कोयत्याने वार करून वडगावात तरुणाचा खून
सिंहगड रस्ता, ता. १७ : वडगाव येथील एका सोसायटीच्या पार्किंगमध्ये पाच जणांनी एका तरुणावर कोयत्याने वार करून आणि डोक्यात दगड घालून खून केला. ही घटना सोमवारी (ता. १७) दुपारी अडीचच्या सुमारास घडली.
सिंहगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील एका सोसायटीच्या पार्किंगमध्ये पाच जणांनी तौकीर रफीक शेख (वय २३, रा. धनकवडी) याचा खून केला आहे. मात्र याचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही.
मीनाक्षीपुरम सोसायटीजवळील कृष्णकुंज इमारतीच्या पार्किंगमध्ये तौकीर शेख बसला होता. तेथे पाच जण आले. त्यांनी कोयत्याने तौकीरवर वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर डोक्यात दगड घालून त्याचा खून केला. त्यानंतर हल्लेखोर फरारी झाले. यातील दोन आरोपी अल्पवयीन असल्याचे पोलिसांनी सांगितले. ज्या तरुणाचा खून झाला, त्याच्यावरही भारती विद्यापीठ आणि इतर पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

