चित्रपटांच्या तिकिटांचे दर २०० रुपये करा
पुणे, ता. २७ : कर्नाटक सरकारने चित्रपटगृह आणि मल्टिप्लेक्समधील तिकिटाची कमाल किंमत २०० रुपये करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता महाराष्ट्रातही अशीच योजना लागू करण्याची मागणी पुढे आली आहे. मराठी चित्रपटांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने अशा प्रकारची पावले उचलण्याची मागणी मराठी चित्रपट निर्माते, अभिनेते यांच्यासह विविध संस्था-संघटनांनी केली आहे.
सध्या एकपडदा चित्रपटगृहांमधील तिकिटांचे दर १५० ते ४०० रुपयांपर्यंतच असले, तरी मल्टिप्लेक्समध्ये हेच दर ३०० रुपयांपासून १२०० रुपयांपर्यंत असतात. महागड्या तिकिटांमुळे अनेकदा रसिक चित्रपटगृहांकडे पाठ फिरवतात. मात्र ज्या दिवशी सवलतीच्या दरात तिकिटे मिळत असतात, त्या वेळी मात्र चित्रपटगृह हमखास ‘हाउसफुल्ल’ होतात. तसेच, पुण्यात नाट्यगृहांमध्ये अवघ्या ५० रुपयांमध्ये चित्रपट दाखवण्याच्या योजनेलाही प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता. तिकिटांचे कमी दर, हे त्यामागील प्रमुख कारण असल्याचे समोर आले होते. त्यामुळे चित्रपटांना मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद वाढवायचा असेल, तर महाराष्ट्रातही कर्नाटकसारखा निर्णय घेण्याची गरज असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. महाराष्ट्रात मराठीसह हिंदी, इंग्रजी आणि दाक्षिणात्य भाषेतील चित्रपटांचाही मोठा प्रभाव आहे. तिकिटांचे दर कमी झाल्यास प्रेक्षक मराठी भाषेतील चित्रपटांचाही प्राधान्याने विचार करतील, अशी भूमिका चित्रपटकर्मींनी मांडली आहे.
अभिनेते-निर्माते हेमंत ढोमे म्हणाले, ‘‘कर्नाटक सरकारचा निर्णय हा आपल्या भाषेतील चित्रपट मोठा व्हावा, यासाठी उचललेले एक अत्यंत महत्त्वाचे आणि संपूर्ण देशाला मार्गदर्शक ठरेल, असे पाऊल ठरणार आहे. महाराष्ट्र सरकारकडून अशाच निर्णयाची अपेक्षा मी एक प्रेक्षक म्हणून सगळ्यात आधी करतो आणि त्यानंतर मराठी भाषेतील चित्रपटांच्या भवितव्यासाठी चित्रपटगृहांच्या मनमानी कारभाराला आळा घातला जावा, हीच इच्छा आहे. महाराष्ट्रात मराठी चित्रपटांना स्क्रीन्स उपलब्ध होणे आणि त्यांना प्राइम टाइम मिळणे, यासाठी आता कायदा करण्यात यावा.’’
‘‘मराठी चित्रपटांच्या भल्यासाठी मनोरंजनसृष्टीवर राज्य सरकारचे नियंत्रण हवे. त्यामुळे राज्य सरकारने कर्नाटकप्रमाणेच मराठी चित्रपटांसाठी असा निर्णय लवकरात लवकर घ्यावा,’’ अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबा पाटील यांनी मांडली.
मराठी चित्रपटांना प्राधान्य द्या
‘‘मुळात मराठी प्रेक्षक मराठी चित्रपटांना प्राधान्य देत नाहीत, ही दुर्दैवाची बाब आहे. निदान महाराष्ट्र सरकारने त्यासाठी काही निर्णय घेऊन कायदे केले, तरच मराठी चित्रपटांचे भले होऊ शकेल. स्क्रीन्स मिळणे, प्राइम टाइम मिळणे, यासाठी सरकारने नियम करायला हवे आहेत. तिकिटांचे दर कमी करणे, ही त्याची सुरुवात ठरू शकेल’’, असे मत निर्माते-अभिनेते पुष्कर जोग यांनी व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.