दिवाळीमुळे खसखसचे भाव तेजीत

दिवाळीमुळे खसखसचे भाव तेजीत

Published on

मार्केट यार्ड, ता. १४ : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर करंजी, सारण, पुरी यांसह विविध वस्तूंमध्ये वापरल्या जाणाऱ्या खसखस, तीळ, ओव्याला मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. खसखसचे भाव तेजीत आहेत. सध्या बाजारात दर्जानुसार खसखस प्रतिकिलो १६०० ते २१००, तीळ १२० ते १७५ रुपये, ओवा २२५ ते ३०० रुपये प्रतिकिलो आहे.
यंदा खसखस पुरवठा कमी आहे. तसेच आयातीचे निर्बंध, हवामानातील अनिश्चितता व साठवणुकीतील तोटे, यामुळे उत्पादन घटले आहे. तिळाच्या बाबतीत काही भागांत पाऊस अनुकूल नसल्याने उत्पादनात काही प्रमाणात घट झाली आहे. परंतु केंद्र सरकार व राज्यांनी तीळ लागवडीला प्रोत्साहन देऊन पुरवठा स्थिर ठेवण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत. ओवा उत्पादित राजस्थान व गुजरात ही राज्ये हंगामानुसार माल पाठवीत आहेत. नव्या आवकेचे प्रमाण हळूहळू वाढण्याची शक्यता असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
सध्या खसखसचे उत्पन्न कमी असल्याने त्याचे भाव तेजीत असून, तीळ आणि ओव्याचे भाव स्थिर आहेत. खसखसच्या उत्पादनासाठी सरकारकडून परवानाप्राप्त उत्पादकांना पट्टे वाटप करण्यात येते. वाटप झालेल्या मर्यादित पट्ट्यांमध्ये खसखसचे उत्पादन करावे लागते. भारतात मध्य प्रदेश आणि त्याला लागून असणाऱ्या सीमाभागात राजस्थान, उत्तर प्रदेशात खसखसचे उत्पादन सेंट्रल ब्युरो नार्कोटिक्सच्या परवानगीने घेतले जाते. या राज्यातील खसखसचे उत्पादन साधारणतः तीन हजार टनांपर्यंत जाते. देशांतर्गत होणारे खसखसचे उत्पादन मागणीच्या तुलनेत अपुरे पडते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर खसखस आयात केली जाते.

जगातील १५ देशांत खसखसचे उत्पादन
जागतिक कायद्याप्रमाणे खसखसचे उत्पादन प्रामुख्याने जगातील १५ देशांत घेतले जाते. खसखसच्या उत्पादनावर ‘आयएनसीबी’चे (international narcotics control board) नियंत्रण आहे. १५ उत्पादित देशांतून खसखस सर्वत्र निर्यात केली जाते. यांचे मध्यवर्ती कार्यालय हे ऑस्ट्रिया येथे आहे. तसेच भारतात दरवर्षी उत्पादन किती घ्यायचे हे सेंट्रल ब्युरो नार्कोटिक्स ठरवते. त्यानुसार भारतात उत्पादन केले जात असल्याची माहिती व्यापारी अजित बोरा यांनी दिली.

दृष्टिक्षेपात
- पांढरी खसखस
भारतात पांढऱ्या खसखसला मोठ्या प्रमाणावर मागणी असते

- निळी खसखस
युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलियासह काही देशांत निळी खसखस बर्गर, ब्रेडवर टाकण्यासाठी वापरली जाते

- पिवळी खसखस
पिवळी खसखस तुर्कीमध्ये क्रिम बनविण्यासाठी वापरली जाते

आरोग्यासाठी फायदेशीर
खसखस, तीळ आणि ओवा या तिन्ही वस्तू आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. खसखसमध्ये कॅल्शिअम, लोह आणि फायबर मुबलक प्रमाणात असून पचन सुधारते. तिळामध्ये प्रथिने, लोह व अँटिऑक्सिडंट्स असल्याने हाडे मजबूत होतात आणि त्वचा तजेलदार राहते. ओवा पचनास मदत करून गॅस, अजीर्ण आणि खोकला दूर करण्यास उपयोगी ठरतो.


मागणीच्या तुलनेत उत्पादन कमी असल्यामुळे देशभरातील बाजारात खसखसचा पुरवठा कमी होत आहे. खसखसच्या आयातीवर निर्बंध असल्याने भाव तेजीत आहेत. दिवाळीमुळे मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
- अजित बोरा, ज्येष्ठ व्यापारी, उपाध्यक्ष, दि पूना मर्चंट्स चेंबर

Marathi News Esakal
www.esakal.com