नरभक्षक बिबट्याचा गोळीबारात मृत्यू पिंपरखेडमधील घटना ः ‘डार्ट’ अयशस्वी ठरल्याने बिबट्या चवताळला
टाकळी हाजी, ता. ५ : पिंपरखेड (ता. शिरूर) येथे मंगळवारी (ता. ४) रात्री साडेदहाच्या सुमारास नरभक्षक बिबट्याचा गोळीबारात मृत्यू झाला. शार्प शूटर टीमने बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी आधी ‘डार्ट’ मारला होता. परंतु तो अयशस्वी ठरला. त्यामुळे बिबट्या चवताळून टीमवर हल्ला करीत होता. अखेर शार्प शूटरने गोळी झाडली आणि चवताळणारा बिबट्या क्षणात जमिनीवर कोसळला.
पिंपरखेड, जांबूत या दोन गावांत गेल्या २० दिवसांमध्ये दोन चिमुरड्यासह एका ज्येष्ठ महिलेचा जीव गेल्याने मोठ्या प्रमाणात जनक्षोभ उसळला होता. २ नोव्हेंबरला संतप्त जमावाने वनविभागाचे गस्ती वाहन तसेच येथील स्थानिक बेस कॅम्प इमारत पेटवून दिली होती. तसेच पुणे-नाशिक महामार्ग सुमारे १८ तास रोखून धरला होता. त्यामुळे प्रशासनावरील दबाव वाढला होता. सोमवारी (ता. ३) नरभक्षक बिबट्यास जेरबंद किंवा ठार करण्यासाठी पुण्याचे वनसंरक्षक आशिष ठाकरे यांनी तातडीने
मुख्य वनसंरक्षकांची परवानगी घेतली होती. बिबट्याला जेरबंद किंवा ठार करण्यासाठी वन विभागाने रेस्क्यू संस्था, पुण्याचे पशू चिकित्सक डॉ. सात्त्विक पाठक तसेच जुबिन पोस्टवाला व डॉ. प्रसाद दाभोलकर या दोन शार्प शूटरसह वनविभागाची टीम घटनास्थळी तळ ठोकून होती.
तीन थर्मल ड्रोनच्या माध्यमातून मंगळवारी रात्री (ता. ४) बिबट्याचा शोध घेतला. रोहन बोंबे याच्या घरापासून सुमारे ५०० मीटरवर बिबट्या दिसला. शार्प शूटर टीमने त्यास बेशुद्ध करण्यासाठी डार्ट मारला; परंतु तो अपयशी ठरला. बिबट्या शरीराने धिप्पाड होता. त्याने शार्प शूटरवरही अनेकदा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. अखेर शार्प शूटरने रात्री साडेदहाच्या सुमारास गोळी झाडली आणि चवताळणारा बिबट्या जमिनीवर कोसळला.
नरभक्षक बिबट्याचे शव पिंपरखेड येथील ग्रामस्थांना दाखविण्यात आले. त्यानंतर शवविच्छेदनासाठी माणिकडोह बिबट निवारा केंद्र येथे हलविण्यात आले. हा नर बिबट्या ६४ किलोचा होता, अशी माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली. पुणे वनसंरक्षक आशिष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली जुन्नर उपवनसंरक्षक प्रशांत खाडे, साहाय्यक उपवनसंरक्षक स्मिता राजहंस व अमृत शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे व रेस्क्यू संस्थेचे सदस्य यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने ही कारवाई यशस्वी केली.
वीस दिवसांत तिघांचा बळी
तारीख***नाव***वय
१२ ऑक्टोबर*** शिवन्या शैलेश बोंबे*** ५ वर्षे ६ महिने
२२ ऑक्टोबर***भागूबाई रंगनाथ जाधव***८२
०२ नोव्हेंबर***रोहन विलास बोंबे***१३
‘‘रोहनला बिबट्याने जिथे ओढत नेले. त्या ठिकाणापर्यंत बिबट्यांच्या पावलांचे ठसे रेस्क्यू टीमने घेतले होते. ते ठसे व ठार झालेल्या बिबट्यांचे ठसे जुळले आहेत.
-निळकंठ गव्हाणे, वनपरिक्षेत्र अधिकारी
‘‘या पूर्वी २०२० मध्ये करमाळा (जि. सोलापूर) परिसरात अशीच कारवाई केली होती. त्या परिसरात १९ नागरिकांना नरभक्षक बिबट्याने ठार मारले होते. या मोहिमेत ४५० वन अधिकारी, कर्मचारी हे हेलिकॉप्टरसह तैनात होते. त्या मोहिमेत डॉ. चंद्रकांत मंडलीक यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम केले आहे. त्यानंतर ही कारवाई केली.
- डॉ. धनंजय कोकणे, मानद वन्य जीवरक्षक, पुणे
फोटोः 0756
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

