संवेदनशील विषयावरचं अस्वस्थ करणारं भाष्य
- महिमा ठोंबरे
डिजिटल युगात माणसाच्या खासगी आयुष्यावर सर्वांत खोलवर परिणाम करणाऱ्या विषयांपैकी एक म्हणजे पोर्नोग्राफी. अवघड विषय म्हणून जाहीरपणे संवाद कितीही टाळला तरी तंत्रज्ञानाच्या वाढत्या आक्रमणात या आव्हानाचं स्वरूप अधिकच गंभीर होत आहे. किंबहुना कितीही नाकारलं तरी प्रत्येकाच्या घराच्या उंबरठ्यावर हे आव्हान पोहोचलं आहे. महाराष्ट्र कल्चरल सेंटर निर्मित ‘पॉपकॉर्न’ नाटक हे संवेदनशील वास्तव प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न करत अस्वस्थ करणारा नाट्यानुभव देतं.
उच्च मध्यमवर्गीय, किंबहुना काहीशा श्रीमंत अशा खाडिलकर कुटुंबाची ही गोष्ट. खाडिलकर पती-पत्नी हे ऑनलाइन वधू-वर सूचक केंद्राचा व्यवसाय यशस्वीपणे करत आहेत. करणने, त्यांच्या मुलाने व्यवसाय पुढे न्यावा, अशी दोघांची विशेषतः वडिलांची इच्छा असली तरी मुलाला मात्र त्यात रस नाही. आपल्या मनाप्रमाणे करिअर करण्याच्या प्रयत्नात असलेला करण झटपट पैसे कमावण्याच्या नादात पोर्नोग्राफिक व्हिडिओच्या चित्रीकरणात सामील होतो. इतकंच नाही तर हे चित्रीकरण तो आपल्या घरात करतो.
योगायोगाने ही गोष्ट करणच्या वडिलांना समजते. अर्थातच त्यांचा प्रचंड संताप होतो. आधीच ताणलेल्या वडील-मुलाच्या नात्यात या घटनेने अधिकच तणाव निर्माण होतो. करणचा मित्र जतिनच्या समजावण्यामुळे या प्रकरणावर पडदा पडतो आणि यापुढे अशा चुका न करण्याचं आश्वासन करण देतो. मात्र ही ‘भानगड’ तेवढ्यावर निस्तारत नाही. काही कारणांनी त्याचा बभ्रा होतो. या संपूर्ण प्रकरणाची कल्पना नसलेली करणची आई आणि त्याची गर्लफ्रेंड, दोघींनाही या प्रकरणाचा मानसिक धक्का बसतो. शिवाय खाडिलकर कुटुंबाची प्रतिमा, प्रतिष्ठा सारीच पणाला लागते. या कथासूत्राचे अनेक पदर पुढे उलगडतात, ते प्रत्यक्ष नाटकात पाहणंच इष्ट.
नाटकाचा पहिला अंक हा वेगवान घटनांमधून पुढे जातो; तर दुसऱ्या अंकात मात्र या मूळ विषयाचे विविधांगी पैलू उलगडत जातात. नात्यांमधील गुंतागुंतीच्या पार्श्वभूमीवर पोर्नोग्राफीसारखा अवघड विषय लेखक-दिग्दर्शक डॉ. विवेक बेळे यांनी सफाईने हाताळला आहे. मूळ विषयावर थेट भाष्य करताना तद्अनुषंगिक सामाजिक वास्तवदेखील ते अतिशय सूचकतेने मांडतात. दुसऱ्या अंकात कथेला काही अनपेक्षित वळणं देऊन त्यांनी या विषयाची प्रत्येक बाजू समोर आणली आहे. कोठेही थेट उत्तरं न देता विचारप्रवृत्त करणारी त्यांची मांडणी आहे. मात्र करणच्या वडिलांनी नजरेआड केलेल्या जतिनच्या चुका, एवढं मोठं संकट आलेलं असतानाही काटदरेचा शोध न घेणं किंवा अशा गोष्टी ‘मॅनेज’ करण्यासाठी प्रयत्नच न करणं, या काही बाबी तार्किकदृष्ट्या खटकतात.
करण, त्याचा मित्र जतिन आणि करणचे वडील या तीन व्यक्तिरेखांभोवती नाटकाचे कथानक मुख्यतः फिरते. करणच्या वडिलांची तगमग, प्रसंगी हतबलता, मुलाच्या नात्यात आलेला दुरावा, अवघडलेपणा आणि त्यातून डोकावणारा हळवेपणा, असा सारा आलेख आनंद इंगळे यांनी कमालीच्या ताकदीने साकारला आहे. विषयाचा मुख्य गाभा त्यांच्या तोंडून आल्यामुळे अधिक ‘सच्चा’ वाटतो. अंबर गणपुले यांनी करणची तडफड, भरकटलेपणा नेमका दर्शवला आहे. जतिनच्या भूमिकेला श्रीकर पित्रे यांनी न्याय दिला आहे.
कथेला कलाटणी देणाऱ्या घटनेपूर्वीची आई आणि घटनेनंतरची आई, असे दोन्ही कंगोरे गायत्री तांबे-देशपांडे यांनी समर्थपणे रंगवले आहेत. गौरी देशपांडे यांनी रंगमंचावरच्या आपल्या सहज वावरातून डॉक्ट अंजलीचं पात्र जिवंत केलं आहे. नाटकात या दोन्ही पात्रांना मिळणारा वेळ कमी असला तरी या दोन्ही अभिनेत्रींचा वावर स्मरणात राहतो. करणच्या वडिलांचा वकील मित्र म्हणून नितीन अग्निहोत्री, पत्रकार म्हणून अर्णव वारियर आणि काटदरेच्या भूमिकेत सचिन जोशी यांनी आपलं काम चोख केलं आहे. संगीत, प्रकाश, वेशभूषा या तांत्रिक बाजूंसह नेपथ्यातील नेमके तपशील नाटकाला उठाव देतात. एका अवघड, एरवी टाळल्या जाणाऱ्या विषयाला खुलेपणानं भिडणाऱ्या या नाटकामुळे प्रत्येक कुटुंबात आवश्यक असणारा संवाद सुरू होईल, अशी आशा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

