शिवसेनेकडून दोन दिवसांत भाजपला प्रस्ताव महापालिका निवडणुकीसाठी जागावाटपावर अद्याप निर्णय नाही
पुणे, ता. १८ ः राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजप-शिवसेना यांची युती कायम ठेवण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिल्यानंतर गुरुवारी पुण्यात भाजप व शिवसेनेच्या नेत्यांमध्ये पहिली बैठक झाली. यामध्ये जागा वाटपाबाबत निर्णय झाला नाही. मात्र, शिवसेनेने जागांबाबत त्यांचा प्रस्ताव दोन दिवसात भाजपकडे देण्याविषयीची चर्चा या बैठकीमध्ये झाली.
महापालिकेच्या विविध प्रकल्पांच्या उद्घाटनासाठी पुण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजप यांची युती कायम राहणार असल्याबद्दल सांगितले होते. त्याचबरोबर महापालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष भाजप-शिवसेनेसमवेत नसेल, हेही स्पष्टपणे सांगितले होते. फडणवीस यांच्या पुणे दौऱ्यानंतर, तसेच लोकसभा व विधानसभेचे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर शहरातील मंत्री, आमदारांनी शिवसेनेसमवेत बैठक घेण्यास प्राधान्य दिले. गुरुवारी भाजप-शिवसेनेची पहिली प्राथमिक बैठक झाली. यावेळी भाजपकडून केंद्रीय नागरी हवाई वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, राज्याच्या नगर विकास खात्याच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ, महापालिका निवडणूक प्रमुख गणेश बिडकर व पक्षाचे शहराध्यक्ष धीरज घाटे, शिवसेनेकडून विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, शिवसेनेचे नेते विजय शिवतारे, शहराध्यक्ष प्रमोद भानगिरे, अजय भोसले आदी उपस्थित होते.
या बैठकीमध्ये महापालिका निवडणुकीबाबात प्राथमिक चर्चा झाली. त्यामध्ये शिवसेनेने त्यांना आवश्यक जागांसंदर्भात दोन दिवसात प्रस्ताव तयार करून देण्याबाबत चर्चा झाली, असे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी सांगितले. मोहोळ म्हणाले, ‘‘भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष युती म्हणूनच निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. दोन्ही पक्षांची आज प्राथमिक बैठक पार पडली. या बैठकीत निवडणूक एक विचाराने लढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रभाग, आकडेवारी आणि दोन्ही पक्षांच्या प्रस्तावावर चर्चा झाली. आणखी एक ते दोन बैठका पार पडल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल.’’
शिवतारे म्हणाले, ‘‘शिवसेना आणि भाजप युती म्हणून महापालिका निवडणुकीला कसे सामोरे जायचे याचे धोरण ठरविले जात आहे. भाजप-शिवसेनेमध्ये विरोध होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही, याचाही विचार केला जाईल.’’
---------------
रवींद्र धंगेकर यांना बैठकीपासून ठेवले दूर
कॉंग्रेस पक्षाला रामराम ठोकून, रवींद्र धंगेकर यांनी शिवसेनेची वाट धरली. एकनाथ शिंदे यांनी धंगेकर यांना शिवसेनेचे पुणे महानगर प्रमुख म्हणून संधी दिली. त्यानंतर धंगेकर यांनी जैन बोर्डिंग प्रकरणामध्ये थेट मुरलीधर मोहोळ यांना लक्ष्य केले. त्यामुळे भाजपमधून धंगेकर यांना विरोध दर्शविला जात होता. त्यानुसार, भाजप-शिवसेनेच्या महापालिका निवडणुकीसंबंधीच्या पहिल्याच बैठकीत धंगेकर यांनी दूर ठेवण्यात आले.
-------------
शिवसेनेकडून मुलाखतींना प्रारंभ
महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेच्यावतीने गुरुवारी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. सारसबागेजवळील शिवसेना भवन येथे मुलाखती झाल्या. यावेळी शिवसेनेचे नेते व आमदार विजय शिवतारे, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर, सहसंपर्कप्रमुख अजय भोसले, जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, शहरप्रमुख प्रमोद भानगिरे आदी यावेळी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

