दोन्ही ‘राष्ट्रवादी’च्या बुरुजांवर भाजपचा हल्ला
ब्रिजमोहन पाटील

दोन्ही ‘राष्ट्रवादी’च्या बुरुजांवर भाजपचा हल्ला ब्रिजमोहन पाटील

Published on

लीड
-----
पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधील माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेससाठी मजबूत असलेल्या प्रभागांच्या बुरुजांवर भाजपने हल्ला चढवला आहे. वडगाव शेरी, खडकवासला या दोन विधानसभा मतदारसंघात भाजपला कायमच मोठे आव्हान राहिलेले आहे. त्यामुळे पुणे महापालिकेच्या निवडणुकीसह २०२९ मध्ये होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांचा विचार करून विरोधीपक्षांना खिंडार पाडण्याचे, निष्ठावंतांना बाजूला सारून तेथे विरोधी पक्षातील उमेदवारांना प्राधान्य देण्याचे भाजपने सुरु केले आहे.
वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. पण त्यासोबत पठारे, मुळीक आणि टिंगरे कुटुंबीयांचा प्रभाव आहे. मुळीक यांच्यासह अनिल टिंगरे भाजपमध्ये असले तरी सुनील टिंगरे व अन्य टिंगरे कुटुंबीय आणि पठारे कुटुंबीय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार बापू पठारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष माजी आमदार सुनील टिंगरे हे भाजपपुढचे आव्हान आहे. पण पठारे यांनी भाजपशी जुळवून घेत, त्यांचा मुलगा सुरेंद्र पठारे यांचा आज भाजपमध्ये प्रवेश घडवून आणला. पुढील काळात पठारे कुटुंबातील अन्य सदस्य ही भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत वडगाव शेरीत भाजपला किमान चार जागांवर फायदा होऊ शकतो. तसेच नारायण गलांडे यांचा २०१७ च्या निवडणुकीत सुमारे १४०० मतांनी पराभव होऊन योगेश मुळीक निवडून आले होते. आता गलांडे यांच्या प्रवेशामुळे मुळीक यांचा मार्ग सुकर झाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी नगरसेवक सचिन दोडके यांनी कायम खडकवासला विधानसभा निवडणुकीत भाजपला आव्हान दिले आहे. २०१९ मध्ये त्यांचा निसटता पराभव झाला तर २०२४ च्या विधानसभेलाही लाडकी बहिण भाजपच्या मदतीला धावून आल्याने दोडकेंचा पराभव झाला. पण संपूर्ण निवडणुकीत त्यांनी भाजपच्या यंत्रणेला हैराण करून टाकले होते. २०१७ च्या निवडणुकीत वारजे माळवाडी प्रभाग क्रमांक ३२ मध्ये भाजपचा मोठा पराभव झाला होता. येथे चारही उमेदवार ‘राष्ट्रवादी’चे निवडून आले होते. तेथे भाजपकडे सक्षम उमेदवार नसल्याने २०२६ च्या निवडणुकीसाठी भाजपने थेट सचिन दोडके आणि सायली वांजळे या दोघांना पक्षात प्रवेश दिला. या प्रवेशासाठी आमदार भीमराव तापकीर यांचा विरोध असला तरी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी भविष्यातील गणिते लक्षात घेऊन हे प्रवेश करून घेतले आहेत. तसेच माजी नगरसेवक विकास दांगट, बाळा धनकवडे यांचाही प्रवेश करून घेतला आहे. दांगट यांच्या प्रवेशामुळे वडगाव बुद्रूक-धायरी प्रभाग क्रमांक ३३ मधील भाजपच्या एका माजी नगरसेवकाचा पत्ता कट होणार हे निश्‍चित झाले आहे. पण दोडके, दांगट प्रवेशामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपमध्ये मोठी रस्सीखेच असेल.
सुस-बाणेर-पाषाण प्रभाग क्रमांक ९ मध्ये अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी भाजपकडे सक्षम उमेदवार नसल्याने राष्ट्रवादीतील रोहिणी चिमटेंचा प्रवेश करून घेतला. त्यामुळे कोथरूड विधानसभेतील एका जागा सुरक्षित केली आहे. हडपसर विधानसभेत भाजपने काही जणांचा प्रवेश करून घेतला पण अजून माजी नगरसेवक त्यांच्या जाळ्यात अडकलेला नाही.

नुकसान भरून काढण्यासाठी प्रवेश
भाजपचे ९७ नगरसेवक निवडून आले होते. त्यातील निष्क्रीय नगरसेवक पुन्हा निवडून येणे शक्य नाही. काही जागा एक हजारांपेक्षा कमी मताने निवडून आलेल्या आहेत. तेथे काहीही होऊ शकते. त्यामुळे नगरसेवकांची संख्या कमी होऊ शकते, हे लक्षात घेऊन भाजपने हे प्रवेश सुरु केले आहेत. तसेच आज ज्यांचे प्रवेश झाले आहेत. तेथे भाजपचा विजय अशक्यच होता, त्यामुळे भाजपने तेथे थेट विजयी होणारे उमेदवारच स्वतःच्या पक्षात घेऊन विरोधकांची कोंडी केली आहे.


रांग मोठी, निष्ठावंत अस्वस्थ
भाजपने आज पाच माजी नगरसेवकांचा पक्षात प्रवेश केला. पुढील टप्प्यात आणखी काही जणांचा प्रवेश होणार आहे. ती रांग मोठी आहे. यात माजी महापौर, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अशी
महत्त्वाची पदे भूषविलेल्‍या माजी नगरसेवकांच्या नावाची चर्चा सुरु आहे. पण पक्षातील निष्ठावंत कार्यकर्ते यामुळे अस्वस्थ झाले आहेत. गेली अनेक वर्ष प्रामाणिकपणे काम केले. लोकसभा, विधानसभेला ज्या प्रभागात वाढीव मते मिळवून दिली, त्याच कार्यकर्त्यांची उमेदवारी पक्ष कापणार का? असे कार्यकर्ते खासगीत बोलत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com