मतदानाचा घसरलेला टक्का
कुणाला साथ देणार?

मतदानाचा घसरलेला टक्का कुणाला साथ देणार?

हडपसर विधानसभा
मतदानाचा घसरलेला टक्का
कुणाला साथ देणार?
कृष्णकांत कोबल
शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील व महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी लाखोंच्या आघाडीसह विजयाचा दावा केला आहे. दोन्ही उमेदवार हडपसर मतदारसंघातून आपल्यालाच आघाडी मिळेल, असे सांगत आहेत. मात्र, सर्वाधिक मतदार असलेल्या हडपसर मतदारसंघात उर्वरित पाच मतदारसंघाच्या तुलनेत सर्वांत कमी मतदानाची नोंद झाली. मतदानाचा घसरलेला हा टक्का, मोठ्या संख्येने मतदानासाठी उतरलेले सोसायटीतील मतदार आणि याद्यांमधील घोळ नेमका कुणाचा विश्‍वास सार्थ ठरवेल, याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे.
२०१४ च्या निवडणुकीत आढळराव यांनी विलास लांडे यांच्याविरोधात या मतदारसंघातून ५० हजारांवर आघाडी घेतली होती. गेल्यावेळी हडपसर विधानसभा मतदारसंघातून ४७.८४ टक्के मतदान झाले होते. त्यावेळी डॉ. कोल्हे यांनी आढळराव यांना मिळालेली आघाडी पाच-सहा हजारांवर आणून ठेवली होती. या वेळी या मतदारसंघात मतदानाचा टक्का घसरून तो ४७.७१ वर आला आहे. त्यामुळे हडपसर मतदारसंघातील लढाई पुन्हा अटीतटीची झाली आहे. जाणकारांच्या म्हणण्यानुसार या दोन्ही उमेदवारांमध्ये १० ते १५ हजारांचा फरक राहील. डॉ. कोल्हे यांचा करिष्मा कायम राहिला किंवा आढळराव यांना महायुतीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा ठाव घेता आला, तर त्यांना या आघाडीपर्यंत पोहचता येणार आहे.
आढळराव यांनी ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसमधून उमेदवारी घेऊन महायुतीतील येथील विद्यमान आमदार चेतन तुपे पाटील व माजी आमदार योगेश टिळेकर, शिवसेना शहरप्रमुख प्रमोद भानगिरे, आजी-माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना प्रचारात एकत्रित आणण्यात यश मिळवले. मांजरी, केशवनगर, हडपसर गाव, महम्मदवाडी, कोंढवा, कात्रज आदी भागातून त्यांना चांगली आघाडी मिळेल, असे चित्र आहे. तर डॉ. कोल्हे यांना स्वतःच्या प्रतिमेसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळत असलेली सहानुभूती, माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर व माजी आमदार महादेव बाबर, माजी महापौर प्रशांत जगताप, उपमहापौर नीलेश मगर, काही माजी नगरसेवक, पक्षफुटीमुळे दुखावलेले पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मोठी मदत झाली आहे.
मतदारसंघातील सुमारे सव्वा लाख मुस्लिम समाज व ७० हजारांवरील माळी समाज मोठ्या संख्येने डॉ. कोल्हे यांच्याकडे झुकलेला दिसत आहे. त्याचा फायदा मतदारसंघात आघाडी घेण्यासाठी कोल्हे यांना होईल, असे बोलले जात आहे.
मतदारांना विश्‍वासात न घेता घेतलेला पक्ष बदलाचा निर्णय, राज्यात पक्षफुटीच्या झालेल्या घटना याबाबत नाराजी व्यक्त करीत अनेक मतदारांनी मतदानापासून दूर राहणे पसंत केले. मतदार याद्यांमधील घोळ आणि उन्हाचा तडाखा, सामान्य मतदारांना बाहेर पडण्यास केलेली टाळाटाळ यामुळे मतदानाचा टक्का घसरलेला दिसून आला. त्याचवेळी सकाळी सोसायटीतील मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदानाचा हक्क बजावलेला दिसला. हा मतदार नेमका कोणाच्या बाजूने कौल देईल, यावर उमेदवारांच्या आघाडीचे गणित ठरणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com