पुणे महापालिकेचे दोन अभियंते निलंबित
पुणे, ता. १८ ः वारजे येथे निकृष्ट दर्जाचे डांबरीकरण केल्याचे नागरिकांनी समोर आणून त्याचे व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल केले होते. या प्रकरणी ठेकेदाराला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे, तर पथ विभागाच्या दोन अभियंत्यांनी त्यांच्या कामात निष्काळजीपणा केल्याचे चांगलेच भोवले असून, त्यांना निलंबित केले आहे.
पुणे शहरात खड्डेमुक्त अभियान सुरू आहे. याचे उद्घाटन नुकतेच महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या हस्ते झाले आहे. हे अभियान सुरू झाल्यानंतर त्याचे काम चांगल्या दर्जाचे होणे अपेक्षित होते. वारजे येथे महापालिकेच्या ठेकेदाराने मातीवर डांबरीकरण केले, पण व्यवस्थित दबाई न केल्याने डांबराचे थर निघून जात होते. हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा व्हिडिओ एका तरुणाने तयार करून तो समाजमाध्यमावर व्हायरल केला होता. त्यामुळे महापालिकेच्या कामावर झोड उठली होती. हा प्रकार आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी ठेकेदाराला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. पुढील वेळी अशा चुकीच्या पद्धतीने काम केल्यास काळ्या यादीत टाकण्याचे आदेश दिले होते. तर या कामावर देखरेख ठेवणाऱ्या कनिष्ठ अभियंता व उपअभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यांनी त्यावर समाधानकारक खुलासा न केल्याने दोघांचेही निलंबन करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
शुक्रवार पेठ, कासेवाडी आयुक्तांकडून पाहणी
पथ विभागातर्फे शहराच्या मध्यवर्ती भागात खड्डे बुजविणे, रस्त्याचे डांबरीकरण करणे अशी कामे केली जात आहेत. आयुक्त नवल किशोर राम यांनी मंगळवारी शहराच्या पूर्वी भागातील दाट लोकवस्तीमध्ये जाऊन रस्त्याची पाहणी केली. रस्त्यांचे रिसरफेसिंग करताना जास्त क्षेत्र घेतल्यास आणखी चांगले रस्ते होतील अशी सूचना देण्यात आली आहे. यावेळी अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, पथ विभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर, अधीक्षक अभियंता अशित जाधव आदी उपस्थित होते.
आयुक्तांनी टिळक रस्ता, स्वारगेट, शुक्रवार पेठ वाडिया रुग्णालय, कासेवाडी, राष्ट्रभूषण चौक, न्यू टिंबर मार्केट, रामोशी गेट येथील रस्त्यांचे पॅचवर्कची पाहणी केली. शंकर शेठ रस्ता, सेव्हल लव्हज चौक, वर्धमान इमारत येथील रस्ता रुंदीकरण केल्याने वाहनांना अतिरिक्त जागा मिळाली आहे या कामाची पाहणी केली. वर्धमान इमारत येथील चँपरच्या कामामुळे कोंडी सुटल्याने याचे कौतुक केले, तसेच या रस्त्यांमध्ये पावसाळी गटारांचे टेंबर, मलनिस्सारणाचे चेंबर खचले आहेत, ते समपातळीत आणण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सेन्सर न वापरल्याबद्दल नाराजी
पथ विभागाने सेन्सर पेव्हर ब्लॉक खरेदी केले आहेत. हे पेव्हर ब्लॉक हिराबाग येथील डांबर कोठीमध्ये ठेवण्यात आले आहेत. त्यांचा अद्याप वापर न केल्याबद्दल आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली, तसेच या ठिकाणी भंगार सामान, अस्वच्छतेबाबतही आयुक्तांनी झाडाझडती घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

