स्वच्छतागृहाच्या नावाखाली महिलांची लूटच

स्वच्छतागृहाच्या नावाखाली महिलांची लूटच

समाधान काटे, अशोक गव्हाणे
पुणे, ता. ११ ः राज्य सरकारकडून सार्वजनिक ठिकाणची स्वच्छतागृहे लघुशंकेसाठी नागरिकांना मोफत असताना शहरातील एसटी स्थानकांवर मात्र प्रवाशांची लूट सुरू आहे. प्रत्येक ठिकाणी पुरुषांसह महिलांकडून ५ रुपयांपासून १० रुपयांपर्यंत पैसे घेतले जात असल्याचे धक्कादायक वास्तव ‘सकाळ’च्या प्रतिनिधींनी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून समोर आले आहे.
दरम्यान, याची माहिती संबंधित आगारप्रमुखांना दिली असता, त्यांनी सुरुवातीला असे प्रकार होत नसल्याचा दावा केला. मात्र सकाळच्या प्रतिनिधींनी घडलेल्या प्रकारांचे व्हिडिओ दाखविल्यानंतर मात्र त्यांनी कारवाईचा पवित्रा घेतला.
शहरात स्वारगेट आणि वाकडेवाडी या ठिकाणी एसटीची दोन मोठी बसस्थानके आहेत. दररोज येथे १ हजार बसची ये-जा असून, लाखो प्रवाशांची वर्दळ असते. मात्र येथील स्वच्छतागृहात त्यांची लूट केली जात आहे. शासनाच्या नियमानुसार लघुशंकेसाठी स्वच्छतागृहे मोफत असताना येथे सरसकट पैसे उकळले जात आहेत. महिलांच्या कक्षात महिला कर्मचारी न ठेवता पुरुष ठेवून एक प्रकारे या लुटीत आणखीन भर पाडण्याचे काम संबंधित काम पाहणाऱ्या खसगी ठेकेदाराकडून सुरू आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने राज्यातील सर्व स्वच्छतागृहे कंत्राटी पद्धतीने चालविण्यास दिली आहेत. तसेच त्यांना स्वच्छतागृहातील शौचालय आणि स्नानगृहाचे दर ठरवून दिले आहेत. मात्र प्रत्यक्षात सरसकट दुप्पट दर आकारून प्रवाशांची लूट केली जात असल्याचे ‘सकाळ’च्या पाहणीत उघड झाले आहे.
...........
वाकडेवाडी बसस्थानक
वार ः बुधवार
पाहणीची वेळ ः दुपारी १२. १३
- दररोजची प्रवासी संख्या ः १४ हजार
- बसची संख्या ः ५००
- स्थानकाचे उत्पन्न ः ३० लाख (सवलतीसह दररोज)

अशी आहे अवस्था
- महिला स्वच्छतागृहात स्वतंत्र महिला कर्मचारी नसल्याने महिलांची मोठी गैरसोय
- येथील पुरुष कर्मचाऱ्याकडून सर्वच महिलांसह पुरुषांकडून पाच ते सात रुपये घेतले जातात
- स्वच्छतागृहात मुतारीचा वापर केला तरी पाच रुपयांची मागणी केली जाते
- महिलांचा शौचालय आणि लघुशंका कक्ष एकच असल्याने सरसकट लूट सुरू
- सरकारच्या नियम व अटींकडे संबंधित खासगी कंपनीचे दुर्लक्ष
- मुतारीसाठी पैसे द्यावे लागत नाहीत, हे कित्येक महिलांना माहीत नाही
- सरसकट पैसे घेतले जात असल्याने लाखो रुपयांचा गल्ला होतोय जमा
.....
काय आहेत शासनाचे नियम
- सर्वांना लघुशंकेसाठी स्वच्छतागृह (मुतारी) मोफत
- अपंग व्यक्ती व १२ वर्षांखालील मुला-मुलींना शौचालय, स्नानगृह, लघुशंकेसाठी स्वच्छतागृह मोफत
- स्वच्छतागृहाच्या बाहेर आणि आवारात ४ बाय ३ फूट आकाराचे फलक लावणे
- महिला कक्षात स्वतंत्र महिला कर्मचारी ठेवणे
- शासनाने ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा अधिक रक्कम घेतल्यास चौकशी करून दंडात्मक कारवाई

आगार व्यवस्थापकांनी विचारला जाब
स्वच्छतागृहात सरसकट महिलांकडून पैसे गोळा करताना ‘सकाळ’च्या प्रतिनिधीने व्हिडिओ काढला. त्यानंतर तो वरिष्ठ आगार व्यवस्थापक क्षानेश्वर रणवरे यांना दाखविण्यात आला. रणवरे यांनी संबंधित स्वच्छतागृहाची व्यवस्था पाहणाऱ्या व्यक्तीला जाब विचारला. मात्र त्यांनी सरसकट पैसे घेत नसल्याचे दावा केला.

पैसे गोळा करायला पुरुष असल्याने फक्त मुतारीचा वापर केला आहे, असे महिला त्या व्यक्तीला सांगू शकत नाही. काही महिला सॅनिटरी पॅड बदलण्यासाठी स्वच्छतागृहात जातात. त्यांच्याकडूनदेखील पैसे मागितले जातात. स्वच्छतागृहात महिला कर्मचारी असायला हव्यात. सरसकट पैशांची मागणी करणे योग्य नाही.
- दीपा चव्हाण, प्रवासी

स्वच्छतागृहात मुतारीचा जरी वापर केला तरी पैसे मागितले जातात. आधीच तेथे घाणीचे साम्राज्य असते. त्यात अशी लूट किती योग्य आहे.
- इश्वरी पाटील, प्रवासी

.................
स्वारगेट बसस्थानक
वार ः गुरुवार
पाहणीची वेळ ः दुपारी १.००
- दररोजची प्रवासी संख्या ः १२ हजार
- महिला प्रवाशांची प्रतिदिन संख्या ः ५ ते ६ हजार
- बसच्या फेऱ्या ः १२००
- स्थानकाचे प्रतिदिन उत्पन्न ः २५ लाख

अशी आहे अवस्था
- महिला व युवतींकडून सरसकट ५ रुपयांची आकारणी
- पुरुषांकडून १० रुपये घेतले जात होते
- मोठ्या प्रमाणांवर दुर्गंधी आणि अस्वच्छता असल्याने महिलांची कुचंबणा
- नियम धाब्यावर बसवून महिलांकडून पैसे उकळले जातात
- पैसे घेऊनही स्वच्छता ठेवण्यात येत नाही
- नाईलाजाने महिलांकडून स्वच्छतागृहांचा वापर
- पैशांसाठी महिलांकडे अडवणूक केल्यासारखे प्रकार
- संपूर्ण स्वच्छतागृहासाठी एकच पुरुष कर्मचारी होता.

मी नुकताच आगारप्रमुख पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. याबाबत काही माहिती नाही. मात्र सखोल माहिती घेऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल. महिलांना कुठल्याही प्रकारे त्रास होणार नाही, याची काळजी घेण्यात येईल
- जयेश पाटील, आगारप्रमुख, स्वारगेट, बसस्थानक

स्वारगेट स्थानकातील स्वच्छतागृहात घाणीचे साम्राज पसरले आहे. महिलांना कोणताच पर्याय नसल्याने नाईलाजाने त्याचा वापर करावा लागतो. तसेच येथील पुरुष कर्मचाऱ्याकडून होणारी सरसकट पैशांची मागणी चुकीची आहे.
- रिया देसाई, प्रवासी

शिवाजीनगर : महिलांकडून सरसकट पैसे घेताना स्वच्छतागृहातील कर्मचारी.
स्वारगेट : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडाळाच्या स्वारगेट बसस्थानकातील स्वच्छतागृह.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com