ध्यान साधना मूलतः आपल्या स्वभावात
मार्केट यार्ड, ता. ४ : ध्यान साधना ही मूलतः आपल्या स्वभावात असते. त्यासाठी वेगळे कष्ट घेण्याची गरज नसते. शरीर ईश्वराची रचना आहे. जेव्हा आपण ध्यान, योग करतो तेव्हा आपल्या शरीरात उर्जा निर्माण होत असल्याचे, मत बाबा रामदेव यांनी व्यक्त केले. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी म्हणून पुणे जीतो चॅप्टरने जितो स्पोर्टस्च्या माध्यमातून योगसाधना कार्यक्रम आयोजित केला होता. या वेळी ते बोलत होते.
पुण्यातील तळजाई टेकडी येथील (ता. ४ जून) स. दू. शिंदे मैदानावर पहाटे ५ ते ९ वाजेपर्यंत कार्यक्रमात विविध प्रकारच्या योगांचे प्रात्यक्षिक रामदेवबाबा यांनी दाखविले. तसेच हजारो नागरिकांनी बाबा रामदेव यांच्यासोबत योगसाधना-प्राणायाम करण्याचा अनुभव घेतला. आपले स्वास्थ उत्तम आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी योगसाधनेचे महत्त्व या वेळी बाबा रामदेव यांनी सांगितले.
जितो श्रमन आरोग्यमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विजय भंडारी, जितो ॲपक्सचे उपाध्यक्ष कांतिलाल ओसवाल, जितो स्पोर्टस् ॲपेक्सचे चेअरमन विशाल चोरडिया, जितो पुणे चॅप्टरचे चेअरमन राजेश सांकला, जितो पुणे चॅप्टरचे चिफ सेक्रेटरी चेतन भंडारी, सेक्रेटरी दिनेश ओसवाल, सहसेक्रेटरी संजय डागा, खजिनदार किशोर ओसवाल, डायरेक्टर इन्चार्ज दिलीप जैन, कॉन्व्हेनर कुणाल ओस्तवाल आणि को-कॉन्व्हेनर अमोल कुचेरिया यांच्यासह पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. बाबा रामदेव म्हणाले, ‘अनुलोम विलोम, भ्रमरीसारखे प्राणायाम केल्याने शरीर आजारांपासून मुक्त होते. चंचल व्यक्तींनी शांत वाटण्यासाठी अमूर्त, निराकार गोष्टींशी एकरूप होण्यासाठी अंतर्मुख होऊन प्राणायाम, साधना करावी.’