हिवाळ्यात पचनसंस्थेच्या समस्यांवर अशी करा मात
पुणे, ता. २३ : हिवाळ्यात पचनसंस्थेच्या समस्यांनी डोके वर काढले जाते; त्याचबरोबर पोट जड वाटणे, तहान कमी लागणे, पोट साफ न होणे, त्याची वेळ अनियमित होणे, बद्धकोष्ठता वाढणे ही लक्षणे त्यापैकी काही आहेत. मात्र, पोटविकारतज्ज्ञांच्या मते ऋतूमुळे होणारा हा बदल आहे. यामध्ये थंड हवामानामुळे तहान कमी लागणे, आतड्यांमधील पाण्याची कमतरता, शारीरिक हालचाल कमी होणे आणि आहारात तंतुमय घटक (फायबर) कमी झाल्याने पचनक्रियेचे कार्य मंदावते. त्यामुळे हिवाळ्यात पचनसंस्थेची काळजी घेण्याचे आवाहन पोटविकारतज्ज्ञ करतात.
थंड हवामानामुळे आतड्यांची हालचाल कमी होते. त्याने पचनमार्ग नैसर्गिकरीत्या संथ होतो. अन्न आणि मल आतड्यांमधून हळूहळू पुढे सरकतात. त्यामुळे मलातील पाणी अधिक प्रमाणात शोषले जाते. याचा परिणाम म्हणजे मल कठीण व कोरडा होतो आणि त्यासोबत पोट फुगणे, जडपणा किंवा पोट साफ न झाल्यासारखे वाटणे अशी लक्षणे जाणवतात. हिवाळ्यात नैसर्गिकरीत्या तहानही कमी लागते, त्यामुळे द्रवपदार्थांचे सेवन कमी होते. आतड्यांना पाण्याची गरज असली तरी शरीर नेहमीच त्याचा इशारा देत नाही. ही ‘मूक निर्जलीकरण’ अवस्था बद्धकोष्ठतेचे कारण आहे, अशी माहिती पोटविकारतज्ज्ञ डॉ. आदेशकुमार आंधळे यांनी दिली.
........
जीवनशैलीतील सवयी कारणीभूत
गोडधोड, तळलेले पदार्थ आणि जड जेवण हिवाळ्यात जास्त खाल्ले जाते. मात्र, त्यामध्ये तंतुमय पदार्थ, जसे फळे, भाज्या, धान्य, डाळी, कडधान्ये हे पोटात पाणी धरून ठेवण्यास मदत करतात. ताणतणाव, मद्यपान आणि धूम्रपान यांसारख्या जीवनशैलीतील सवयी पचनक्रिया आणखी मंदावतात. थायरॉइड विकार (हायपोथायरॉइडिज्म), मधुमेह, हार्मोनल असंतुलन किंवा महिलांमधील ‘पीसीओएस’ (हार्मोन्सचे संतुलन बिघडविणारे विकार) यांसारखे आजारही कारणीभूत ठरू शकतात.
........
हिवाळ्यात पाणी पिण्याचे प्रमाण कमी झाल्याने बद्धकोष्ठतेचे रुग्ण वाढले आहेत, तसेच अंगावर पित्त येणे, पोटदुखी या लक्षणांचे रुग्ण वाढले आहेत. हिवाळ्यात चहा पिण्याचे प्रमाण वाढल्याने ॲसिडिटीचेदेखील रुग्ण वाढले आहेत. हिवाळ्यात पुरेसे पाणी प्यायला हवे, तसेच तंतुमय पदार्थांचे सेवन वाढवावे. पोटदुखीसाठी वेदनाशामक गोळ्या घेण्याची आवश्यकता नसते. त्यासाठी पाण्याचे प्रमाण पुरेसे ठेवा किंवा पोटविकारतज्ज्ञांचा सल्ला घ्या.
– डॉ. सुनील पवार, पोटविकारतज्ज्ञ
..........
पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी हे करा
– थंड हवामानात तहान कमी लागत असल्याने जाणीवपूर्वक पुरेसे पाणी प्या
– कोमट पाणी किंवा सूप घेत राहिल्यास आतडे ओलसर राहतात, पचन सुधारते
– संत्री, पेरू, गाजर, पालक, मेथी, मोड आलेली कडधान्ये आणि संपूर्ण धान्यांसारख्या तंतुमय पदार्थांचा आहारात समावेश करा
– काकडी, टोमॅटो, पालेभाज्या आणि लिंबूवर्गीय फळे पचनसंस्थेत ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करतात, त्याने पोट साफ होण्यास मदत होते.
– दर तासाला थोडे चालल्यास आतड्यांची हालचाल वाढते.
– नियमित झोप, जेवणाची ठरावीक वेळ पाळल्यास हिवाळ्यातही पचनक्रिया सुरळीत राहते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

