मानव-वन्यजीव यांच्यातील संघर्ष टाळा ः मेधा कुलकर्णी
पुणे, ता. १८ : महाराष्ट्रात वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या शेतीच्या नुकसानीचा आकडा वर्षाकाठी १० हजार कोटी रुपयांच्या पुढे गेला आहे. वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या जीवितहानीचेही प्रमाण वाढले असून, हा संघर्ष टाळण्यासाठी सरकारने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी गुरुवारी (ता. १८) राज्यसभेत केली. मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्षाचा मुद्दा आक्रमकपणे मांडत, कुलकर्णी यांनी राज्याच्या ग्रामीण भागातील भयावह परिस्थितीकडे केंद्राचे लक्ष वेधले.
प्रा. डॉ. कुलकर्णी म्हणाल्या, ‘‘वन्यप्राण्यांनी २०२३-२४ या वर्षात केलेल्या नुकसानीच्या तब्बल ४० हजार तक्रारींची नोंद झाली आहे. रानगवे, नीलगायी, रानडुक्कर आणि माकडांमुळे पिकांचे नुकसान होत आहे. सरकारने दिलेली नुकसानभरपाई ही शेतकऱ्यांच्या कष्टाच्या तुलनेत अत्यंत तुटपुंजी ठरते. केवळ आर्थिकच नव्हे, तर मानवी जीवितहानीचा आकडाही मोठा असून, गेल्या वर्षभरात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात ५० हून अधिक नागरिकांना जीव गमवावा लागला आहे, तर ३०० हून अधिक जण जखमी झाले आहेत.’’
नाशिक, पुणे, पालघर, ठाणे, सांगली, कोल्हापूर, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये बिबट्यांची दहशत वाढली असून, लोकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. लोकांना गळ्याला काट्यांचे पट्टे (स्पाइक कॉलर) बांधावे लागत आहेत, तर अनेक ठिकाणी शाळा बंद ठेवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे निसर्ग आणि वन्यजीवांच्या संरक्षणासाठी अन्नसाखळी सुरक्षित करण्याचे उपाय करावेत, या भागातून रेल्वे आणि राज्य महामार्गांवर वन्यजीवांसाठी ‘अंडरपास’ आणि ‘ओव्हरपास’ची निर्मिती करावी, जंगलांच्या सीमांवर सौर कुंपण आणि आधुनिक अलार्म सिस्टम बसवावी, नुकसान भरपाईसाठी डिजिटल प्रणालीद्वारे तातडीने मदत द्यावी, वनविभागाची ‘क्विक रिस्पॉन्स टीम’ २४ तास कार्यरत ठेवावी आदी मागण्या कुलकर्णी यांनी केल्या.
-----------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

