ऐका श्रावणमासा, तुमची कहाणी

ऐका श्रावणमासा, तुमची कहाणी

Published on

श्रावण महिना सुरू होतो म्हणजे चातुर्मासारंभ होतो. लेकुरवाळी जरा-जीवंतीचं किंवा जीवंतिकेचं चित्र देवघरात लावलं जातं. चातुर्मासात आजही काही घरांमध्ये ‘कहाण्या’ वाचल्या जातात. कहाण्या हा मौखिक लोकवाङ्‌मयाचा एक पारंपरिक प्रकार. धार्मिक भावनेवर आधारलेली भाबडी, पापभिरू लोककथा म्हणजे कहाणी. या कहाण्यांमधून त्या-त्या काळातील समाज-धारणा प्रतिबिंबित होतात, समाजदर्शन घडतं.
‘ऐका परमेश्वरा गणेशा, तुमची कहाणी...’ असा प्रारंभ असलेल्या कहाणीची ‘साठा उत्तरांची कहाणी पांचा उत्तरी सुफळ संपूर्ण (संप्रूण)…’ अशी सांगता होते. हातातल्या अक्षता श्रद्धेने इष्ट देवतांवर उधळल्या जातात. आज नव्या सहस्रकातला ‘पंचवीसावा श्रावण’ अवतरला आहे! आजच्या आधुनिक, वेगवान, ग्लोबल काळात आक्रसलेल्या, दबलेल्या श्रावणालाच लेखिकेनं त्याचीच ‘कहाणी’ ऐकवली आहे.
ऐका श्रावणमासा, तुमची कहाणी. निर्मळ मळे, उदकांचे तळे. बेलाचा वृक्ष. सुवर्णांची कमळे. विनायकांची देवळे-रावळे...! मनचा श्रावण मनी वसावा... हा वसा कधी घ्यावा? श्रावण्या चौथी घ्यावा. माही चौथी संपूर्ण करावा...
श्रावणमासा, तू तर सणांचा महिना. थोर तुझा महिमा. ‘हर्ष मानसी फुलवणाऱ्या’ बालकवींचं ‘पेटंट’ असणारा तू हिरवा मखमली रिमझिमता महिना! तुला माहीत तरी आहे का, तुझ्यामुळे ‘श्रावणात घननिळा बरसला’ असं म्हणत त्या रिमझिम रेशिमधारांसोबत पाडगावकरांनी अंतर्यामीचा छेडला होता सूर. तुझ्या धारांमुळे ‘हसरा नाचरा, जरासा लाजरा, सुंदर साजरा श्रावण आला...’ म्हणत वाहिला होता कुसुमाग्रजांच्या सर्जनसरीचा पूर. तुझ्यामुळे रुजवंतीचा बहर मिरवत ‘ॠतु हिरवा, ॠतु बरवा...’ म्हणणाऱ्या शांताबाई शेळकेंनीही शब्दांकित केलंय तुला मनभावन. अनेक कवींना या ऊन-पावसाचा खेळ खेळणाऱ्या श्रावणाने घातली आहे भुलावण. कवितेचा रसाळ वसा कधी घ्यावा? श्रावणात तर घ्यावाच, पण प्रत्येक महिन्यात-क्षणोक्षणी...मनोमनी रसिकतेनं घ्यावा.
श्रावणमासा, तुमची कहाणी म्हणजे फुलांची कहाणी! आहे भलतीच गोजिरवाणी. जाई, जुई, शेवंती, कुंद, मोगरा, गुलछडी, तेरडा, अनंत, कमळ, केतकी, बकुळी, सोनटक्का, चाफ्याची पुष्करणी! मातीच्या गंधाची घमघमती अत्तरदाणी! त्यातच नागपंचमी, मंगळागौरी, नारळी पौर्णिमेची मनरमणी गाणी. एरवी लक्ष जात नाही पण श्रावणातच झुलते मेंदीच्या पानांवर मन! जन्माष्टमीला तर तूच होतोस मन्मोहन!
श्रावणमासा, तू तर सणांचा महिना. सर्वांसाठी आनंदसोहळा. मुक्त व्यासपीठच अभिव्यक्तीचं. मोकळं आकाश मनोरंजनाचं. स्त्रियांसाठी आनंदाचं निधान. मुलींसाठी उत्साहाचं उधाण. तू तर माणूस-माणूस जोडणारं माध्यम. परंपरेतील सण आणि प्रथांचं करतोस शिंपण. निसर्गासोबत नटण्यासाठी तूच तर असतोस सौंदर्याचं दर्पण. श्रावणी सोमवारची शिवामूठ असो की नागपंचमी, शुक्रवारचे फुटाणे असोत की राखी-पौर्णिमेचा नारळीभात...सर्वत्र भरून राहिली आहे तुझ्याच अभिव्यक्तीची बरसात. पाचही ज्ञानेंद्रियांच्या आस्वादनाचा तू सोहळा. तुझा रंग-ओला उत्सव म्हणजे फांद्यावर बांधलेल्या चिमुकल्या आनंदाचा हिंदोळा. श्रावणराजा, तू जेव्हा मनसोक्त झोके घेतोस, सासुरवाशिणींच्या मनातली जाणिवांची हिरवळ होतोस. झोका उंच आभाळातल्या इंद्रधनुष्यापर्यंत जातो नि मग पुन्हा भुईवरल्या रानफुलांपाशी गप्पा मारत बसतोस. इंद्रधनुष्यातील सप्त रंग तू भुईवरल्या गोजिरवाण्या फुलांना देतोस.
पण, इथंच तुझी कहाणी संपत नाही राजा. आधुनिकतेच्या मजेमध्येच आहे केवढी सजा. आज घेरलं आहे तुला प्रदूषणानं. सिमेंटच्या जंगलानं ओरबाडलंय तुझं नैसर्गिकपण. आज काळानं बदललं आहे तुझं रूप. बाजारपेठेने पालटलंय तुझं स्वरूप. सणांवर झालंय परदेशी मालाचं आक्रमण. उत्सवांवर चढलंय चंगळवादाचं संक्रमण. आनंदाला पडला आहे पैशांचा विळखा. त्यात भोळ्या सणांचा कसा घ्यावा लेखाजोखा? श्रावणमासा, तुझ्या नावे स्पर्धांचं पीक. आता तरी जागा हो, काही त्यातून शीक. हिरव्या-ओल्या स्वप्नांतून जागा हो जागा. फुलू देत मातीतून प्रकृतीच्या बागा. माणसांना जागे करणं हेच आता तुझं व्रत. त्याच पवित्र फलश्रुतीसाठी राहा तू कार्यरत. पंचमहाभूतांना जपणे हेच महापुण्य. असा वसा मनी घ्याईजे, पाविजे, चिंतिले लाभिजे, मनकामना निर्विघ्न कार्यसिद्धी करिजे. ही साठा
उत्तरांची कहाणी...साऱ्या शहाण्या माणसांच्या सहकार्यातून तूच कर सुफळ संप्रूण (संपूर्ण).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com