महापालिकेच्या मिळकती वाऱ्यावर
पांडुरंग सरोदे : सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. २८ : महापालिकेच्या शाळा, क्रीडांगणे, दवाखाने, नाट्यगृह, प्रकल्पबाधितांसाठीची घरे अशा विविध प्रकारच्या मिळकतींच्या ठिकाणी सुरक्षारक्षकांचा अभाव आहे. त्यामुळे संबंधित मिळकतींमधील विविध प्रकारच्या वस्तू चोरीस जाण्यापासून तेथे अनेक गैरप्रकारही सुरू आहेत. प्रकल्पबाधितांसाठी असणाऱ्या सदनिकांमध्ये बेकायदा अतिक्रमणाचे प्रकार सुरू आहेत. तरीही त्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
महापालिका प्रशासनाच्या विविध ठिकाणी मिळकती आहेत. महापालिकेची मुख्य इमारत, क्षेत्रीय कार्यालये, काही नाट्यगृहे, क्रीडांगणे, शाळा, रुग्णालये वगळता बहुतांश ठिकाणी सुरक्षारक्षकांची कमतरता आहे. महापालिका प्रशासनाकडून कोट्यवधी रुपये खर्च करून नाट्यगृहे, शाळा, रुग्णालये, क्रीडांगणे तयार केली जातात. मात्र त्यांच्या देखभाल-दुरुस्तीबरोबरच सुरक्षिततेकडेही गांभीर्याने पाहिले जात नाही. परिणामी कोट्यवधी रुपये खर्च करूनही संबंधित मिळकतींच्या व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष केले जाते. रस्त्यांच्या कामांसह विविध प्रकल्पांच्या जागेवरील नागरिकांचे महापालिकेकडून पुनर्वसन केले जाते. त्यासाठी बांधकाम व्यावसायिकांकडून ‘आर ७’ अंतर्गत महापालिकेस देण्यात आलेल्या सदनिका, प्रकल्पबाधितांसाठीच्या बीएसयुपी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणांतर्गतच्या (एसआरए) सदनिका अशा ठिकाणच्या सदनिकांमधील नळ, विजेच्या तारा व अन्य वस्तूंची सर्रासपणे चोरी होते. काही ठिकाणी मद्यपानाची ठिकाणे, गैरप्रचारांसह तोडफोडीसारखे प्रकारही घडतात. केवळ तेवढ्यावरच न थांबता संबंधित सदनिकांमध्ये बेकायदा अतिक्रमण करण्याचा प्रकारही सुरू आहे. मात्र संबंधित ठिकाणी पुरेशी सुरक्षाव्यवस्था नसल्याने महापालिकेचे नुकसान होत आहे.
अशा घडल्या घटना...
१) राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणात चंदनाची झाडे आहेत. व्हेईकल डेपो, कचरा डेपो येथे महापालिकेची वाहने असतात. त्या ठिकाणीही चोरीसारखे गंभीर प्रकार घडले आहेत.
२) काही ठिकाणी सुरक्षारक्षकाला दमदाटी, मारहाण, हल्ले करून चोरी करण्यासह टवाळखोर, मद्यपींकडून अनेक गैरप्रकारही केले जात आहेत.
३) शहरातील क्रीडांगणे, उद्याने, प्राणी संग्रहालय, दवाखाने, रुग्णालये, नाट्यगृह, भाजीमंडई याबरोबरच महापालिकेच्या मालकीच्या अनेक इमारती, मिळकतींना पुरेशा प्रमाणात सुरक्षारक्षकच नाहीत. त्यामुळे संबंधित ठिकाणीही चोरीच्या घटना घडल्या आहेत.
४) अनेक दिवस बंद असणाऱ्या मिळकती गुन्हेगारांसाठी आश्रयस्थाने ठरू लागली आहेत. महापालिकेच्या विविध विभागांकडून सुरक्षारक्षक पुरविण्यासंदर्भात प्रशासनाकडे पत्र पाठविण्यात आलेली आहेत. मात्र सुरक्षारक्षकांच्या कमतरतेचे कारण पुढे करत दुर्लक्ष केले जात आहे.
समाविष्ट गावांकडे दुर्लक्ष
शहराप्रमाणेच महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमधील शाळा, स्मशानभूमी, उद्याने, क्रीडांगणे, दवाखान्यांना तर सुरक्षेचा मागमूसही नाही. समाविष्ट गावांमधील मिळकतींच्या ठिकाणी रात्रीच्यावेळी मद्यपी सर्रासपणे बसतात. त्याचठिकाणी गैरप्रकारही सुरू असतात. स्मशानभूमी, पाण्याच्या टाक्यांसह महत्त्वाच्या ठिकाणीही सुरक्षारक्षकांचा अभाव आहे. संबंधित ठिकाणी भविष्यात गंभीर घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सुरक्षारक्षकांची मागणी
३६
- प्राथमिक शाळा
६०
- विद्यार्थी वाहतूक बस
३७
- स्मशानभूमी
९२
- उद्याने
७०
- आरोग्यविभाग
२५
- क्रीडांगणे
७१
- नाट्यगृह
९५
- पाण्याच्या टाक्या, एसटीपी केंद्र
३०
- भाजी मंडई
महापालिकेच्या विविध विभागांना सुरक्षारक्षकांची गरज आहे, त्यानुसार संबंधित विभागांनी मागणी केलेली आहे. त्यासंदर्भात तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित प्रस्ताव महापालिका आयुक्तांकडे पाठविला जाईल. त्यानंतर पुढील कार्यवाही होईल.
- राकेश विटकर,
सुरक्षा अधिकारी, पुणे महापालिका
तुमचे मत मांडा....
महापालिकेच्या मिळकतींना सुरक्षारक्षक मिळत नसल्याने तेथे चोरीसह गैरप्रकार सुरु आहेत. प्रकल्पबाधितांच्या सदनिकांमध्येही अतिक्रमण होत आहे. त्याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. याबाबत तुमचे मत मांडा...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.