
नवउद्योजकांना सर्वोतपरी सहकार्य
मार्केट यार्ड, ता. १२ : देशात उद्योग क्षेत्रात स्पर्धा सुरू आहे. महाराष्ट्र जास्तीत जास्त उद्योग उभारले पाहिजेत. यासाठी महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून नव उद्योजकांना सरकारकडून सर्वोतपरी सोई सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले.
जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनच्या (जितो) १७व्या वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ विधिज्ञ एस. के. जैन, जीतो श्रमण आरोग्यमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विजय भंडारी, जीतो पुणेचे अध्यक्ष राजेश सांकला, जीतो पुणे चॅप्टरचे मुख्य सचिव चेतन भंडारी, उपाध्यक्ष मनोज छाजेड, विनोद मांडोत उपस्थित होते.
सामंत म्हणाले, ‘‘एकत्र येऊन निर्णय घेणे, सध्याच्या काळात खूपच आवश्यक आहे. राजकारणात हुकूमशाही वाढत आहे. लोकशाही राजकीय पक्षात असती, तर आम्हाला गुवाहाटीला जावे लागले नसते. जेव्हा तुम्ही एखाद्याला मान देता, तेव्हा तो तुम्हाला मान देतो, मात्र, तुम्ही त्याला मान देत नाही, तेव्हा तो माणूसही कधीतरी मोठा होत असतो. तेव्हाची स्थिती खूप वेगळी असते. त्याचे पडसादही खूप वेगळे असतात. ते प्रत्येकाने राज्याच्या राजकारणात पाहिले.’’
मिलिंद फडे यांना जीवनगौरव
मिलिंद फडे यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. तसेच विविध क्षेत्रातील प्रकाश पारख, तरुण उद्योजक अजय मेहता, सामाजिक कार्यकर्ते आर. के. लुंकड, महिला उद्योजक सोनल बरमेचा, व्यावसायिक वर्धमान जैन, सुभाष परमार आदींना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.