

चेन्नई, ता. १० (पीटीआय) : जोसेफ सी. विजय यांनी रविवारी तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्या नव्या मंत्रिमंडळात पहिल्या टप्प्यात तरुणाई आणि अनुभव यांचा संगम असून, नऊ जणांनी विजय यांच्यासोबत शपथ घेतली. या मंत्रिमंडळाबद्दल....
के. ए. सेंगोट्टायन
सन १९७० च्या दशकात कोईम्बतूर जिल्ह्यातील कुल्लापालयम ग्रामपंचायतीचे नेते म्हणून राजकारणात प्रवेश करून सेंगोट्टायन तमिळनाडूच्या राजकारणात ५० वर्षे सक्रिय राहिले. १९७७ मध्ये सत्यामंगलम मतदारसंघातून ते पहिल्यांदा आमदार झाले. एम. जी. रामचंद्रन (एमजीआर) यांच्या काळात त्यांनी सुरुवात केली. नंतर जयललितांचे निष्ठावान समर्थक म्हणून त्यांनी महसूलमंत्री व शालेय शिक्षणमंत्री अशी महत्त्वाची पदे सांभाळली. सन २०२५ मध्ये अण्णा द्रमुकमधून हकालपट्टी झाल्यानंतर ते विजय यांच्या ‘टीव्हीके’त सामील झाले.
आधव अर्जुना
‘टीव्हीके’चा सर्वाधिक लोकप्रिय चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. बास्केटबॉल खेळाडू आणि सध्या बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अर्जुना कार्यरत आहेत. ‘व्हीसीके’मध्ये थोडा काळ काम करून त्यांनी विजय यांच्या पक्षात प्रवेश केला. ‘लॉटरी किंग’ सँटियागो मार्टिन यांचे ते जावई असून, विलिवक्कम मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला.
एन. आनंद (बुसी आनंद)
विजय यांचे निकटचे सहकारी. पक्षाच्या संघटनात्मक बांधणीमध्ये महत्त्वाची भूमिका. २००६ मध्ये पुदुच्चेरीतील बुसी मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवल्याने ‘बुसी’ हे टोपणनाव पडले. विविध सामाजिक कामामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो.
एस. कीर्तना
सिवकाशी मतदारसंघातून विजय मिळवणारी पहिली महिला आमदार. २९ वर्षीय कीर्तनाने सात दशकांचा पुरुष वर्चस्वाचा इतिहास संपवला. गणित व सांख्यिकीचे शिक्षण घेतलेल्या कीर्तना मंत्रिमंडळातील सर्वांत तरुण मंत्री असून, द्रमुकच्या प्रचार मोहिमेत त्या यापूर्वी सहभागी झाल्या होत्या.
के. जी. अरुणराज
माजी अधिकारी व डॉक्टर. विजय यांच्या टीव्हीकेचे धोरण व प्रचार सचिव म्हणून अरुणराज ओळखले जातात. नमक्कल जिल्ह्यातील तिरुचेंगोडे मतदारसंघातून विजय मिळवला. ‘एमबीबीएस’चे शिक्षण मद्रास मेडिकल कॉलेजमधून घेतले आहे.
आर. निर्मलकुमार
‘टीव्हीके’चे आयटी व सोशल मीडिया प्रमुख असणारे निर्मलकुमार माजी भाजप व अण्णा द्रमुकचे कार्यकर्ते आहेत. सन २०२५ मध्ये त्यांनी ‘टीव्हीके’त प्रवेश केला. मदुराईतील तिरुप्परंकुंड्रम मतदारसंघातून ते विजयी झाले आहेत. त्यांनी अभियांत्रिकी व कायद्याचे शिक्षण घेतले असून, पक्षाला आधुनिक रूप देण्यात महत्त्वाची भूमिका त्यांनी बजावली आहे.
ए. राजमोहन
अभिनेते, स्टँड-अप कॉमेडियन, टीव्ही अँकर व दिग्दर्शक म्हणून लोकप्रिय असलेल्या राजमोहीन यांनी ‘टीव्हीके’चे प्रचार सचिव म्हणून काम केले आहे. एगमोर मतदारसंघातून विजय.
पी. वेंकटरामनन
‘टीव्हीके’चे कोषागार असलेले वेंकटरामनन व्यवसायाने वकील आहेत. मायलापूर मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला असून, २०२४ मध्ये ‘टीव्हीके’च्या पहिल्या राज्य अधिवेशनात हजारो कार्यकर्त्यांना शपथ दिली होती.
डॉ. के. टी. प्रभू
व्यवसायाने दंतवैद्य असलेले मात्र विजय यांच्या विश्वासातील एक प्रमुख नाव आहे. करैकुडी मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला. ‘एनटीके’ प्रमुख व अभिनेता-निर्देशक सीमॅन यांचा पराभव केल्यामुळे प्रभू यांच्याभोवती माध्यमांचे लक्ष गेले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.