पायाभूत सुविधांसह विकासकामे ठप्प

पायाभूत सुविधांसह विकासकामे ठप्प

Published on

प्रभाग १५ : मांजरी बुद्रूक-केशवनगर-साडेसतरानळी


मांजरी, ता. २० : चार वर्षांपूर्वी महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांपैकी मांजरी बुद्रूक व शेवाळेवाडीबरोबरच सात वर्षांपूर्वी समाविष्ट झालेल्या केशवनगर व साडेसतरानळी या चार गावांचा मिळून या प्रभागाची निर्मिती झाली आहे. महापालिकेतील समावेशानंतर या गावांमधील पायाभूत सुविधांसह विकासकामे खोळंबली आहेत. नागरिकरण वाढले असून १० झोपडपट्टी वसाहती, गावठाण व सोसायट्यांनी हा प्रभाग व्यापलेला आहे. दोन लाखांच्यावर लोकसंख्या येथे आहे. सोलापूर महामार्ग व अंतर्गत रस्ते कायमच वाहतूक कोंडीत अडकलेले असतात. प्रभागातील प्राथमिक शाळा दुरावस्थेत आहेत. स्मशानभूमीचा विकास रखडला आहे. दफनभूमी नाही. आजूबाजूला कचऱ्याचे ढीग अन् वीज व पाणीपुरवठा अपुरा तसेच विस्कळित आहे.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, द्राक्ष संशोधन केंद्र व फूल संशोधन केंद्र अशा राष्ट्रीय पातळीवरील संस्था, जागतिक स्तरावर नावाजलेली सिरम इन्स्टिट्यूट तसेच अमनोरा सिटीचा अंतर्भाव असलेल्या प्रकल्पांचा या प्रभागात समावेश आहे. याशिवाय कै. अण्णासाहेब मगर विभागीय बाजार समिती, ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र, कृषी विद्यालय, सुभाष सामुदायिक सोसायटी, साडेसतरानळी येथील वन संशोधन केंद्रही येथे आहे. काहीशी शेती, गायरान, वनविभाग व नागरी वस्ती अशा सुमारे अडीच-तीन हजार हेक्टर क्षेत्रावर हा प्रभाग विस्तारलेला आहे.


चतु:सीमा :
पूर्व : मुठा नदीपासून दक्षिणेकडे भाऊरावस्तीपर्यंत. कदमवाकवस्ती व प्रभागाला विभागणारा ओढा.
पश्चिम : प्रभाग क्रमांक १६ ची मगर महाविद्यालयापर्यंतची हद्द. पुढे श्रीराम इन्स्टिट्यूट ते अमनोरा टाऊनशिपपासून केशवनगर मुळा-मुठा नदीपर्यंत.
उत्तर : मुळा-मुठा नदीने मांजरी बुद्रूक नदीपुलापर्यंत.
दक्षिण : शेवाळेवाडी ते लक्ष्मीकॉलनीपर्यंतचा भाग.

समाविष्ट भाग :
केशवनगर गावठाण, लोणकरवस्ती, साडेसतरानळी, अमनोरा पार्क टाऊन, साठे वस्ती, महादेवनगर, घुले वस्ती, गोपाळपट्टी, चारवाडा, मुंढवा-मांजरी रोड, झेड कॉर्नर, अनाजी वस्ती, माळवाडी वसाहत, मांजरी गावठाण, भापकर मळा, मोरे वस्ती, मांजरी फार्म, हाक्के नगर, झगडे वस्ती, भवरा वस्ती, शेवाळेवाडी, भंडलकरनगर, मांजरी ग्रीन, पुणे-सोलापूर महामार्ग, कुमार मिडोज, अमरसृष्टी सोसायटी.

प्रमुख समस्या :
- अपुरा पाणीपुरवठा : प्रभागातील चारही गावांत अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. कुठे दिवसाआड तर कुठे चार-पाच दिवसांनी पुरवठा होतो. मांजरी-मुंढवा रस्ता, केशवनगर, साडेसतरानळी या भागात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई. उन्हाळ्यात टॅंकरने पाणी घ्यावे लागते. त्यासाठी सोसायट्यांना मोठा खर्च होतो.
- वाहतूक कोंडी : सोलापूर महामार्गावर फुरसुंगी फाटा, शेवाळेवाडी फाटा, विभागीय बाजार समिती, केशवनगर-मांजरी रस्ता, अण्णासाहेब मगर महाविद्यालय चौक, साडेसतरानळी रेल्वे फाटक आदी ठिकाणी वारंवार वाहतूक कोंडी होते.
- धोकादायक शाळा : भवरावस्ती, शेवाळेवाडी, भापकर मळा, गोपाळपट्टी, अनाजी वस्ती, साधुनानावस्ती, घुले वस्ती या महापालिका शाळा थेट रस्त्यालगत असल्याने अपघाताचा धोका.
- अरुंद रस्ते : शेवाळवाडी मुख्य रस्ता, भापकर मळा ते मांजरी गावठाण रस्ता, दरडीचा रस्ता, साडेसतरानळी-केशवनगर व
केशवनगर चौक ते मांजरी रस्ता, महादेवनगर आदी भागातील अंतर्गत रस्ते अरुंद असल्याने वाहतूक कोंडी.
- सांडपाणी वाहिन्यांचा अभाव : जुन्या व अपुऱ्या सांडपाणी वाहिन्या असल्याने रस्त्यावर पाणी ओसंडून वाहण्याचे प्रमाण मोठे. अनेक वाहिन्या थेट ओढ्यात व ओढ्यातून थेट नदीत मिळतात. काही भागांतील वाहिन्या बेबी कालव्यात सोडलेल्या आहेत.
- अतिक्रमणे : पुणे-सोलापूर महामार्ग, महादेवनगर-मांजरी रस्ता, मांजरी-केशवनगर रस्ता, साडेसतरानळी-पाइपलाइन रस्ता या भागात भाजीपाला, फळ-विक्रेते व दुकानदारांचे अतिक्रमण मोठ्या प्रमाणात आहे.
- अनधिकृत वाहनतळे : या संपूर्ण प्रभागात कोठेही अधिकृत पार्किंग व्यवस्था नाही. सम-विषम पार्किंगही नाही. त्यामुळे सर्वच प्रमुख रस्त्यांवर दोन्ही बाजूला अनधिकृतपणे वाहने लावली जात आहेत.
- कचरा प्रश्न : फुरसुंगी फाटा ते भापकर मळा, पुढे गावठाण, मोरे वस्ती रस्ता, फुरसुंगी रस्ता, दरडी रस्ता, घुले वस्ती ते साडेसतरानळी रस्ता, साडेसतरानळी-केशवनगर रस्ता, रंगीचा ओढा, मुळा-मुठा काठ व बेबी कालवा परिसरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसतात.

कोठे? काय?
- केशवनगर-मांजरी रस्ता, भापकर मळा, अनाजी वस्ती, दरडी, मगर महाविद्यालयामागील रस्ता, भवरावस्ती, शेवाळेवाडी, साडेसतरानळी-केशवनगर असे मुख रस्ते अरुंद.
- साडेसतरानळी झोपडपट्टी वसाहतीमध्ये वीज वाहिन्या धोकादायक व अपुरा पाणीपुरवठा.
- साडेसतरानळी रेल्वे फाटकावर वारंवार वाहतूक कोंडी, उड्डाणपुलाची गरज.
- मुळा-मुठा नदीवरील खराडी-केशवनगर जोडणारा पूल, मांजरी रेल्वे उड्डाणपूल, मुळा-मुठा नदीवरील नवीन पुलांची अंतिम टप्प्यातील कामे अपूर्ण.
- प्रभागातील चारही गावांत सार्वजनिक स्वच्छतागृहांची वाणवा.
- पुणे-सोलापूर महामार्गावर दोन्ही बाजूला फळे, भाजीपाला विक्रेते व पथारी व्यवसायिकांचे अतिक्रमण.
- केशवनगर ओढ्यावरील पुलाचे रुंदीकरण रखडल्याने चौकात व पुलावर कोंडी.
- साडेसतरानळी-रासकर चौक रस्ता डांबरीकरण किंवा काँक्रिटीकरण नसल्याने दुरवस्था.
- गोपाळपट्टी, घुले वस्ती, भापकर मळा, भवरा वस्ती पालिका शाळांच्या इमारती धोकादायक.
- परिसरातून जाणारा बेबी कालवा व मुळा-मुठा नदी काठ कचऱ्याच्या विळख्यात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com