उद्यमगौरव, सेवागौरव पुरस्कार जाहीर
पुणे, ता. ९ : शेठ चिमणलाल गोविंददास मेमोरिअल ट्रस्टतर्फे देण्यात येणारे उद्यमगौरव आणि सेवागौरव पुरस्कार जाहीर झाले आहेत. उद्योग आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना हे पुरस्कार सन्मानित करण्यात येते.
रविवारी (ता. १३) सकाळी १० वाजता कोथरूडमधील मयूर कॉलनीतील बालशिक्षण मंदिर शाळेच्या सभागृहात हा पुरस्कार सोहळा होणार आहे.
‘स्व. दिवंगत चिमणलाल गोविंददास उद्यमगौरव पुरस्कार ॲटम्बर्ग टेक्नॉलॉजीज’ हा पुरस्कार उद्योग क्षेत्रातील मुंबईचे मनोज मीना यांना, तर व्यापार क्षेत्रात सुरेंद्र गाडवे आणि अनिल गाडवे यांच्या ‘काका हलवाई’ला प्रदान करण्यात येणार आहे. ‘स्व. चिमणलाल गोविंददास सेवागौरव पुरस्कार’ सामाजिक क्षेत्रात कर्जत (जि. रायगड) येथील शबरी सेवा समितीचे प्रमोद करंदीकर यांना, तर आरोग्य क्षेत्रात किनवट (जि. नांदेड) येथील डॉ. अशोक बेलखोडे यांना देण्यात येणार आहे. प्रत्येकी रुपये ५० हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष मोहन गुजराथी यांनी बुधवारी (ता. ९) आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या वेळी जयंत गुजराथी आणि डॉ. नलिनी गुजराथी उपस्थित होते.
या वेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेडचे (एमकेसीएल) विवेक सावंत उपस्थित राहणार आहेत. ‘कृत्रिम बुद्धिमत्तेचे दैनंदिन जीवनातील उपयोग’ या विषयावर ते मार्गदर्शन करणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.