तासवडे टोलनाका : असुविधांच्या गर्तेत अडकलेली प्रवाशांची गैरसोय
तासवडे टोलनाका असुविधांचा अड्डा
गगनचुंबी खांबावरील हायमास्ट दिवे उभारणीपासून बंद; वाहतूक कोंडीही त्रासाची
संतोष चव्हाण : सकाळ वृत्तसेवा
उंब्रज, ता. १५ : पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील तासवडे टोलनाका परिसरातील प्रवास आता नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे. रात्रीच्या वेळी प्रकाशासाठी उभारलेल्या गगनचुंबी खांबांवरील हायमास्ट दिवे सुरुवातीपासून बंद असल्याने टोलनाका परिसरात अक्षरशः अंधाराचे साम्राज्य पसरलेले आहे, तर शौचालयांची वाणवा, रस्त्यावरील खड्डे, टोलप्लाझा जवळील वाहतूक कोंडी अशा ढिसाळ नियोजनामुळे राष्ट्रीय महामार्ग ‘असुविधांचा अड्डा’ बनला असल्याचे स्थानिक नागरिकांसह वाहनधारकांतून बोलले जात आहे.
कोल्हापूर- सातारा महामार्गावरील तासवडे टोलनाक्यावर प्रवाशांना भेडसावणाऱ्या गैरसोयीची यादी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. रात्रीच्या वेळी पुरसा प्रकाश मिळावा म्हणून, गगनचुंबी खांब उभारले गेले; परंतु त्यावरील हायमास्ट दिवे उभारणीपासूनच बंद असल्याने, टोलनाक्याच्या परिसरात अक्षरशः अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे महामार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांना टोल प्लाझा आल्याचेही लवकर लक्षात येत नाही. अशावेळी अचानक समोर दिसणाऱ्या बॅरिकेडमुळे अपघाताचा धोका वाढला आहे. टोलनाक्याजवळ वाहनांची लांबलचक रांग लागल्याची स्थिती कायमच राहात आहे. टोलबूथवरील कमी गेट्स, धीम्म्या गतीने होणारी टोलवसुलीची प्रक्रिया यामुळे वाहनचालक त्रस्त होतात. त्यातच पावसाळ्यापासून उघडे पडलेले खड्डे आणखी धोकादायक झाले असून, वाहनचालकांना अक्षरश: तारेवरची कसरत करावी लागत आहे.
गंभीर बाब म्हणजे, टोलनाक्यावरील शौचालयाची व्यवस्था पूर्णपणे ठप्प आहे. प्रवाशांसाठी वापरता येईल, असे स्वच्छतागृहच नाही. जे काही अवशेष उरले आहेत ते देखील मोडकळीस, दुर्गंधीयुक्त आणि वापरायच्या अगदीच अयोग्य अवस्थेत आहेत. त्यामुळे महिला प्रवासी, ज्येष्ठ नागरिक, लांब पल्ल्याचे चालक यांना तीव्र त्रास सहन करावा लागत आहे.
..........................................
सुविधांकडे दुर्लक्ष का?
टोल घेताना जेवढा उतावळेपणा दाखवला जातो, तेवढा प्रवाशांना सुविधा उपलब्ध करण्याबाबत का दाखवला जात नाही, असा प्रश्न सामान्य प्रवासी आणि स्थानिकांकडून होत आहे. टोलनाक्यावरून दररोज लाखो रुपयांचे उत्पन्न असताना मूलभूत रस्ता दुरुस्ती, प्रकाशयोजना किंवा वाहतूक शिस्त याकडे दुर्लक्ष का? असा सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे.
..............................................
सद्यःस्थिती अशी...
टोलनाक्यावरील गेट्सची अपुरी संख्या
वाहतूक नियंत्रणासाठी कर्मचारीच नसणे
रात्रीच्या वेळी योग्य प्रकाशयोजना नसल्याने चोऱ्यांचेही प्रकार
टोलनाक्याच्या काही मीटर आधी रस्ता खोलगट आणि खड्ड्यांनी भरलेला रस्ता
खड्ड्यांमुळे वाहनांचा अचानक ब्रेक लावण्याने मागून येणाऱ्या वाहनांच्या अपघातात वाढ
रात्री खड्ड्यांची दृश्यता कमी होत असल्याने अपघातांच्या धोक्यात वाढ
-------------------------------------------------
फोटो :.............00701
तासवडे टोलनाका : खांबांच्या उभारणीपासूनच बंद अवस्थेत असलेले हायमास्ट दिवे.
-----------------------------------------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

