किरकोळ बाजारात शेवगा ४०० रुपये किलो
मार्केट यार्ड, ता. ५ : पावसामुळे शेवग्याचे मोठे नुकसान झाले आहे. नवीन हंगाम सुरू होण्यास अजून एक महिन्याचा कालावधी आहे. तसेच सध्या बाजारात शेवग्याचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे भावात प्रचंड वाढ झाली आहे. घाऊक बाजारात दहा किलोस २५०० ते ३००० रुपये भाव मिळत आहे; तर किरकोळ बाजारात प्रतिकिलो भाव तब्बल ५०० रुपयांवर पोहोचला आहे.
सध्या बाजारात फक्त आंध्र प्रदेशातून शेवग्याची आवक होत आहे. लांबलेल्या पावसामुळे शेवग्याचा मोहोर गेला असून, शेवटच्या टप्प्यातील उत्पादन वाया गेले आहे. त्यामुळे पुणे विभागातून आवक ठप्प झाली आहे. परिणामी, बाजारात आवक कमी आणि मागणी जास्त असे चित्र असल्याने भाव तेजीत आहेत. शेवगा हा उष्ण असल्याने त्यास उन्हाळ्यात कमी मागणी असते. त्या तुलनेत थंडीमध्ये जास्त मागणी असते. त्यामुळे या काळात शेवग्याला चांगला भाव मिळत असल्याची माहिती प्रकाश ढमढेरे यांनी दिली.
यंदा सततच्या पावसामुळे शेवग्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेवटच्या टप्प्यातील उत्पादन वाया गेले आहे. त्यामुळे सध्या बाजारात स्थानिक विभागातून शेवग्याची आवक जवळपास थांबली आहे; तर शेवग्याचा नवीन हंगाम जानेवारी महिन्यात सुरू होतो. हा हंगाम वर्षभर सुरू असतो. रविवारी बाजारात आंध्र प्रदेशातून ४० किलोंच्या ५० गोण्यांची आवक झाली होती. मागणीच्या तुलनेत आवक अत्यल्प असल्याने भावात वाढ होत आहे. बाजारात प्रतिदहा किलो शेवग्याला ३००० रुपये भाव मिळाल्याची माहिती मार्केट यार्ड अडते असोसिएशनचे माजी अध्यक्ष विलास भुजबळ यांनी दिली.
थंडीमुळे मागणी जास्त आहे. घरगुती खाण्यासाठी गृहिणी शेवगा खरेदी करताना पावकिलो खरेदी करतात. सध्या बाजारात शेवग्याची आवक फारच कमी होत आहे. तसेच दर्जेदार शेवग्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे सध्या पावकिलो शेवग्याला १२५ रुपये भाव आहे. एक किलो शेवग्याची ४०० रुपयांनी विक्री केली जात आहे.
- विलास भुजबळ, माजी अध्यक्ष, अडते असोसिएशन

