भाजपमध्ये २१ माजी नगरसेवकांचा प्रवेश 
पुण्यातील पाच तर पिंपरी-चिंचवडमधील १६ जणांचा समावेश

भाजपमध्ये २१ माजी नगरसेवकांचा प्रवेश पुण्यातील पाच तर पिंपरी-चिंचवडमधील १६ जणांचा समावेश

Published on

पुणे/पिंपरी, ता. २० ः पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपने आज राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसला खिंडार पाडले. पुण्यात पाच माजी नगरसेवक तर पिंपरीत १६ माजी नगरसेवकांनी कार्यकर्त्यांसह प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. पिंपरी-चिंचवडमधील प्रवेशामध्ये माजी महापौर, उपमहापौर, माजी स्थायी समिती अध्यक्षांचा समावेश आहे.
महापालिकेची निवडणूक १५ जानेवारीला होणार आहे. त्यासाठी २३ ते ३० डिसेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज भरले जाणार आहेत. पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा सत्ता मिळविण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. त्यात ज्या भागात भाजपचे नगरसेवक निवडून येणार नाहीत, तेथे अन्य पक्षातील सक्षम उमेदवारांना प्रवेश दिले जात आहेत. आज पहिल्या टप्प्यातील प्रवेश झाले आहेत. पुढील चार-पाच दिवसात आणखी काही प्रवेश होणार आहेत.
वडगाव शेरी मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार बापू पठारे यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. त्याचप्रमाणे नारायण गलांडे यांनीही प्रवेश केला आहे. या मतदारसंघात आणखी तीन ते चार प्रवेश पुढच्या काळात होतील.
खडकवासला मतदारसंघातील वारजे-माळवाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी नगरसेवक सचिन दोडके, सायली वांजळे, धनकवडी भागातील बाळासाहेब धनकवडे, वडगाव बुद्रुकमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक विकास दांगट यांनी प्रवेश केला. त्याचप्रमाणे हडपसर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या वैशाली तुपे, विराज तुपे, खंडू लोंढे, पायल तुपे, प्रतिभा चोरगे, शुभांगी होले (शिवरकर), राजेंद्र लोखंडे, बाबा शिवरकर, विद्यानंद बोंद्रे, इंदिरा तुपे, प्रशांत तुपे यांचा प्रवेश झाला आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघात माजी नगरसेविका रोहिणी चिमटे यांचाही आज भाजप प्रवेश झाला आहे. त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे डॉ. अमोल देवडेकर, हडपसरचे प्रशांत तुपे यांच्यासह काँग्रेसच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.
काँग्रेस नेते व माजी मंत्री वसंतराव चव्हाण यांचे पुत्र कणव चव्हाण, मुळशी तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पंचायत समितीचे माजी सभापती भानुदास पानसरे, उपतालुका प्रमुख गणेश पानसरे, कृष्णकुमार पानसरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष आनंद माझिरे, उपाध्यक्ष संतोष पानसरे, सरचिटणीस सुहास पानसरे, उपाध्यक्ष किरण मराठे आदींनी प्रवेश केला. यावेळी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, माजी आमदार संग्राम थोपटे, शंकर जगताप, महेश लांडगे, शहराध्यक्ष धीरज घाटे, शत्रुघ्न काटे, पुणे महापालिका निवडणूक प्रमुख गणेश बिडकर आदी उपस्थित होते.


पिंपरी चिंचवडमध्ये धमाका
पिंपरी चिंचवडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष दिलेले असताना आज भाजपने येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या पक्षांच्या १६ माजी नगरसेवकांसह २३ जणांना पक्षात प्रवेश दिला. त्यामुळे अनेक प्रभागांमधील समीकरणे बदलणार आहेत. लोकसभेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राहिलेले माजी महापौर संजोग वाघेरे यांचा पक्ष प्रवेश झाला. रवी लांडगे यांना पुन्‍हा पक्षात घेण्यास काही नेत्यांचा विरोध होता. मात्र, वरिष्ठ पातळीवरून हस्‍तक्षेप झाल्‍याने त्‍यांचाही प्रवेश निश्‍चित करण्यात आला. प्रभागातील आपली जागा सुरक्षित करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे समीर मासुळकर, जालिंदर शिंदे, तसेच काँग्रेसचे माजी नगरसेवक सदगुरू कदम यांनी पक्ष प्रवेश केल्याची चर्चा आहे.

राष्ट्रवादीचे माजी स्थायी समिती अध्यक्ष प्रशांत शितोळे, उषा वाघेरे, माजी उपमहापौर राजू मिसाळ, प्रभाकर वाघेरे, माजी विरोधी पक्षनेते विनोद नढे, संजय नाना काटे, रवी लांडगे, प्रवीण भालेकर, समीर मासुळकर, प्रसाद शेट्टी, जालिंदर शिंदे, आशा सूर्यवंशी, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी नगरसेवक नवनाथ जगताप, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक अमित गावडे, मीनल यादव, कॉंग्रेसचे माजी नगरसेवक सदगुरू कदम, डॉ. सुहास कांबळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माजी महापौर मंगला कदम यांचे चिरंजीव कुशाग्र कदम, अशोक मगर, नागेश गवळी, सचिन सानप, दादा नरळे यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला.
----

‘‘केंद्र आणि राज्य सरकारमध्ये भाजपची सत्ता असल्याने व सक्षम नेतृत्वामुळे महाराष्ट्राची वेगवान वाटचाल सुरु आहे. हे बघून या सर्वांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या सर्वांना उचित न्याय आणि सन्मान दिला जाईल.
- रवींद्र चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, भाजप


‘‘मतदारांशी संपर्क असणाऱ्या माजी नगरसवेकांचा व अन्य पदाधिकाऱ्यांचा आज भाजपमध्ये प्रवेश केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाच्या राजकारणाच्या विचारधारेला पाठिंबा देत भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे पुण्यात भाजपचे हात मजबूत झाले आहेत.’’
- मुरलीधर मोहोळ, केंद्रीय राज्यमंत्री


‘‘पिंपरी चिंचवड शहर लोकप्रतिनिधींमुळे प्रगतीच्या उंचीवर पोचले. प्रत्येक माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्याने महत्त्वाची भूमिका बजावली. वेळप्रसंगी विरोध बाजूला ठेवून शहर विकासाची भूमिका घेतली. अशीच भूमिका शहर प्रगतिपथावर राहावे, यासाठी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या येथील प्रत्येकाने घेतली आहे. आगामी काळात या सर्वांसह शहर विकासाची घोडदौड कायम ठेवणार आहे.
- शंकर जगताप, आमदार, प्रचार प्रमुख, भाजप, पिंपरी चिंचवड शहर
---
‘‘पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीनिमित्त शहरातील सर्वपक्षीय मातब्बर नेते, पदाधिकारी, माजी नगरसेवक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. देव-देश-धर्म अन्‌ संस्कृतीसाठी कटिबद्ध राहून पिंपरी चिंचवडमध्ये विकासाभिमुख हिंदुत्वाच्या माध्यमातून निर्विवाद विजय मिळविण्याचा निर्धार आम्ही केला आहे.
- महेश लांडगे, आमदार, भोसरी
---
‘‘भाजप हा खऱ्या अर्थाने लोकसेवा करणारा पक्ष आहे. हा पक्ष चोवीस तास जनतेच्या सेवेत असतो. त्यामुळे जनतेचे प्रश्‍न सोडवून न्याय देणारा पक्ष म्हणून हे प्रवेश मोठ्या प्रमाणात होत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावरील वाढता विश्‍वास या प्रवेशाचे द्योतक आहे.
- अमित गोरखे, आमदार, समन्वयक, भाजप, पिंपरी चिंचवड शहर
-----
फोटो ः ७८२२५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com