पारंपरिक उपचारांना ‘अच्छे दिन’ येण्याची शक्यता आयुष उपचारपद्धतीला शासनाचे प्राधान्य ः ‘डब्ल्यूएचओ’कडून सल्लागार गटाची स्थापना
पुणे, ता. २४ : हजारो वर्षांपूर्वीचा इतिहास असलेल्या व पारंपरिक उपचारांची देणगी लाभलेल्या आयुष उपचारपद्धतीला भारत सरकारने संशोधन करण्यासाठी पावले उचलली आहेत. इतकेच नव्हे तर जागतिक आरोग्य संघटनेनेदेखील (डब्लूएचओ) त्याबाबत अभ्यास करण्यासाठी सल्लागार गटाची स्थापना केली आहे. त्यातून आता पारंपरिक उपचारांना ‘अच्छे दिन’ येण्याची शक्यता निर्माण झाली असून, त्यातून सर्वसमावेशक उपचारपद्धतीचा उदय होईल. त्याचा फायदा उपचार अधिक प्रभावी होण्यास मदत होईल, असे मत ‘आयुष’ क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत.
सध्या आधुनिक वैद्यकशास्त्रावर आधारित उपचारपद्धती व औषधे यांचा वापर उपचारांसाठी केला जातो. त्यावर आधारित हजारो कोटी रुपयांच्या औषधांची बाजारपेठ उभी आहे. मात्र, भारताने पाच हजार वर्षांपूर्वीच जगाला आयुर्वेद उपचारांची देणगी दिलेली आहे. त्या तुलनेत आधुनिक उपचारपद्धती (मॉडर्न मेडिसीन हे अलीकडील दोनशे ते अडीचशे वर्षांपूर्वीचे आहे. आधुनिक संशोधन पद्धतीनुसार पुरावे मर्यादित असल्याने पारंपरिक उपचारांचे शास्त्र ज्यामध्ये आयुर्वेद, योग व निसर्गोपचार, युनानी, सिद्ध, होमिओपॅथी यांचा समावेश आहे. त्याचे आता पुनर्जीवन होण्यास मदत होणार आहे.
आधुनिक वैद्यकशास्त्र प्रगत, संशोधन, डेटा, पुरावे यावर आधारित असले तरी ते देखील परिपूर्ण नाही. काही दीर्घकालीन (क्रॉनिक) आजारांमध्ये पारंपरिक उपचार, लक्षण नियंत्रण, जीवनमान सुधारणा यासाठी उपयुक्त ठरत असल्याचे अनुभव आहेत. तसेच, असे अनेक आजार आहेत, त्यावर पारंपरिक उपचारांचा प्रभाव पडत नाही. मात्र, या दोन्ही उपचारपद्धती हातात हात घालून एकत्र आल्या तर एकमेकांना पूरक असे उपचार देता येतील व मानवी आजारांवर अधिक प्रभावीपणे उपचार करता येईल. त्यासाठी दोन्ही पॅथीचे मिळून पूरक, एकात्मिक उपचारांची गरज असल्याचे मत अष्टांग आयुर्वेदचे माजी प्राचार्य व ज्येष्ठ आयुषतज्ज्ञ डॉ. भीम गायकवाड यांनी व्यक्त केले.
..............
जागतिक आरोग्य संघटनेचा पुढाकार
जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) पारंपरिक, पूरक व एकात्मिक उपचार पद्धती (ट्रॅडिशनल कॉम्प्लीमेंटरी ॲंड इंटेग्रेटिव्ह मेडिसीन) याबाबतचा अभ्यास करण्यासाठी १९ तज्ज्ञांचा धोरणात्मक आणि तांत्रिक सल्लागार गट (स्टॅग) स्थापन केला आहे. पारंपरिक उपचारांना वैज्ञानिक कसोटीवर पडताळून पाहणे हा गट स्थापन करण्याचा उद्देश आहे. आधुनिक वैद्यकीय उपचार पद्धती (अॅलोपॅथी) आणि पारंपरिक किंवा पूरक उपचार पद्धती (आयुर्वेद, योग, ध्यान, युनानी) यांचा शास्त्रशुद्ध आणि रुग्णकेंद्रित पद्धतीने एकत्रित वापर करून एकात्मिक वैद्यकीय उपचारपद्धती विकसित करणे हा आहे.
................
‘‘आधुनिक वैद्यकीय उपचारांत प्रतिजैविकाने (ॲंटीबायोटिक) क्रांती केली व काही आजारांचे निर्मुलन केले. परंतु, जे जीवनशैलीविषयक आजार आहेत, ते दूर करण्यासाठी मर्यादा येत आहेत. जीवनशैलीचे आजार होऊच नयेत, यासाठी पारंपारिक चिकित्सा पद्धती उपयुक्त ठरते. यामध्ये औषधेही मिनरल्सचा मोठ्या प्रमाणात वापर करून ते बनवले जातात. पारंपारिक औषधांमध्ये पूर्वी संशोधनपद्धती मर्यादित होत्या. मात्र, आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून, त्यावर उत्तम संशोधन केले जाऊ शकते. त्यासाठी शासनाचे पाऊल उपयोगी पडेल.
– डॉ. विष्णू जोगळेकर, सल्लागार प्राध्यापक, आरोग्य विज्ञान विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

