दिवाळी भेटवस्तू खरेदीसाठी लगबग

दिवाळी भेटवस्तू खरेदीसाठी लगबग

स्वारगेट, ता. ३ ः दिवाळीनिमित्त नातेवाईक, मित्रमंडळींना, लहान मुलांना भेटवस्तू देण्यासाठी आकर्षक आणि विविध वस्तू बाजारपेठेत दाखल झाल्या असून, त्यांच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढत आहे. भेट वस्तूंमध्ये सुकामेवा, मिठाई, चॉकलेट, शो-पीस, कपडे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आदींना विशेष मागणी आहे.

भेटवस्तू देण्यासाठी दैनंदिन जीवनात वापरता येतील, अशा वस्तू खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल आहे. वेगवेगळ्या स्वादाचे चॉकलेट बॉक्स, सुकामेवा, स्वयंपाक घरातील इलेक्ट्रॉनिक साहित्य, सजावटीचे साहित्य यांना जास्त मागणी असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. सोन्या-चांदीचे दागिने, चांदीच्या ताट वाटीचा सेट, छोटे स्पीकर, परफ्यूम, अत्तर, डिजिटल फोटो फ्रेम, सजावटीचे शो-पीस, दुचाकी-चारचाकी वाहनांचे मॉडेल, लहान मुलांसाठी इलेक्ट्रिक खेळणी या भेटवस्तूंनाही चांगली मागणी आहे. स्मार्टफोन, हेडफोन, लॅपटॉप, टॅब, पॉवर बँक, पेनड्राइव्ह या वस्तूही युवकांच्या दैनंदिन जीवनात महत्त्वाच्या झाल्या आहेत. त्यांचीही खरेदी करून त्या भेट वस्तू देण्याचा ‘ट्रेंड’ आता रूढ झाला आहे.

दररोजच्या वापरातील वस्तूंशिवाय काचेच्या हंड्या, भिंतीवर लावण्यासाठी चित्रे, हॅप्पी मॅनचा पुतळा, फॅन्सी लहान-मोठ्या मूर्ती, डेकोरेटिव्ह डायनिंग मॅट आदी वस्तूही ग्राहक खरेदी करत आहेत.

‘‘इलेक्ट्रॉनिक वस्तूंना मागणी वाढली आहे. दैनंदिन वापरातील वस्तूंवर ग्राहकांचा भर असून, त्या भेट देण्यासाठी प्राधान्य देत आहेत.’’
- परेश शहा, निखिल इलेक्ट्रिकल्स

‘‘फोटो फ्रेम, भिंतीवरील घड्याळे, क्रॉकरी सेट, कलाकुसर केलेले शो-पीस आदी भेट वस्तू म्हणून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात ग्राहक विकत घेतात. त्यात वैविध्यही असल्यामुळे निवडीला अनेक पर्याय आहेत.’’
- राजेश जैन, सम्राट गिफ्ट हाऊस

‘‘बाजारपेठेत सध्या बहुविध पर्याय उपलब्ध आहेत. विशेषतः प्रत्येकाच्या बजेटनुसार भेटवस्तू मिळत आहेत. कपडे, घड्याळे, मिठाई अशा गोष्टींना आम्ही प्राधान्य देतो.’’
- हृषिकेश गव्हाणे, ग्राहक
-------------------------------
फोटो ः 80361, 80362

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com