आचारसंहिता उल्लंघनाकडे दुर्लक्ष
पुणे, ता. १८ ः महापालिका निवडणुकीसाठी शहरामध्ये आचारसंहिता लागू झालेली असतानाही इच्छुक उमेदवारांकडून ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शन, महिला, तरुण-तरुणींसाठी हेलिकॉप्टर राईड, महिलांसाठी विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम, त्याद्वारे साड्या व अन्य वस्तूंचे वाटप यांसारखे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. विशेषतः संबंधित कार्यक्रमांची जाहिरात इच्छुक उमेदवारांकडून आपापल्या प्रभागांमध्ये केली जात आहे. महापालिका आयुक्तांनी आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश दिले, मात्र यासंबंधी नागरिकांनी तक्रार केल्यानंतरच महापालिकेच्या निवडणूक विभागाकडून कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
महापालिका निवडणूक जाहीर होण्यापूर्वीपासूनच शहरातील प्रत्येक प्रभागांमध्ये इच्छुक उमेदवारांकडून मतदारांना आकर्षित करणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. विशेषतः निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतरही इच्छुक उमेदवार किंवा त्यांच्या पक्षांकडून महापालिकेच्या निवडणूक विभागाकडून संबंधित कार्यक्रमासाठी परवानगी घेणे बंधनकारक आहे, मात्र आत्तापर्यंत त्यांच्याकडून कुठलीही परवानगी घेण्यात आलेली नाही. उमेदवारांकडून आचारसंहितेचे सर्रासपणे उल्लंघन केले जात असतानाही निवडणूक विभागाकडून अद्याप तरी बघ्याची भूमिका घेतली जात असल्याची सद्यःस्थिती आहे.
महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी निवडणुकीच्या काळात मतदारांना आकर्षित करण्याचे काम कोणी केल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा दिला होता. त्यानंतर आदर्श आचारसंहितेचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचेही आदेश महापालिकेच्या निवडणूक विभागास दिले आहेत. यासंबंधीच्या तक्रारी महापालिकेच्या आचारसंहिता कक्षाकडे येणे आवश्यक आहे. त्यानंतरच महापालिकेचा निवडणूक विभाग संबंधितांवर कारवाई करणार आहे. आत्तापर्यंत एकही तक्रार महापालिकेकडे आलेली नाही, त्यामुळे महापालिकेने कारवाई केली नसल्याचे महापालिकेच्या निवडणूक विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
उमेदवारांकडून ‘होऊ द्या खर्च’
- शहराच्या मध्यवर्ती भागांसह उपनगरांमधील विविध प्रभागांमध्ये इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी
- प्रमुख राजकीय पक्षांकडे एका प्रभागामध्ये १०० पेक्षा जास्त इच्छुकांकडून अर्ज
- याबरोबरच अपक्ष निवडणूक लढण्याच्या उद्देशानेही अनेकांकडून विविध कार्यक्रम घेण्यास सुरुवात
- रस्त्यावरील पथदिवे, बसथांबे, उड्डाणपूल, वृक्ष, चौकांमधील सिग्नल यंत्रणा अशा ठिकठिकाणी संबंधित कार्यक्रमांचे बेकायदा फलक, बॅनर
- इच्छुक उमेदवारांकडून खेळ पैठणीचा, होम मिनिस्टर, लकी ड्रॉ यांसारखे कार्यक्रम
- अष्टविनायक, भीमाशंकर, कोल्हापूर, नाशिक, तुळजापूर, पंढरपूर, उज्जैन-महाकाल अशा ठिकाणी देवदर्शनाची व्यवस्था
- तरुणांसाठी महाबळेश्वर, पाचगणी, लोणावळा अशा थंड हवेच्या ठिकाणी सहली
- काही इच्छुक उमेदवारांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारच्या भेटवस्तू
- काही उमेदवारांकडून थेट हेलिकॉप्टर राईडची व्यवस्था करून सर्वसामान्य नागरिकांचे हेलिकॉप्टरमध्ये बसविण्याचे स्वप्न पूर्ण केले जात आहे
महापालिकेने आचारसंहिता कक्ष स्थापन केला आहे. या कक्षाकडे आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी नागरिकांच्या तक्रार येतात. त्या आल्यानंतरच पुढील कारवाई होऊ शकेल. अद्याप एकही तक्रार प्राप्त झालेली नाही.
- प्रसाद काटकर, उपायुक्त, निवडणूक विभाग, पुणे महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

