जलपर्णी काढण्याचा वेग वाढवला

जलपर्णी काढण्याचा वेग वाढवला

वडगाव शेरी, ता. १२ : खराडीमध्ये आकाशात डासांची झुंड घोंघावत असल्याचे वृत्त सोमवारी ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर पुणे महापालिकेने आज नदीपात्रातील जलपर्णी काढण्याच्या कामाचा वेग आणखी वाढविला. नदीत विखुरलेली आणि अडकलेली जलपर्णी काढण्यासाठी स्पायडर मशिनसोबत दोन मोटर बोटची कुमकही आज वाढविण्यात आली.
यासोबतच नैसर्गिकरित्या जलपर्णी नष्ट करण्यासाठी यापुढे ‘बायो एन्झाइम’ वापरण्याचा विचारही सुरू केला आहे.

जलपर्णीमुळे खराडीकरांना डासांचा मोठा त्रास होत असल्याचे वृत्त ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर हा विषय पुणे महापालिका प्रशासनाने गांभीर्याने घेतला आहे. पर्यावरण अधिकारी मंगेश दिघे यांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडी येथील जलपर्णी काढण्यासाठी दोन मोटर बोटची मदत घेण्यात येत आहे. मोटर बोटीद्वारे नदीत जागोजागी अडकलेली जलपर्णी ढकलून स्पायडर मशिनजवळ आणली जाते. त्यामुळे खराडीतील जलपर्णी काढण्याचा वेग आजपासून आणखी वाढला.


जलपर्णी काढण्यासाठी ‘नवा प्रयोग’
पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी पाषाण तलावास भेट देऊन ‘बायो एन्जाइम्स’ वापरून नैसर्गिकरित्या जलपर्णी नष्ट करण्याच्या प्रयोगाची पाहणी केली. तसेच खराडीसारखा डासांचा प्रश्‍न पुणे शहरात इतरत्र उद्‍भवू नये म्हणून हा प्रयोग संपूर्ण शहरात कसा व्यवहार्य होईल, याची माहिती घेतली.
खराडी नदीपात्रासोबत कात्रज, पाषाण, जांभूळकर तलाव आणि मुळा-मुठा नदीत जलपर्णीची मोठी समस्या आहे. येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढते. शिवाय पोषक वातावरण तयार होऊन डासांची पैदास होते. त्यामुळे डासांचा त्रास सर्वांना सहन करावा लागतो. ही जलपर्णी हटविण्यासाठी महापालिकेचा दरवर्षी करोडो रुपयांचा निधी खर्च होतो. तरीही जलपर्णीची समस्या कायम राहते.
या समस्येचे निराकरण करण्यासाठी आठ दिवसांपूर्वी महापालिकेने पाषाण तलावात अनोखा प्रयोग सुरू केला आहे. या तलावातील पाण्यात बायो एन्झाइमची पाकिटे सोडून पाण्यातील चांगल्या बॅक्टेरियांच्या मदतीने जलपर्णीला आवश्यक घटक नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रयोगामध्ये पाण्याची ऑक्सिजन पातळीही वाढते. जलपर्णीचे खाद्य असलेले अशुद्ध घटक नष्ट झाल्यामुळे जलपर्णीचा नायनाट होतो. आठ दिवसांत पाषाण तलावातील जलपर्णी नष्ट व्हायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे पाषाण तलाव येथे या प्रयोगाचे सकारात्मक निष्कर्ष समोर आल्याचे अधिकाऱ्यांनी आयुक्तांना दाखवले.

आणखी आठ दिवसानंतर अंतिम निष्कर्ष समोर येतील. त्यानंतर हा प्रयोग पुणे शहरातील जलसाठ्यांत राबविण्याविषयी आणि त्याच्या व्यावहारिकतेविषयी महापालिका निर्णय घेणार आहे.
- दिलीप पावरा,
उपअभियंता, पर्यावरण विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com