गुरुनानक दरबारकडून उद्या दुचाकी रॅली

गुरुनानक दरबारकडून उद्या दुचाकी रॅली

Published on

पुणे, ता. २३ ः कॅम्प परिसरातील गुरुद्वारा गुरुनानक दरबार आणि गुरुनानक युथ फाउंडेशनतर्फे श्री गुरू तेगबहादूर आणि शिखांचे दहावे गुरू गोविंदसिंग यांच्या चार साहिबजादांचे (मुलांचे) हौतात्म्य व बलिदानाचे स्मरण करण्यासाठी आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुवारी (ता. २५) दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुद्वारा गुरुनानक दरबारपासून सकाळी ८.३० वाजता दुचाकी रॅलीला सुरू होऊन पुण्यातील अनेक रस्त्यांवरून त्याग, धैर्य, सदाचार आणि धार्मिक स्वातंत्र्याचा संदेश देत पुन्हा गुरुनानक दरबार येथे रॅलीची सांगता होणार आहे. श्री गुरू तेग बहादूर यांच्या अतुलनीय त्यागाबद्दल जनजागृती करण्यासाठी गुरुद्वारा गुरू नानक दरबार यांच्या वतीने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. यामध्ये श्री गुरू तेग बहादूर यांचे जीवन आणि हौतात्म्य अधोरेखित करणारे साहित्य इंग्रजी, हिंदी, मराठी आणि पंजाबी भाषांमध्ये छापण्यात आले आहे. इंग्रजी, हिंदी आणि मराठीमध्ये प्रत्येकी दहा हजार आणि पंजाबीमध्ये पाच हजार प्रती विविध शाळांमध्ये वितरित केल्या जाणार आहेत. याशिवाय शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, शुक्रवारी (ता. २६) रात्री आठ वाजता कॅम्प येथील गुरुद्वारामध्ये चार साहिबजादे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट दाखविण्यात येणार आहे, अशी माहिती गुरुनानक दरबाराचे अध्यक्ष चरणजित सिंह साहनी यांनी दिली.

Marathi News Esakal
www.esakal.com