
वाहतूक कोंडीचे नवे स्पॉट!
खडकवासला, ता. ६ : शहराच्या पश्चिम बाह्यवळण महामार्गावर चांदणी चौक, वारजे, नवले पूल येथे वाहतूक कोंडीचे नवे स्पॉट तयार झाले आहेत. संध्याकाळ सहा ते रात्री ११ वाजेपर्यंत महामार्गावर खासगी प्रवासी बस पाच-दहा मिनिटांचा हॉल्ट घेतात. त्यात प्रवाशांची चढ-उतार होते. येथे जास्त रहदारीमुळे वाहतूक कोंडी होते अन चांदणी चौकाच्या दिशेने वाहनांच्या रांगा लागत असल्याचे पाहणीत आढळले.
मुठानदीच्या पुलाजवळ वारजे ओढ्यावरील पुलाचे काम ८-१० वर्षांपूर्वी होणे गरजेचे होते. ते आता सुरू झाले. पण काम रेंगाळलेले आहे. महामार्गाच्या तीन व सेवा रस्त्याची दोन लेन अशा पाच लेन अवघ्या दोन-अडीच लेनमधून जातात. परिणामी दररोज हजारो नागरिकांना येथील वाहतूक कोंडीचा फटका बसतोय. चांदणी चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी किंवा नऱ्हे येथील नवले पूल येथे महामार्ग प्राधिकरण व स्थानिक सरकारी यंत्रणा एकत्र येते. तसे येथील वाहतूक कोंडी फोडण्यास कधी मुहूर्त लागणार, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहे.
चांदणी चौक
१) प्रकल्पाचे काम सुरु आहे. धरमसी माइल्सस्टोन इमारतीच्या ठिकाणी सातारा बाजूला खासगी एसटी, पीएमपी बसचा थांबा आहे. तेथे रस्ता रुंद आहे. पण मुंबई, मुळशी, पाषाणकडून येणाऱ्या खासगी बस व राज्य परिवहन मंडळाच्या एसटी बस थांबतात. सर्वच बसचे प्रवासी चढ-उतार करतात. गर्दीच्या वेळी म्हणजे संध्याकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत वाहतूक कोंडी होते.
२) जुने कोथरूड जंक्शनला महामार्गाची रुंदी कमी आहे. कोथरूडकडे जाणाऱ्या वाहनांचा वेग कमी होतो. परिणामी वाहतूक कोंडी होते.
३) तेथून पुढे आल्यावर कोथरूडकडून (श्रुंगेरी मठ) येणारा सेवा रस्ता मिळतो तेथे वाहतूक वेग मंदावतो.
नवले पूल
१) महामार्गावरून वारजेकडून येणारी आणि सिंहगड रस्त्यापासून सेवा रस्ता सुरु होतो त्या दोन दिशेने येणारी वाहने, चांदणी गार्डन जवळ एकत्र येतात.
२) महामार्ग व सेवा रस्ता एकत्र होतो. दोन्ही वाहने २०० मीटरमध्ये एकमेकांत मिसळतात. वाहने X अक्षरा प्रमाणे लेन क्रॉसिंग होऊन सातारा व कात्रज अशा दोन बाजूला जातात.
३) वाहतूक वेग मंदावणे आणि वाहतूक कोंडी होते. क्रॉसिंगवर झाडाखाली खासगी प्रवासी व बस थांबलेल्या असतात. ४) एका बस कंपनीने आतील बाजूस थांबा केला आहे. बस आत व बाहेर येताना महामार्ग व सेवा रस्त्यावरील वाहतूक वेग मंदावतो.
सनसिटी
१) वारजे थांबा घेतल्यावर फक्त मुठा नदी ओलांडली की, सनसिटी फाटा येथे काही बस थांबतात. येथे रस्त्यालगत थांबण्यास महामार्गालगत हॉटेल, ऑफिस, विक्रेते नाहीत. येथील मुख्य रस्त्याचे फल विक्रेते हटविले आहेत. येथे प्रवासी जास्त येत नाहीत. परिणामी येथे जास्त वेळ बस थांबत नाहीत. मागील आठवड्यात शनिवारी रात्री साडेनऊ वाजता तीन विविध ट्रॅव्हल कंपनीच्या गाड्या पाच मिनिटे थांबल्या होत्या.
वारजे
१) सातारा मार्गावर मुठा नदीपुलाच्या अलीकडे वाहतूक कोंडीचा मोठा स्पॉट झाला आहे.
२) वारजे उड्डाणपूल उतरल्यावर सेवा रस्ता येथे महामार्गात मिसळतो. येथे तीन-चार हॉटेल, चहाची टपरी, पानाच्या दोन टपऱ्या, पंक्चरचे दुकान, फर्निचरचे दुकान आणि ट्रॅव्हलचे ऑफिस आहे. दुकाने पूर्वी रस्त्यालगत पुढे होती. कारवाई झाल्यानंतर आता मागे घेतली आहे. दुकान, हॉटेलच्या पार्किंगनंतर उरलेल्या जागेत सेवा रस्ता महामार्गाला जुळतो. येथे अन्य वाहने पार्किंगमध्ये असताना दुकानांच्या समोर खासगी प्रवासी बस थांबतात.
३) पाहणीच्या वेळी रात्री सव्वानऊ वाजता वेळी येथे तीन बस थांबलेल्या होत्या. तेथे थांबायला जागा नाही म्हणून उरलेल्या पाच ते
सहा बस उड्डाणपुलाच्या उतारावर एका मागे एक थांबलेल्या होत्या.
४) गर्दी संध्याकाळी सहा ते रात्री साडेदहा अकरापर्यंत असतो. त्यातील साडेसहा ते आठ वाजेपर्यंत मोठी गर्दी असते. (यावेळी हिंजवडीचे आयटीचे कामगार सुटल्या गर्दीची वेळ) त्यानंतर आठ ते नऊ वाजण्याच्या दरम्यान १५- २० टक्के वाहने कमी होतात. त्यानंतर, नऊ ते रात्री १० पर्यंत वाहनांची गर्दी वाढते. वाहतूक पोलिस आठ वाजेपर्यंत असतात. गर्दीच्या वेळी एक मिनिटाला १०० दुचाकी, सव्वा दोन मिनिटाला १०० कार, दोन मिनिटाला ट्रक- टेंपो बस अशी जड वाहने ३० जातात.
५) येथील सर्व बस सातारा, सांगली, कोल्हापूर व गोव्याला जाणाऱ्या असतील. असे पाहणीच्या अगोदर वाटले. प्रत्यक्षात प्रामुख्याने सोलापूर, बार्शी, लातूर, नांदेड, उस्मानाबादकडे जाणाऱ्या बस जास्त थांबतात. वडगाव बुद्रुक, कात्रज मार्गे हडपसरला जातात.
६) आमच्याकडे कार थांबतात. बस थांब्याचा आम्हाला काहीच फायदा होत नाही. येथे बससाठी थांबलेले प्रवासी हॉटेलमध्ये येत नाहीत. जास्तीत जास्त पाण्याची बाटली घेतात, असे दुकानदारांनी सांगितले.
७) ओढ्यावरील पुलाचे काम सुरु आहे. पोलिस असल्यावर बस त्याच्यापुढे व नदीच्या अलीकडे थांबतात. नदी पुलावर सेवा रस्ता नाही. परिणामी वाहतूक कोंडी होते. महामार्ग देखभाल करणारी गाडी येथे येऊन गेली की, फळ विक्रेत्यांच्या गाड्या रस्त्यावर येतात.
रोज संध्याकाळी महामार्गावर चांदणी चौक ते सनसिटीपर्यंत वाहतूक खुपच संथ होते. जड वाहने यावेळी बंद करावीत. नदीच्या अलीकडे खूप गर्दी असते. ही कोंडी सोडविण्यासाठी सरकारी यंत्रणांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.
- सुधीर खिरीड, कामगार, आयटी कंपनी, निगडी
हिंजवडीला जॉब करतो. चांदणी चौकातील कोंडी आता सुटेल. आता वाकड बावधनपेक्षा वारजे परिसरातील गर्दी मोठी त्रासदायक आहे. अनेक वेळा एवढ्या टप्प्यात नदीच्या पुलावर वाहने बंद पडणे, अपघात होतात. कधी कधी अर्धा पाऊण तास वेळ येथे जातो.
- आत्माराम अमोघे, रहिवासी, धायरी नऱ्हे परिसर
रोज वारजे परिसरात कामासाठी येतोय. संध्याकाळी सेवा रस्त्याने गेल्यावर हायवेला जॉईन होताना वाहनांची बसची गर्दी असते. गर्दीत घुसताना जीव मुठीत घेऊन जावे लागते. वाहतुकीचे व्यवस्थापन झाले पाहिजे. बसला देखील थांबण्यास जागा दिली पाहिजे.
- सौरभ पाटील, रहिवासी, सिंहगड रस्ता
या स्पॉटला वाहतूक पोलिस असतो. येथे वाहतुकीला अडथळा करणाऱ्या बस आणि मोटारीवर आम्ही नियमित दंडात्मक कारवाई करतो. जानेवारीत आतापर्यंत तेथे २३ बसवर कारवाई केली आहे. येथे कोंडी झाल्यावर जादा कर्मचारी पाठवितो अन कोंडी सुरळीत करतो.
- विशाल पवार, सहायक पोलिस निरीक्षक, वारजे वाहतूक विभाग
ओढ्यावरील पुलाचे काम सुरू आहे. वाहतूक कोंडी होत असल्याने पुलाचे काम लवकर पूर्ण करण्यास सांगितले. नदीवर सेवा रस्ता करण्याचे नियोजन आहे. त्याची प्रक्रिया सुरू आहे. नदीवर पूल पूर्ण झाल्यावर येथे वाहतूक कोंडी होणार नाही.
- संजय कदम, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण