदृढ व निरोगी राहावे या समजुतीने त्या ‘हेल्थ ट्रेंड्स’वर विश्वास ठेवून अनेकजण आपली शरीरयष्टी कशी आहे, त्याला काय योग्य आहे किंवा नाही याचा तज्ज्ञांकडून सल्ला न घेता सरसकटपणे अंमलबजावणी करतात. पण हे समाजमाध्यमांवरील अशा अशास्त्रीय ‘हेल्थ ट्रेंड’चे प्रयोग शरीराचे नुकसान करू शकतात. इतकेच नव्हे तर कर्करोगग्रस्तांसाठी ते अधिक त्रासदायक ठरू शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
याबाबत जनरल फिजिशियन डॉ. आदित्य देशमुख म्हणाले, ‘‘समाज माध्यमांवरील या ‘हेल्थ ट्रेंड्स’वर नागरिकांचा विश्वास बसत असून त्याचे आकर्षण (क्रेझ) वाढत आहे. अत्यंत कमी कॅलरीचे डाएट किंवा डिटॉक्स ड्रिंक्सचा अतिरेक केल्यास शरीरातील नैसर्गिक पोषकता खालावते. अशा आहारामुळे यकृत व मूत्रपिंडांवर ताण येतो. जर डाएट किंवा डिटॅाक्स करायचे असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या. त्यांच्या सल्ल्याने आवश्यक त्या आरोग्य तपासण्या करून मगच योग्य तो पर्याय निवडा. प्रत्येक व्यक्तीचे शरीर आणि भूक वेगवेगळी असते. त्यासाठी तपासणी महत्त्वाची आहे’’
हे लक्षात ठेवा
- वजन आटोक्यात राहावे, सडसडीत बांधा असावा याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता वाढत आहे. त्यासाठी इंटरनेटवर माहिती घेतली जाते
- हीच गरज ओळखून समाजमाध्यमावर शरीर सुदृढ ठेवण्यासाठी काय काळजी घ्यावी याबाबत कोणतेही वैद्यकीय शिक्षण न घेतलेले तथाकथित ‘डायटगुरू’ तयार झाले आहेत
- त्यांच्याकडून डिटॉक्स ड्रिंक (शरीरातील अनावश्यक घटक बाहेर टाकायला मदत करणारे घरगुती पेय), क्रॅश डायट (वजन लवकर कमी व्हावे यासाठीचा कमी कॅलरीचा आहार व कमी खाण्याचा सल्ला), फॅट बर्निंग स्मूदी (कमी कॅलरी, जास्त फायबर व प्रोटिन असलेले पेय) यासारखे उपाय सुचवले जातात
- त्याचा सरसकट अवलंब केल्याने चांगला परिणाम होण्याऐवजी दुष्परिणामदेखील होऊ शकतो
तपासण्याच्या माध्यमातून शरीराला कशाची कमतरता आहे, काय लक्षण काय आहेत हे कळते. आहाराचे बदल वैद्यकीय सल्ल्याशिवाय केल्यास हार्मोनल समस्या, थकवा, त्वचेचे विकार व गंभीर आजारास कारणीभूत ठरतात. यामुळे भविष्यातील गुंतागुंत टाळणे शक्य होईल.
- डॉ. आदित्य देशमुख, जनरल फिजिशियन
समाज माध्यमावर चुकीचे आणि असुरक्षित आरोग्य सल्ले पाळल्याने कर्करोगासारख्या गंभीर आजारांची लक्षणेही दुर्लक्षित केली जाऊ शकतात. हे ट्रेंड्स वैज्ञानिक पुराव्यावर आधारित नसतात. बाजारात मिळणाऱ्या काही ‘डिटॉक्स ड्रिंक्स’, ‘हर्बल पावडर’, ‘कृत्रिम रसायन’ यामध्ये हार्मोन्सवर परिणाम करणारे घटक आढळतात व हे घटक शरीरात साठून थायरॉईड, स्तन, पचनसंस्थेचा कर्करोग वाढवू शकतात. असे ट्रेंड्स पाळल्यामुळे कर्करोगग्रस्तांसाठी ते हानिकारक ठरू शकतात. त्याआधी आहारतज्ज्ञ, फिटनेस तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
- डॉ. अभिषेक पुरकायस्थ, कर्करोगतज्ज्ञ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

