बचत गटांचे हक्काचे व्यासपीठ : भीमथडी जत्रा

बचत गटांचे हक्काचे व्यासपीठ : भीमथडी जत्रा

Published on

ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती, भीमथडी फाउंडेशन व महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या वतीने भीमथडी जत्रेचे २० ते २५ डिसेंबर दरम्यान सकाळी १० ते रात्री १० या वेळेत सिंचननगर येथील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजन केले आहे. राज्यातील ग्रामीण महिला बचत गटांच्या उत्पादनांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणाऱ्या सुनंदा पवार यांच्या संकल्पनेतील भीमथडी जत्रेने १८ वर्षे यशस्वी वाटचाल केली. त्यानिमित्त....
- सचिन खलाटे,
प्रकल्प अधिकारी, भीमथडी जत्रा, शारदानगर

बारामतीतील ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट ही संस्था पाच दशके शेती, शिक्षण, प्रशिक्षण, पाणी अशा अनेक सामाजिक उपक्रमांत काम करत आहे. याचाच एक भाग म्हणजे भीमथडी जत्रा हा उपक्रम आहे. महिलांचा आत्मविश्वास, जिद्द, चिकाटीतून हजारो महिला ‘भीमथडी’च्या माध्यमातून राज्याच्या कानाकोपऱ्यात आपला यशस्वी व्यवसाय करत आर्थिक सक्षम झाल्या आहेत. सुनंदा पवार यांच्या सर्व उपक्रमांमध्ये ‘स्त्री’ ही केंद्रस्थानी आहे. सामाजिक, कौटुंबिक बदल आवश्यक असेल तर स्त्री बदलली पाहिजे. शिक्षित झाली पाहिजे, असा अप्पासाहेब पवार यांचा वारसा सुनंदा पवार यांनी पुढे चालू ठेवला आहे.
संस्थेच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात, वाडीवस्तीवर फिरताना त्यांना महिलांचे अनेक सामाजिक प्रश्न जाणून घ्यायला आवडत असायचे. याचदरम्यान बचत गटातील महिलांना वेगवेगळ्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी उत्पादने बनवायला शिकविली, महिला आर्थिक साक्षर होण्यासाठी कामाला सुरुवात केली. महिला उत्पादने बनवू लागल्या; मात्र बाजारपेठ महत्त्वाची आहे हे लक्षात आले आणि याच विचारातून महिलांना आर्थिक सक्षम बनविणारा उपक्रम जन्माला आला त्याचे नाव म्हणजे भीमथडी जत्रा.
शैक्षणिक अभ्यासक्रमांबरोबरच स्त्रियांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला पूरक ठरणारे, उद्योजकतेला वाव देणारे उपक्रम शारदानगर संकुलात आयोजित केले जात आहेत. यासाठी शारदा महिला संघ कार्यान्वित केला गेला. अनेक कुटुंबांतील महिला वाळवणं, लोणची-मसाले अशा गोष्टी तयार करून घरगुती पातळीवर ते विकत असतात. काही महिलांना कलाकुसरीच्या वस्तूही उत्तम करता यायच्या. पण बाजारपेठ मिळत नव्हती. त्यातून प्रदर्शनाची कल्पना पुढे आली आणि त्यातून राष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळवलेला उपक्रम भीमथडी जत्रा सुरू झाली.
सुनंदा पवार यांनी जत्रा भरवायचे निश्चित झाल्यावर राज्याच्या विविध भागांतील बचतगटांशी संपर्क साधला. असंख्य विषयांचे प्रशिक्षण देण्याचे काम संस्थेत सुरू झाले. भीमथडी जत्रा पुण्यात भरविण्याचे निश्चित झाले. ग्रामीण जीवनाचा मजेदार अनुभव देणारे, महाराष्ट्राची कला व संस्कृती जपणारी, गावरान जेवणाची लज्जत वाढविणारे एक मोठ प्रदर्शन म्हणजे भीमथडी जत्रा २००६ मध्ये सुरू झाली.
बारामतीजवळील शारदानगर या उपक्रमाचा केंद्रबिंदू होता. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि त्यांचे ज्येष्ठ बंधू कृषीतज्ज्ञ
अप्पासाहेब पवार यांच्या परिश्रमातून उभा राहिलेला हा परिसर विधायक उपक्रमांमुळे प्रसिद्ध होता. तीच भीमथडी जत्रेचीही जन्मभूमी होती. भीमथडी जत्रेच्या पहिल्या वर्षीचा ३० लाख रुपये असणारा खर्च आज दोन कोटींच्या घरात गेला आहे. पहिल्या वर्षी तीन दिवसांची जत्रा दुसऱ्यावर्षी चार दिवसांची झाली. २००९-२०१० पासून पुढे पाच दिवस भरवली जाऊ लागली. ग्राहकांची संख्याही साडेचार लाखांच्या पुढे गेली अन् उत्पन्नही पाच कोटींच्या घरात गेले. लोककलांचा अंतर्भाव वाढला. बारा बलुतेदार, टोपल्या विणणारे कारागीर सहभागी झाले. जत्रेत विटीदांडू, लगोरी, काचाकवड्या, सागरगोटे असे खेळ खेळले जात आहेत. महाराष्ट्रातील बचतगटांच्या कामाला संघटित चळवळीचे स्वरूप देण्याचे काम भीमथडी जत्रेने केले आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये ‘पवनाथडी’ जत्रा भरते. जळगाव-पाचोऱ्यात जत्रा भरते, हे भीमथडीचे फलितच आहे.

भीमथडी जत्रेची वैशिष्ट्ये..
१. महिलांना स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी उद्युक्त आणि प्रशिक्षित करणे
२. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यवसाय करण्याच्या दृष्टीने महिलांना सक्षम बनवणे
३. महिला उद्योजकांचे जाळे तयार करणे
४. पारंपरिक आणि सांस्कृतिक प्रगतीसाठी क्रियाशील व्यासपीठ निर्माण करणे

भीमथडी जत्रेबाबत....
२६
- आजपर्यंत सहभागी जिल्हे

१७
- सहभागी राज्य

२,९६६
- सहभागी महिला बचत गट व उद्योजिका

३७ कोटी ६३ लाख रुपये
- आर्थिक उलाढाल

२९ लाख ६० हजार रुपये
- सहभागी ग्राहक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com