पशुधनासाठी प्रोबायोटिक

पशुधनासाठी प्रोबायोटिक
Published on

पान १२- २१ साठी
००००००००००००००००००००००००००

पशुआहारात प्रोबायोटिक्सचा वापर
-------------------------------
विविध उद्देशांसाठी प्रोबायोटिक्स उपलब्ध आहेत. प्रोबायोटिक्सचा उपयोग शारीरिक कार्ये सुधारण्यासाठी आणि आजार टाळण्यासाठी केला जातो. ते अन्नाच्या जलद पचनास मदत करतात, शरीरातील जिवाणूंचे आवश्यक संतुलन राखतात. रोगप्रतिकारशक्ती सुधारतात.
--------------------------------
सुमीत गवळी, डॉ. नरेंद्र प्रसादे, डॉ. संदीप रामोड
-------------------------------------
प्रोबायोटिक्स हे जिवंत आणि उपयुक्त सूक्ष्मजीव (जिवाणू किंवा यीस्ट) आहेत, जे योग्य प्रमाणात दिल्यास जनावरांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम करतात. आधुनिक पशुपालनामध्ये प्रतिजैविकांच्या वापरावर वाढत्या निर्बंधांमुळे प्रोबायोटिक्सचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. हे उपयुक्त जिवाणू प्राण्यांच्या पचनसंस्थेमध्ये संतुलित सूक्ष्मजीव समुदाय निर्माण करून अन्नाचे पचन सुधारतात, नको असलेले रोगकारक सूक्ष्मजीवांची (जिवाणू) वाढ रोखतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.
गाय, म्हैस, शेळी, मेंढी, वराह तसेच कोंबड्यांच्या आहारात प्रोबायोटिक्सचा समावेश केल्याने वजन वाढीचा दर, खाद्य रूपांतरण कार्यक्षमता, उत्पादनक्षमता आणि एकूण आरोग्य सुधारते.
प्रोबायोटिक्स हे असे सूक्ष्मजीव आहेत जे शरीराच्या सामान्य गरजा पूर्ण करण्याव्यतिरिक्त, आरोग्य राखण्यासारख्या विशिष्ट उद्देशांची पूर्तता देखील करतात. विविध उद्देशांसाठी प्रोबायोटिक्स उपलब्ध आहेत. प्रोबायोटिक्सचा उपयोग शारीरिक कार्ये सुधार आणि आजार टाळण्यासाठी केला जातो. ते अन्नाच्या जलद पचनास मदत करतात आणि शरीरातील जिवाणूंचे आवश्यक संतुलन राखतात. रोगप्रतिकारशक्ती सुधारतात. ही उत्पादने ‘ब’ जीवनसत्त्वांच्या संश्लेषण, कॅल्शिअम तसेच खनिजे शोषणातही मदत करतात. ही उत्पादने पशूंसाठी सर्वसाधारणपणे फायदेशीर असल्याचे दिसून आले आहे.
प्रोबायोटिक्स हा एक सूक्ष्मजीव, मानव आणि जनावरांचे आरोग्य सुधारण्यासाठी वापरला जातो. सॅकरोमायसेस सर्व्हिशिया (Saccharomyces cerevisiae) यीस्ट सर्व पाळीव प्राणी आणि कोंबड्यांची उत्पादकता वाढवते. प्रोबायोटिक्स हा एकपेशीय जीव आहे जो इतर जिवाणूंपेक्षा वेगळा असतो. त्याचा आकार जिवाणूंपेक्षा मोठा असतो. प्रोबायोटिक्सच्या जनुकीयदृष्ट्या विकसित झालेल्या विशेष गुणधर्मांमुळे, ते जिवाणूनाशक औषधांना प्रतिरोधक असते.


प्रोबायोटिक जिवाणू ः
१) प्रोबायोटिक्स अनेक प्रकारांमध्ये येतात, जे सूक्ष्मजीवांच्या वेगवेगळ्या प्रजातींचे असतात. एकाच प्रजातीच्या उपप्रजातींचे देखील चयापचय क्रियेवर वेगवेगळे परिणाम होऊ शकतात. जर प्रोबायोटिक्स योग्य प्रमाणात, अनुकूल वातावरणात आणि योग्य पद्धतीने वापरले गेले, तर ते खूप प्रभावी ठरू शकतात. नवजात वासरांना ते दिल्याने न्यूमोनिया कमी होतो. प्रोबायोटिक उत्पादने पावडर, पेस्ट, टॅब्लेट किंवा कॅप्सूल या स्वरूपात मिळतात.
२) सॅकरोमायसेस सर्व्हिशिया, लॅक्टोबॅसिलस स्ट्रेप्टोकोकस, एंटरोकोकस फेकालिस, रुमेनोकोकस अल्बस, लॅक्टोबॅसिलस, बायफिडोबॅक्टेरिया, बोव्हिसिन आणि मॅक्रोसिन.


पशूंना प्रोबायोटिक सूक्ष्मजीव खाद्यामध्ये देण्याची प्रक्रिया ः
प्रोबायोटिक हे जिवंत उपयुक्त सूक्ष्मजीव आहेत जे जनावरांच्या पचनसंस्थेत जाऊन पचनक्रिया सुधारतात, रोगप्रतिकारशक्ती वाढवतात, उत्पादनक्षमता सुधारण्यास व शारीरिक वाढीस मदत करतात.

प्रोबायोटिक्स देण्याच्या पद्धती :
खाद्यामध्ये मिसळून ः
- दुधामध्ये प्रोबायोटिक सूक्ष्मजीवांचे विरजण वापरून दही करावे. या दह्याचे ताक बनवून दही : पाणी (१:४) वापरून ताक बनवावे. ताक आणि खाद्य मिसळून ८ ते १० तास भिजवावे. त्यानंतर जनावरांना सकाळी द्यावे.
- प्रोबायोटिक पावडर किंवा ग्रॅन्युल्स पशुखाद्यामध्ये समप्रमाणात मिसळून दिले जातात. ही सर्वांत सामान्य व सोपी पद्धत आहे.
पिण्याच्या पाण्यात मिसळून ः
- पिण्याच्या पाण्यातून दही किंवा ताक बनवून सर्व पाळीव प्राण्यांना ५ टक्के प्रति लिटर पाण्यात मिसळून द्यावे. जनावरांच्या सेवनाच्या वेळेस त्या पाण्यात १०६ CFU/g ही गणना असावी हे आवश्यक आहे.
- प्रोबायोटिक द्रावण किंवा पावडर पाण्यात विरघळवून जनावरांना दिली जाते.
- उष्ण हवामानात किंवा ताणाच्या परिस्थितीत ही पद्धत उपयुक्त ठरते.

प्रोबायोटिक्स देताना घ्यावयाची काळजी :
- उत्पादक कंपनीने दिलेल्या शिफारशीनुसार मात्रा वापरावी.
- गरम पाणी किंवा जास्त तापमानात प्रोबायोटिक्स मिसळू नयेत, कारण सूक्ष्मजीव नष्ट होऊ शकतात.
- साठवणूक थंड व कोरड्या ठिकाणी करावी.

वापर :
- जनावरांच्या खाद्यात प्रोबायोटिक मिसळल्याने आरोग्य सुधारते आणि उत्पादन वाढते. नवजात वासरे, कोंबड्या, दुभत्या गाई आणि म्हशींना सहजपणे खाऊ घालता येते. आंबवण्याची प्रक्रिया वेगवान करण्यासाठी औद्योगिक स्तरावर प्रोबायोटिकचा वापर केला जातो. अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने याला एक सुरक्षित अन्न म्हणून वर्गीकृत केले आहे.

फायदे ः
- प्रोबायोटिक जिवाणू शारीरिक वाढ करतात.
- सामान्य परिस्थितीत जनावरांची पचनक्षमता सुधारते.
- दुभत्या जनावरांच्या रुमेनमध्ये लॅक्टिक ॲसिडचे प्रमाण कमी करून सामू नियंत्रित करते.
- हानिकारक जिवाणूंची संख्या देखील कमी होते.
- रुमेनमध्ये प्रोटोझोआ किंवा एकपेशीय जिवांची संख्या वाढवते.
- प्रोबायोटिक खाऊ घातल्याने पचनमार्गाच्या पुढील भागात अधिक प्रथिने तयार होतात, खनिजे शोषणास मदत करतात.
-अमिनो ॲसिडचे प्रमाण वाढते आणि आंबवण्याची प्रक्रिया अधिक वेगाने सुरू होते.
- रुमेनमध्ये फायदेशीर बुरशींची संख्या वाढवते. रुमेनचे वातावरण ऑक्सिजनमुक्त करते.
- संसर्गजन्य जिवाणूंची संख्या नियंत्रित करून रोगांचा प्रसार रोखते. निरुपयोगी जिवाणूंची संख्या कमी होते.
- दुभत्या जनावरांमध्ये प्रोबायोटिक्सच्या सेवनाने शरीराचे वजन वाढते. त्यांच्या सेवनाने खाद्याची पचनक्षमता वाढते आणि जनावरांची रोगप्रतिकारशक्ती सुधारते. दुधाची गुणवत्ता आणि प्रमाण देखील सुधारतात.

------------------------------------
इन्फो ः
रवंथ करणाऱ्या जनावरांची पचनसंस्था :

१. रवंथ करणाऱ्या जनावरांची पचनसंस्था : गाय, म्हैस, शेळी, मेंढी यांच्यामध्ये चार कप्प्यांचे जठर (रुमेन, रेटिक्युलम, ओमासम, अबोमासम) असते. ते अन्न खाऊन पुन्हा मुखात आणून चघळतात (रवंथ करतात).
२. साध्या जठराची पचन संस्था : घोडा, वराह यांच्या जठराला एकच कप्पा असतो.

रवंथ करणाऱ्या जनावरांच्या पचनसंस्थेचे मुख्य अवयव आणि कार्य ः
तोंड व जीभ : अन्न ग्रहण करणे, लाळ मिसळणे आणि अन्न गिळणे. लाळेमुळे अन्नाचा घास ओला होतो आणि पचनास मदत होते.
अन्ननलिका : नळीसारखा भाग, ज्याद्वारे अन्न तोंडातून जठरापर्यंत पोहोचते.
जठर (चार कप्पे) : रुमेन (पहिला कप्पा) : हा सर्वांत मोठा कप्पा आहे. येथे जिवाणू व बुरशीच्या मदतीने तंतुमय पदार्थांचे किण्वन होते.
रेटिक्युलम (दुसरा कप्पा) : मधमाश्यांच्या पोळ्यासारखी रचना. अन्न पुन्हा तोंडात परत पाठवणे (रवंथ करण्यासाठी) आणि चुकून खाल्लेल्या खडे किंवा लोखंडी वस्तू येथे अडकवणे.
ओमासम (तिसरा कप्पा) : अन्न बारीक करणे आणि अन्नातील पाण्याचे शोषण करणे.
अबोमासम (चौथा कप्पा) : याला ‘खरे जठर’ म्हणतात. येथे पाचक रस आणि एन्झाइम्सच्या मदतीने प्रथिनांचे पचन होते.
लहान आतडे : येथे पचनक्रियेतील उर्वरित सर्व पोषक घटक (कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ) शोषून घेतले जातात.
मोठे आतडे : न पचलेल्या अन्नातील पाणी शोषून घेणे आणि उर्वरित टाकाऊ पदार्थ (शेण) गुदद्वाराद्वारे शरीराबाहेर टाकणे.
--------------------------------------------------------------------------------
संपर्क ः डॉ. संदीप रामोड, ९८६०९११९३८
पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com