हिंजवडी ‘आयटी’ला लालफितीचा ‘झटका’
पुणे, ता. १४ : हिंजवडीमध्ये महापारेषण कंपनीकडून ४०० केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्राची उभारणी पाच-सहा वर्षांपूर्वीच झाली आहे. मात्र, त्याला ४०० केव्ही टॉवर लाइनने जोडले नसल्याने उपकेंद्र अद्यापही कार्यान्वित झालेले नाही. तसेच, पुणे व पिंपरी-चिंचवडसाठी मंजूर आठ अतिउच्चदाब केंद्रांना मंजुरी मिळाली असून, जागाही उपलब्ध आहे. मात्र, त्यातील एकाही उपकेंद्राचे काम सुरू न झाल्याने आयटी उद्योगाला फटका बसत आहे. याला राजकीय आणि प्रशासकीय उदासीनता कारणीभूत असल्याचे दिसून आले.
हिंजवडी व पेगासस २२० केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्राला येणाऱ्या अतिउच्चदाब वाहिनीत ६ जुलै रोजी दुपारी बिघाड झाला आणि विजेची आपत्कालीन परिस्थिती उद्भवली होती. या उपकेंद्रांतून निघणाऱ्या २५ उच्चदाब वाहिन्यांवरील ५२ हजार लघुदाब ग्राहक, इन्फोसिस व नेक्स्ट्रा या दोन अतिउच्चदाब ग्राहकांसह ९१ उच्चदाब ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. दुरुस्तीस तीन दिवस लागले. त्याचे पडसाद राज्याच्या विधिमंडळातही उमटले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घेत पाहणी करून बैठका घेतल्या. मात्र, वाहतूक कोंडी, अनधिकृत बांधकामे वगळता वीजपुरवठा खंडित होण्यामागची मूळ कारणे आणि त्यावरील पर्यायांवर कुठेही चर्चा झाल्याचे दिसून आले नाही. मात्र ‘सकाळ’ने यामागील कारणांचा शोध घेतल्यानंतर राजकीय आणि प्रशासकीय उदासीनता हेच यामागचे प्रमुख कारण असल्याचे दिसून आले.
काय आहेत कारणे?
१) पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यात प्रामुख्याने मध्यम व मोठ्या उद्योग क्षेत्रासंह वाणिज्यिक संकुल असा सुमारे ८० लाख लोकसंख्येचा परिसर आहे, या भागातील उद्योगांसह इतर ग्राहकांचा वीजपुरवठा कळीचा मुद्दा
२) ज्या गतीने जिल्ह्यात उद्योगांचा विकास झाला, त्या गतीने महापारेषणच्या पायाभूत यंत्रणेचा विकास झालेला नाही
३) अतिउच्च दाबाचे अनेक उपकेंद्र, टॉवर लाइन्सचे सक्षमीकरण व इतर कामे कित्येक वर्षांपासून रखडले
४) महापारेषण यंत्रणेवर मोठा ताण येऊन अतिउच्चदाब उपकेंद्र अतिभारित झाले आहेत
वीजवाहिन्या टाकण्यास विरोध
महावितरणच्या ३३/२२ किंवा ३३/११ केव्ही उपकेंद्रामध्ये किंवा वाहिन्यांमध्ये बिघाड झाल्यास पर्यायी व्यवस्थेतून तत्काळ वीजपुरवठा करता येतो. मात्र, महापारेषणच्या अतिउच्चदाब १३२ किंवा २२० किंवा ४०० केव्ही उपकेंद्रांमध्ये किंवा वाहिन्यांमध्ये बिघाड झाल्यास वितरणाच्या अनेक उपकेंद्रांचा वीजपुरवठा खंडित होतो. महापारेषणच्या अतिभारित यंत्रणेमुळे विजेचे भारव्यवस्थापन शक्य होत नाही. त्यावर उपाययोजना म्हणून आयटी उद्योगाचा कणा असलेल्या हिंजवडीमध्ये महापारेषणकडून ४०० केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्राची उभारणी पाच-सहा वर्षांपूर्वीच केली; परंतु त्याला ४०० केव्ही टॉवर लाइनने जोडले नसल्याने उपकेंद्र अद्याप कार्यान्वित झालेले नाही. जेजुरी आणि लोणीकंद येथील केंद्रातून या लाइन येणार आहेत; परंतु वनखात्याच्या परवानगीबरोबरच काही ठिकाणी जागा मालकांचा वीजवाहिन्या टाकण्यास विरोध आहे. त्यामुळे हे काम रखडले आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी नाव प्रसिद्घ न करण्याच्या अटीवर सांगितले.
प्रस्तावावर प्रस्ताव
पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरात भविष्यात विजेची मागणी किती वाढेल, हा विचार करून पुणे परिमंडलामध्ये अतिउच्चदाबाच्या २२०/२२ केव्ही आणि १३२/२२ केव्ही क्षमतेचे २१ नवीन उपकेंद्र उभारणे गरजेचे आहेत. हे लक्षात घेऊन प्रत्येक उपकेंद्राचा सविस्तर आराखडा महावितरणने केला आहे. त्याचबरोबरच महापारेषण उपकेंद्रांमध्ये अतिरिक्त पॉवर ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे १३ प्रस्ताव आणि दोन उपकेंद्रांमध्ये पॉवर ट्रान्सफॉर्मरच्या क्षमतावाढीचे दोन प्रस्तावही सादर करण्यात आले. २१ पैकी आठ उपकेंद्रांना मान्यता मिळाली असून, त्यांचे प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी महापारेषणकडे
पाठविले आहेत. मात्र, दीड वर्षापासून एकाही उपकेंद्राचे काम सुरू झालेले नाही. पायाभूत सुविधांची कामे मार्गी लावण्यात शासन, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महापारेषणला रस नसल्याचेच यातून दिसून येत आहे. ही कामे पूर्ण होईपर्यंत खंडित वीजपुरवठ्याचा त्रास सहन करावा लागणार आहे.
प्रस्तावित आठ उपकेंद्र आणि क्षमता
उपकेंद्र : क्षमता (केव्ही)
लवळे (नॉलेज सिटी) : १३२/२२
चऱ्होली (प्राइड वर्ल्ड सिटी) : २२०/३३/२२
मोशी (सफारी) : २२०/२२
ताथवडे (यशदा इन्स्टिट्यूट) : २२०/२२
बावधन : २२०/२२
बालेवाडी : २२०/२२
वाघोली : १३२/२२
हिंजवडी म्हाळुंगे : २२०/२२
(महावितरणकडून २१ पैकी आठ उपकेंद्र मंजूर असून महापारेषणकडे प्रस्ताव पाठवले आहेत. त्यांची उभारणी झाल्यास बावधन, बालेवाडी, औंध, वाघोली, नगररोड, भोसरी, पिंपरी, चिंचवड परिसरातील वीजपुरवठा सुरळीत होऊ शकेल.)
पुणे परिमंडळातील आठपैकी सहा अतिउच्चदाब केंद्रांच्या जागेचा प्रश्न मार्गी लागला आहे. त्यामुळे लवकरच त्यांची कामे सुरू करण्यात येणार आहेत. हिंजवडी येथील ४०० केव्ही अतिउच्चदाब केंद्राच्या टॉवर लाइन ज्या जागेवरून जाणार आहेत, त्या जागेसंदर्भात न्यायालयीन वाद निर्माण झाल्याने ते काम थांबले आहे. लवकरच हा प्रश्न देखील मार्गी लागेल.
- अनिल कोलप,
मुख्य अभियंता, पुणे परिमंडळ, महापारेषण
तुमचे मत मांडा....
हिंजवडी परिसरातील वीज यंत्रणा सक्षम नसल्याने त्याचा फटका आयटी उद्योगांना बसत आहे. राज्य सरकार, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींची उदासीनता याला कारणीभूत ठरत आहे. याबाबत आपले मत मांडा...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.