शिस्तबद्ध एकांकिका स्पर्धेची ६० वर्षे
पुणे, ता. २२ : तांत्रिक बाबींना गुणदान नाही, चौकट मोडणाऱ्या प्रयोगांसाठी विशेष पारितोषिक, वेळेचे काटेकोर पालन, अशी वैशिष्ट्ये ऐकल्यानंतर नाट्यप्रेमींच्या डोळ्यांसमोर आपसूक एकच नाव येते, ते म्हणजे पुरुषोत्तम करंडक ! प्रत्येक पिढीतील विद्यार्थी कलाकारांसाठी जिव्हाळ्याची असणारी ही आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा यंदा हीरक महोत्सवात पदार्पण करत आहे.
महाराष्ट्रीय कलोपासक संस्थेतर्फे १९६३ पासून या स्पर्धेचे आयोजन केले जाते. पुरुषोत्तम वझे यांच्या स्मरणार्थ राजाभाऊ नातू यांनी या स्पर्धेची सुरुवात केली. नाटकाचा पाया असलेल्या लेखन, दिग्दर्शन, अभिनयावर विद्यार्थ्यांनी भर द्यावा आणि तांत्रिक बाबीत फार अडकून पडू नये, यासाठी सुरुवातीपासूनच या स्पर्धेत केवळ लेखन, दिग्दर्शन, अभिनय याच विभागांमध्ये बक्षिसे दिली जातात. हा नियम आजही कायम आहे. तसेच, नाटकाची पारंपरिक चौकट मोडून नवा प्रयोग करू पाहणाऱ्या एकांकिकांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘जयराम हर्डीकर करंडक’ दिला जातो. या करंडकाचे महत्त्व प्रथम क्रमांकाच्या पुरुषोत्तम करंडकाइतकेच आहे.
सुरुवातीला केवळ पुण्यापुरती मर्यादित असलेल्या या स्पर्धेची व्याप्ती २०१० पासून वाढण्यास सुरुवात झाली. २०१४ ला झालेल्या स्पर्धेच्या सुवर्ण महोत्सवापासून ही स्पर्धा राज्यस्तरावर होते. पुण्यासह कोल्हापूर, रत्नागिरी, छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती या शहरात प्राथमिक फेरी होऊन त्यानंतर पुण्यात महाअंतिम फेरी होते.
आयोजन अन् दर्जाविषयी विश्वासार्हता
पुरुषोत्तम करंडकाच्या संपूर्ण आयोजनात पारदर्शकता जपली जाते. तज्ज्ञ परीक्षकांकडून पारितोषिकांसाठीची निवडही काटेकोरपणे केली जाते. २०२२ मध्ये पुरुषोत्तम करंडक देण्यासाठी एकही एकांकिका पात्र न आढळल्याने परीक्षकांनी करंडक कोणालाच न देण्याचा निर्णय घेतला होता. स्पर्धेच्या नियमावलीतच तशी तरतूद होती. अशा निर्णयांमुळेच आजही या स्पर्धेत बक्षीसपात्र ठरलेली एकांकिका दर्जेदारच असणार, असा विश्वास टिकून आहे.
डॉ. जब्बार पटेल, सतीश आळेकर, रोहिणी हट्टंगडी, सुहास जोशी यांच्यापासून ते अगदी सोनाली कुलकर्णी, उपेंद्र लिमये, सुबोध भावे, क्षितिश दाते, शिवराज वायचाळ असे अनेक कलाकार या स्पर्धेच्या मांडवाखालून गेले आहेत. मात्र, आमचा उद्देश योग्य वयात अडखळत्या पावलांना रंगमंच उपलब्ध करून देणे, एवढाच आहे. कोणतेही नट, दिग्दर्शक घडवले, असे आम्ही म्हणत नाही. ते त्यांच्या कष्टाने घडले आहेत. मात्र निःस्वार्थी कार्यकर्ते आणि चांगले प्रेक्षक आम्ही नक्कीच घडवले.
- मंगेश शिंदे,
विश्वस्त- महाराष्ट्रीय कलोपासक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.