सोसायटीचे संचालक मंडळ बरखास्त

सोसायटीचे संचालक मंडळ बरखास्त

Published on

हडपसर, ता. ६ : वार्षिक सर्वसाधारण सभेत महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमामधील तरतुदीचे पालन करण्यात कसूर केल्यामुळे हांडेवाडी रस्ता येथील गंगा व्हिलेज सोसायटीचे संचालक मंडळ अपात्र ठरविण्यात आले आहे. पुणे शहर सहकारी संस्था-४ चे उपनिबंधक डी. एस. हौसारे यांनी ही कारवाई केली आहे. संचालक मंडळाला दोषी धरून त्यांच्यावर एक वर्ष सोसायटीची निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात आली आहे.
गंगा व्हिलेज सोसायटीमध्ये ६७२ सदनिका असून, सुमारे अडीच हजार लोकसंख्या आहे. संचालक मंडळाने २०१९-२० व २१ या दोन वर्षांत झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सहकारी संस्था अधिनियमाचे पालन केले नसल्याचा आरोप करत सभासद पोपट वाडकर यांनी संचालक मंडळावर कारवाई करण्याची मागणी उपनिबंधकांकडे केली होती. उपनिबंधक हौसारे यांनी केलेल्या चौकशीनुसार संचालक मंडळाकडून कर्तव्यात कसूर झाल्याचे निरीक्षण नोंदविले. त्यामुळे संचालक मंडळाला दोषी धरून बरखास्तीची कारवाई करण्यात आली आहे.

संचालक मंडळाच्या मनमानी कारभारामुळे सभासदांना त्रास सहन करावा लागत होता. अनेक सभासदांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात होता. या कारवाईमुळे न्याय मिळाला आहे. या सर्व सदस्यांना केवळ एक वर्ष नव्हे, तर पुढील पाच वर्षांसाठी निवडणूक बंदी घातली पाहिजे. या मागणीसाठी आम्ही उच्च न्यायालयात जाणार आहोत.
- पोपट वाडकर, फिर्यादी

सोसायटीच्या सर्वसाधारण सभेत अनियमितता आढळून आल्याने व कर्तव्यात कसूर केल्याचे चौकशीत समोर आले आहे. त्यामुळे गंगा व्हिलेज सोसायटीचे सर्व संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. या सर्वांना एक वर्षासाठी निवडणूक बंदीही घालण्यात आली आहे.
- डी. एस. हौसारे, उपनिबंधक, पुणे शहर सहकारी संस्था- ४

ज्या काळात या घटना घडल्या, त्यांच्याशी सध्याच्या संचालक मंडळाचा काहीही संबंध नाही. सोसायटीमध्ये पक्षीय राजकारण आणून अधिकाऱ्यांवर दबाव टाकून आम्हाला अपात्र ठरविण्यात आले आहे. हा निर्णय सर्वस्वी चुकीचा आहे. इतर सोसायट्यांबाबतही असा प्रकार घडू शकतो. त्यासाठी आम्ही नागरिकांमध्ये जागृती करू. या निर्णयाविरोधात आम्ही न्यायालयात जाणार आहोत. निश्चित न्याय मिळेल.
- योगेंद्र गायकवाड, अपात्र अध्यक्ष, गंगा व्हिलेज सोसायटी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.