कात्रज चौकाच्या पदरी पुन्हा निराशा

कात्रज चौकाच्या पदरी पुन्हा निराशा

कात्रज, ता. ७ : कात्रज चौकाच्या पदरी सातत्याने निराशा आल्याचे पाहायला मिळत आहे. चौकातील बहुचर्चित गुगळे प्लॉटच्या ४० गुंठे जागेसाठी महापालिका २१ कोटी ५७ लाख ६० हजार रुपये रोख मोबदला देणार असल्याची घोषणा आणि मंजुरी एक वर्षापूर्वी करण्यात आली होती. मात्र, वर्षभरानंतरही जागा ताब्यात घेण्यात महापालिकेला यश आले नाही. त्यामुळे चौकात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे बांधल्या जात असलेल्या उड्डाणपुलाचे काम रखडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. हा उड्डाणपूल बांधण्यासाठी ही ४० गुंठे जागा ताब्यात घेत वाहतूक वळविणे गरजेचे आहे. त्याशिवाय उड्डाणपुलाच्या समांतर जागेतील पिलरवर गर्डर टाकणे अशक्य असल्याचे दिसून येत आहे.
आधीच उड्डाणपुलाच्या कामाला विलंब झाला असून, २०२५ पर्यंत म्हणजेच एक वर्षाची मुदतवाढ या कामासाठी देण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित जागेचा प्रश्न तत्काळ सोडविण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
चौकातील सर्वे क्रमांक १/२ या भूखंडावर ३० मीटर रुंदीचा रस्ता आणि उद्यानाचे आरक्षण टाकले होते. ही जागा संजय गुगळे यांच्या मालकीची असून, योग्य मोबदला मिळावा, यासाठी त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. २०१७ च्या विकास आराखड्यात या जागेवर ३० ऐवजी ६० मीटरचा रस्ता प्रस्तावित करण्यात आला. उड्डाणपुलासोबतच कात्रज-कोंढवा रस्ता आणि पुणे-सातारा रस्त्याच्या रुंदीकरणासाठी ही जागा आवश्यक आहे. दरम्यान, गुगळे यांना रोख मोबदला देण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता. मात्र, पालिकेने ही रक्कम अजून दिली नसल्याने जागेचा ताबा गुगळे यांच्याकडेच आहे.

पालिकेकडून विलंब...
एक वर्षापूर्वी यासंदर्भात तत्कालीन अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी संबंधित अधिकारी आणि जागामालकांसोबत बैठक घेतल्यानंतर हा निर्णय झाला होता. त्यामुळे रखडलेल्या कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणालाही गती येण्यासह कात्रज चौक मोकळा श्वास घेण्याचा मार्ग सुकर होण्याची चिन्हे दिसत होती. परंतु, ढाकणे यांची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदली झाली आणि यंत्रणा ढिली पडली. त्यामुळे पुन्हा चौकाच्या पदरी निराशा पडली.

१४० कोटी रुपयांतून पैसे देता येणे अशक्य...
राज्य सरकारने कात्रज-कोंढवा रस्त्याच्या भूसंपादनासाठी १४० कोटी रुपयांचा निधी पालिकेला वर्ग केला आहे. मात्र, यातून संबंधित प्लॉटसाठी महापालिकेला पैसे देता येणे शक्य नाही. संबंधित निधी हा नवीन हद्दीसाठी आला असून, हा प्लॉट जुन्या महापालिका हद्दीत आहे.

केवळ मोजणीचे चलन काढण्यासाठी महापालिकेने अडीच महिन्याचा वेळ लावला आहे. आम्हाला महापालिकेवर विश्वास राहिला नाही. त्यामुळे कायद्यात एका तरतुदीनुसार शासनाच्या मध्यस्थीने भूसंपादन व्हावे. अधिकाऱ्यांकडून केवळ वेळकाढूपणा सुरु आहे. आम्हाला जेव्हा पैसे मिळतील, तेव्हा ही केस आपोआप संपेल आणि जागा ताब्यात जाईल.
संजय गुगळे, जागामालक

संबंधित प्लॉटचे भूसंपादन करण्याची प्रकिया अंतिम टप्प्यात आहे. लवकरच हा प्लॉट ताब्यात येणार असून, भूसंपादन विभागाकडून यावर युद्धपातळीवर काम सुरु आहे. यामुळे कुठल्याही प्रकारे उड्डाणपुलाचे काम थांबणार नाही.
अनिरुद्ध पावसकर, मुख्य अभियंता, पथविभाग

कात्रज ः येथील चौकातील रिकाम्या प्लॉटशेजारी सुरु असलेले उड्डाणपुलाचे काम.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com