रोपळेला मिळाला शेतरस्त्यांचा वारसा . . . !   वर्धापनदिन लेख

रोपळेला मिळाला शेतरस्त्यांचा वारसा . . . ! वर्धापनदिन लेख

Published on

फोटोओळी :
रोपळे बुद्रूक (ता. पंढरपूर) : येथे मोजणी नकाशे समोर ठेवून ग्रामस्थांशी थेट संवाद साधून वाद मिटवताना शिवाजीराव भोसले.
.............
रोपळेला मिळाला शेतरस्त्यांचा वारसा...!
.............
ग्रामीण विकासाच्या इतिहासात काही कार्ये अशी असतात की ती योजनांच्या चौकटीपलीकडे जाऊन पुढील पिढ्यांसाठी विकासाचा वारसा ठरतात. रोपळे बुद्रूक (ता.पंढरपूर) येथील शेतरस्त्यांचे काम हे असेच एक दुर्मिळ आणि महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद घेण्यासारखे उदाहरण आहे. या परिवर्तनामागे रोपळे गावचे सुपुत्र आणि सध्या कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख अधिकारी म्हणून कार्यरत असलेले शिवाजीराव भोसले यांचे दूरदृष्टीचे नेतृत्व ठळकपणे दिसून येते.
......
मोहन काळे, रोपळे (बु.)
......
शेतरस्ते हा ग्रामीण भागातील कायमस्वरूपी जिव्हाळ्याचा, पण तितकाच वादग्रस्त विषय मानला जातो. मात्र शिवाजीराव भोसले यांनी हा प्रश्न अधिकाराच्या बळावर नव्हे, तर विश्वास, संवाद आणि सामूहिक समजदारीच्या जोरावर मार्गी लावला. शासनाने अलीकडेच शेतरस्त्यांसाठी स्वतंत्र योजना जाहीर केली असली, तरी रोपळे बुद्रूकमध्ये ही कामे शासनाच्या निर्णयाच्या आधीच पूर्ण झाली होती. त्यामुळे हे काम काळाच्या पुढे चालणाऱ्या प्रशासनाचे उदाहरण ठरते.
या विकासामागे शिवाजीराव भोसले यांना प्रेरणा मिळाली ती ग्रामविकासाचे मॉडल तयार करणारे माजी सनदी अधिकारी तथा रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांच्या विचारातून. दळवी यांनी मांडलेला लोकसहभागातून विकासाचा आदर्श स्वीकारून, शिवाजीराव भोसले यांनी तो आपल्या जन्मगावी प्रत्यक्षात उतरवला. त्यामुळे रोपळे बुद्रूक हे गाव केवळ लाभार्थी न राहता, एक अभ्यासयोग्य विकास मॉडेल बनले. विशेष बाब म्हणजे, श्री. भोसले यांनी आपल्या सुट्टीच्या दिवसांत तब्बल ५० दिवस स्वतः उन्हात उभे राहून ग्रामस्थांच्या अडचणी ऐकून घेतल्या. अतिक्रमण काढताना नव्याने शासकीय मोजणी न करता. यापूर्वी अस्तित्वात असलेल्या मोजणी नकाशांचा आधार घेण्यात आला. कोणताही पोलिस बंदोबस्त न ठेवता, प्रशासनाचा थेट हस्तक्षेप न होता आणि एकही किरकोळ वाद न घडता काटेरी झुडपे व अतिक्रमणे काढून रस्ते मोकळे करण्यात आले. भूमिधारकांच्या सामूहिक शहाणपणातून घडलेले हे कार्य ग्रामीण महाराष्ट्रात अपवादात्मक ठरले आहे.
या उपक्रमात उपसरपंच विलास भोसले, माजी उपसरपंच हनुमंत कदम, तत्कालीन ग्रामपंचायत सदस्य कै. अनिल कदम, तसेच संजय रितोंड, दीपक भोसले, रावसाहेब कदम, सतीश भोसले, अमित
भोसले, महादेव बिस्किटे, महादेव रोकडे, परमेश्वर गणगे, रामभाऊ शितोळे, भारत व्यवहारे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. निधी उपलब्ध करून देण्यासाठी हर्षल कदम व नितीन कदम यांनी पाठपुरावा केला. तसेच तत्कालीन आमदार बबनदादा शिंदे आणि प्रशांत परिचारक यांच्या सहकार्यामुळे विविध योजनांतून सुमारे एक कोटी रुपयांचा निधी गावात आणता आला. लोकवर्गणी व श्री. भोसले यांनी स्वतः चार-पाच लाख रुपये खर्च केले. यातून रस्ते मजबूत केले. सन २००६-०७ मध्ये रोपळे ते जुना खंडाळी रस्ता यशवंतराव चव्हाण ग्रामसमृद्धी योजनेतून पूर्ण करण्याचा अनुभवही या कामासाठी मार्गदर्शक ठरला. या शेतरस्त्यांमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले. शेतापर्यंत थेट वाहन पोहोचू लागले. पीकपद्धती बदल होऊन ऊस व केळी यांसारख्या नगदी पिकांची लागवड वाढली. शेतात घरे बांधली जाऊ लागली. मुलांच्या शिक्षणासाठी मार्ग सुलभ झाले. जमिनीच्या किमती वाढल्या आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गावातील वाद संपून गुन्हेगारी शून्यावर आली. रस्ता हा विकासाचा मार्ग आहे, हे रोपळे बुद्रूकने कृतीतून सिद्ध केले. शिवाजीराव भोसले यांच्यासारखे अधिकारी गावोगाव उभे राहिले तर महाराष्ट्र राज्य शेत रस्त्यांच्या बाबतीत नंबर एकवर राहील. शिवाजीराव भोसले यांनी गावाला दिलेला हा शेतरस्त्यांचा वारसा म्हणजे केवळ वर्तमानाचा विकास नाही, तर पुढील पिढ्यांसाठी ठेवलेली स्वाभिमानाची, एकोप्याची आणि प्रगतीची ठेव आहे.
- -
कोट :
गावाला चांगले रस्ते असतील तरच गावचा विकास होतो. त्याप्रमाणे शेतकऱ्यांचा विकास हा शेतरस्त्यांमुळेच होत असतो म्हणून आम्ही शेतरस्त्यांच्या कामांना प्राधान्य दिले.
- शिवाजीराव भोसले, जिल्हाअधिक्षक भूमिअभिलेख अधिकारी, कोल्हापूर
(रोपळे गावचे सुपुत्र)
- -
ठळक बाब
- शासनाच्या योजनेआधीच सुरू झाली शेतरस्त्यांची कामे
- पोलिस, सक्ती, प्रशासनाशिवाय शेतरस्ते अतिक्रमणमुक्त
- अधिकारी स्वतः ५० दिवस उन्हात उभा राहून सोडविल्या अडचणी
- चंद्रकांत दळवी यांच्या विचारांवर आधारित मॉडल
- सुमारे एक कोटी शासन निधी अन् लोकसहभागातून रस्त्यांची चळवळ उभी

...............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com