‘महात्मा फुले जन आरोग्य’ला बूस्टर

‘महात्मा फुले जन आरोग्य’ला बूस्टर

Published on

पुणे, ता. २४ : राज्‍यातील प्रत्‍येक नागरिकाला पाच लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार पुरवणारी राज्‍य सरकारच्या महात्‍मा फुले जनआरोग्‍य योजनेत आणखी सुधारणा होत असून, या योजनेचे सक्षमीकरण करण्‍यात येत आहे. सध्‍या या योजनेत १३२६ स्‍वरूपाचे उपचार, शस्त्रक्रिया, प्रक्रिया समाविष्‍ट आहेत. आता त्‍यामध्‍ये आणखी तितकेच नवीन आजार, उपचारांचा समावेश होणार आहे. त्‍याचबरोबर सध्‍या राज्‍यात अडीच हजार रुग्‍णालयांमध्‍ये ही योजना सुरू असून त्‍यामध्‍ये आणखी नवीन रुग्‍णालयांचा समावेश होणार असून ही संख्‍या साडेचार हजार होणार आहे.
महात्‍मा फुले जनआरोग्‍य योजना ही सातत्‍याने बदलत असून ती रुग्णाभिमुख करण्‍याचा राज्‍याचा प्रयत्‍न आहे. राज्‍य आरोग्‍य हमी सोसायटीकडून ही योजना राबवली जाते. पूर्वी ही योजना चालवण्‍यासाठी खासगी विमा कंपनीला राज्‍य सरकार प्रत्‍येक कुटुंबाचा प्रीमियम भरत होते. मात्र, आता खासगी विमा कंपनी न ठेवता स्‍वतः राज्‍य सरकारच या योजनेचा खर्च करणार आहे. रुग्‍णांवर खर्च झालेल्‍या बिलांची रक्‍कम ही आरोग्‍य हमी सोसायटी रुग्‍णालयांना त्‍यांच्‍या नियमानुसार अदा करेल. त्‍यामुळे, पूर्वी ही बिले मिळायला उशीर लागायचा. मात्र, आता महिनाभरातच ही बिले रुग्णालयांना मिळतील, अशी माहिती राज्‍य आरोग्‍य हमी सोसायटीचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अण्‍णासाहेब चव्‍हाण यांनी दिली.

दोन्‍ही योजना एकत्र
महात्‍मा फुले जनआरोग्‍य योजना व आयुष्‍मान भारत योजना या दोन्‍ही योजना राज्‍यात एकत्रितपणे राबवण्‍यात येत आहेत. त्‍यांची प्रत्‍येकी मर्यादा ही पाच लाख रुपयांपर्यंत आहे. जर महात्‍मा फुले योजनेतील पाच लाखांचा निधी संपला, तर रुग्णाला आयुष्‍मान भारत योजनेत समावेश करून उपचार करण्‍यात येतात. पुण्‍यात मोठी रुग्‍णालये वगळता भारती विद्यापीठ, काशीबाई नवले रुग्‍णालय, सूर्या सह्याद्री रुग्‍णालय, डॉ. डी. वाय. पाटील रुग्‍णालय, ससून रुग्‍णालय, सिम्‍बायोसिस रुग्‍णालय या रुग्‍णालयांमध्‍ये ही योजना सध्‍या सुरू आहे. तर ७० वर्षांवरील नागरिकांना वयवंदना योजना लागू करण्‍यात आली असून, त्‍याची मर्यादा महात्‍मा फुले जनआरोग्‍य योजनेच्‍या व्‍यतिरिक्‍त पाच लाख इतकी आहे.

प्रत्‍यारोपणासाठी पाच लाख
नव्‍याने तयार करण्‍यात येत असलेल्‍या या योजनेत अवयव प्रत्‍यारोपणाचाही समावेश करण्‍यात येणार आहे. त्‍यासाठी रुग्‍णालयांना पाच लाख रुपयांचे पॅकेज दिले जाईल. तसेच त्‍यापेक्षा जास्‍त लागणारा खर्च हा विशेष निधीमधून भागविण्‍यात येणार आहे.

ही योजना घेणाऱ्या खासगी रुग्‍णालयांना देण्‍यात येणाऱ्या पॅकेजच्‍या दरांत आम्‍ही आणखी वाढ प्रस्‍तावित केली आहे. जेणेकरून ही योजना खासगी रुग्‍णालयांना परवडेल. रुग्‍णांसाठी अवयव प्रत्‍यारोपणाचा समावेश करत उपचारांची संख्‍या १३२६ वरून दुप्‍पट करणार आहे. रुग्‍णालयांना प्रत्‍येक महिन्‍याला त्‍यांचे बिले मंजूर होतील व त्‍यांना मध्‍यस्‍ताशिवाय पैसे मिळतील. ती प्रक्रीया ऑनलाइन केली आहे. योजनेसाठी या वर्षी साडेचार हजार कोटींची तरतूद केली आहे. प्रत्‍येक जिल्ह्यात योजना जिल्‍हाधिकाऱ्याच्‍या नियंत्रणाखाली सुरू असेल.
- अण्‍णासाहेब चव्‍हाण, मुख्‍य कार्यकारी अधिकारी, राज्‍य आरोग्‍य हमी सोसायटी

योजनेची वैशिष्ट्ये
- राज्‍यातील प्रत्‍येक व्‍यक्‍तीला संलग्‍न रुग्‍णालयांत पाच लाखांपर्यंतचे मोफत उपचार
- पुण्‍यात १९१ तर राज्‍यात अडीच हजार रुग्‍णालय संलग्‍न, संख्‍या साडेचार हजार करण्‍याचे प्रस्‍तावित
- १३२६ स्‍वरूपाच्या आजारांचा समावेश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com