

पुणे, ता. ११ : गेल्या आठवड्यापासून उकाड्याने त्रस्त झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार आहे. कमाल तापमानात किंचित घट होणार असून, पुढील पाच दिवस शहरात ढगाळ वातावरणाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
मागील काही दिवसांपासून शहरातील कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअसच्या घरात पोहोचले होते. सकाळपासूनच वाढलेला उकाडा आणि दुपारनंतर वाढणारी गरमी यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. मात्र शुक्रवारी (ता. ११) कमाल तापमानात तीन अंश सेल्सिअसने घट झाली. शहरात ३९ अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान नोंदविण्यात आले असून, २३.८ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदविण्यात आले आहे. एक द्रोणीका रेषा पश्चिम राजस्थानपासून आंध्र प्रदेश किनारपट्टीपर्यंत विदर्भावरून जात आहे. याच्या प्रभावामुळे पुढील दोन दिवस कमाल तापमान स्थिर राहणार असून त्यानंतर मात्र त्यामध्ये किंचित वाढ होण्याची शक्यता आहे. पुढील पाच दिवस पुणे शहरात ढगाळ वातावरण राहील, असे हवामानशास्त्र विभागाने सांगितले आहे.
पुणे आणि परिसरात शनिवारी (ता. १२) कमाल तापमानात फारसा बदल होणार नसून, कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअस इतके नोंदविले जाईल, तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअस नोंदवले जाईल. आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी आणि सायंकाळी अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सोमवारी (ता. १४) कमाल तापमानात किंचित वाढ होणार आहे, तर कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस नोंदविले जाण्याची शक्यता आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी आणि सायंकाळी अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.