मांजरीमध्ये महिलांचे 
बेमुदत धरणे आंदोलन

मांजरीमध्ये महिलांचे बेमुदत धरणे आंदोलन

Published on

मांजरी, ता. २८ : गाव महापालिकेत समाविष्ट होऊन, तीन वर्षे उलटून गेली आहेत. मात्र, मागणी करूनही येथील वसाहतींना गलिच्छ वस्ती निर्मूलन अंतर्गतसह इतरही सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे येथील रहिवास्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या बाबींकडे पालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी येथील महिलांनी दररोज दुपारी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.
मांजरी बुद्रुकमधील मांजराईनगर परिसरातील माळवाडी, कुंजीर वस्ती, वेताळ वस्ती, सटवाई नगर, राजीव गांधी नगर, ११६ घरकुल, बहात्तर घरकुल हा मागासवर्गीय व गोरगरीब नागरिक राहत असलेला झोपडपट्टीचा भाग गलिच्छ वस्ती म्हणून जाहीर करून, तिथे विविध समस्या निर्मूलन करण्याची गरज होती. या प्रमुख मागणीसह या भागामध्ये अंतर्गत चार इंची बिडाची पाइपलाइन टाकून घरगुती नळ कनेक्शन द्यावे, ठिकठिकाणी साचलेला कचरा त्वरित उचलावा, वापरण्याचे व पिण्याचे पाणी नियमितपणे द्यावे, कचरा गोळा करणाऱ्या स्वच्छ संस्थेने येथील रहिवाशांकडून शुल्क घेऊ नये, सरकारी नियमानुसार मागासवर्गीय झोपडपट्टीमधील मिळकत कर घेऊ नये, अशी मागणी येथील महिलांनी केली आहे. या मागण्यासंदर्भात पीर साहेब मंदिरात शनिवार (ता.२७) पासून दररोज दुपारी एक ते दोन या वेळेत बेमुदत धरणे आंदोलन चालू केले आहे.
जोपर्यंत वरील प्रश्न सुटणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवले जाईल, असा इशारा अखिल मांजराईनगर नागरिक कृती समितीच्या कार्यकर्त्या रोहिणी शेंडकर, सुनीता ढेकणे, कोमल कुंभार, रूपाली कुंभार, उल्का चव्हाण, उषा तिकीने, सावित्रा सावंत, संगीता माळी, संजीवनी जगताप, संगीता लोखंडे, पारूबाई भोकरे यांनी दिला आहे.
दरम्यान, हडपसर मुंढवा सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या गलिच्छ वस्ती निर्मूलन विभागातील कर्मचारी उदय वाढवे यांनी अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून आंदोलन स्थळी भेट देऊन, आंदोलकांच्या मागण्या समजावून घेतल्या. वरिष्ठांकडे आपल्या मागण्या मांडून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.
..................................

फोटो ः 72907

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com