‘पेशवे सृष्टी’ आठ वर्षांपासून रखडली

‘पेशवे सृष्टी’ आठ वर्षांपासून रखडली

Published on

पुणे, ता. १८ : ऐतिहासिक वारशाचे जतन करण्याचा गाजावाजा करत सुरू केलेला पर्वती टेकडीवरील ‘पेशवे सृष्टी’ प्रकल्प आठ वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत आहे. लाखो रुपयांचा निधी खर्च होऊनही काम ठप्प, परिसराची दुर्दशा आणि जबाबदारीवर मौन या कारणांमुळे महापालिकेच्या पुरातत्व विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शहरातील ऐतिहासिक पर्वती टेकडीवर महापालिकेच्या हेरिटेज विभागामार्फत पेशवे कालखंडाचा इतिहास, संस्कृती आणि वास्तुकलेचे दर्शन घडविण्यासाठी ‘पेशवे सृष्टी’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला होता. संकल्पनेपासून रचना तयार करण्यापर्यंत ज्येष्ठ इतिहास संशोधक व अभ्यासकांचे मार्गदर्शन घेण्यात आले. आकर्षक पर्यटनस्थळ म्हणून हे काम घाईघाईने सुरू झाले; मात्र त्यानंतर प्रकल्पाला अक्षरशः ब्रेक लागला.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, आजही बांधकाम साहित्य, भिंती व रचना अर्धवट अवस्थेत पडून आहे. परिसरात गवत, झुडपे व कचरा वाढला असून, सुरुवातीची उत्सुकता मावळली आहे. आठ वर्षांच्या विलंबामुळे परिसर उजाड दिसत असून पर्वती टेकडीच्या नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारशालाच धक्का बसत आहे.
प्रकल्पाचे नियोजन नेमके कुठे अडले, उर्वरित कामासाठी किती निधी लागणार आणि प्रकल्प केव्हा पूर्ण होणार, याबाबत स्पष्ट माहिती मिळत नसल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. प्रकल्पातील विलंबाची चौकशी करून प्रलंबित कामांसाठीची निविदा प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. तसेच, उर्वरित काम युद्धपातळीवर हाती घेण्याची गरज आहे. हे काम पूर्ण झाल्यास पर्वती टेकडीवर पर्यटकांसाठी नवे पर्यटनस्थळ खुले होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

प्रकल्पामुळे काय मिळणार?
- पेशवे कालखंडातील इतिहास, संस्कृती, कारभार व वास्तुकलेचा एकाच ठिकाणी अनुभव
- मुलांसाठी शैक्षणिक उपक्रमांचा नवा पर्याय; इतिहास अभ्यासाला चालना
- पर्यटकांसाठी आकर्षक नवे पर्यटनस्थळ
- पर्वती टेकडीच्या नैसर्गिक सौंदर्यात भर
- वारसा संवर्धनाला गती देणारा प्रकल्प

हे काम गरजेपेक्षा खूपच जास्त लांबले आहे. अपूर्ण कामे वर्षानुवर्षे तशीच पडून असल्याने परिसराचे सौंदर्य कमी झाले असून नागरिकांनाही गैरसोय होत आहे. प्रकल्प वेळेत व योग्य पद्धतीने पूर्ण होणे अत्यावश्यक आहे.
- दिलीप अरुंदेकर, स्थानिक रहिवासी

पेशवे सृष्टीचे काम अंतिम टप्प्यात आहे. काही तांत्रिक कामे अपूर्ण असून आवश्यक निधी उपलब्ध होताच पुढील टप्प्याचे नियोजन तत्काळ सुरू केले जाईल. वारसा संवर्धनाच्या दृष्टीने दर्जेदार अंमलबजावणीवर आमचा भर आहे.
- रोहिदास गव्हाणे, अधीक्षक अभियंता, महापालिका भवन विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com