पार्थ पवारसह संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा

पार्थ पवारसह संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा

Published on

- मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरण
---------------
पुणे/हिंजवडी, ता. २३ : मुंढवा येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार, मुद्रांक शुल्क विभागाचे जिल्हा सहनिबंधक संतोष हिंगणे यांच्यासह संबंधित इतर अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि विजय कुंभार यांनी केली. पोलिसांनी तातडीने कारवाई न केल्यास न्यायालयात दाद मागण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

दमानिया यांनी मंगळवारी (ता. २३) पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊन या प्रकरणातील पुरावे सादर केले. त्यापूर्वी त्यांनी बावधन पोलिस ठाण्यातही निवेदन देत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना दमानिया म्हणाल्या, ‘‘अमेडिया एंटरप्रायझेस एलएलपी या कंपनीचे भागीदार पार्थ पवार २०२१ पासून ही जमीन खरेदी करण्यासाठी प्रयत्न करीत होते. कुलमुखत्यार पत्रावरील प्रत्येक पानावर पार्थ पवार यांचे हस्ताक्षर असून, ही सर्व कागदपत्रे नोटराइज्ड आहेत.’’ या प्रकरणात पोलिसांकडून शीतल तेजवानी, पार्थ पवार यांचे मामेभाऊ दिग्विजय पाटील, तसेच दुय्यम सहनिबंधक रवींद्र तारू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, या प्रकरणात पार्थ पवार, जिल्हा सहनिबंधक संतोष हिंगणे, तसेच उपमुख्यमंत्री पवार यांचे दोन खासगी सचिव आणि विशेष कर्तव्य अधिकारी यांचीही चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी दमानिया यांनी केली.

‘‘या जमीन गैरव्यवहार प्रकरणात मुद्रांक शुल्क बुडविल्याप्रकरणी बावधन पोलिस ठाण्यात जिल्हा सहनिबंधक संतोष हिंगणे यांनी तक्रार दिली होती, परंतु हिंगणे आणि पवार यांचे वकील ॲड. तृप्ता ठाकूर यांच्यात मोबाईलवर संभाषण झाले असून, त्याचे पुरावे उपलब्ध आहेत. पार्थ पवार यांच्या घरी त्या दोघांना बोलावण्यात आले होते, तसेच पवार यांचे दोन खासगी सचिव आणि विशेष कार्याधिकारी हे ठाकूर यांना मदत करीत होते,’’ असा आरोपही दमानिया यांनी केला.

मुंढव्यातील १,८०० कोटी रुपयांच्या जमीन घोटाळा प्रकरणात पोलिसांकडून गांभीर्याने तपास होत नसल्याचा आरोप करत दमानिया म्हणाल्या, ‘‘राज्यात कायदा सर्वांना समान आहे, असे चित्र दिसत नाही. सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या व्यक्तींनी कायद्याचे पालन करणे बंधनकारक आहे. सामान्य नागरिकांना जे नियम लागू होतात, तेच राजकीयदृष्ट्या प्रभावशाली व्यक्तींनाही लागू झाले पाहिजेत.’’

गुन्ह्याचा एकत्रितपणे तपास करावा
विजय कुंभार म्हणाले, ‘‘सध्या बावधन पोलिस ठाण्याकडून या जमीन गैरव्यवहाराशी संबंधित २१ कोटींच्या मुद्रांक शुल्क प्रकरणाचा तपास सुरू आहे, तर पुणे पोलिसांकडून महसूलविषयक तपास केला जात आहे. एकाच प्रकरणात वेगवेगळा तपास न करता एकत्रितपणे झाला पाहिजे.’’ या संदर्भात मुख्यमंत्र्यांनाही निवेदन देण्यात येणार असल्याचे कुंभार यांनी सांगितले.

या प्रकरणात पुणे पोलिसांकडून सर्व बाजूंनी सखोल तपास करण्यात येत आहे. तपासाअंती जे दोषी आढळतील, त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.
- अमितेश कुमार, पोलिस आयुक्त पुणे.
--------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com