बाबा आढाव निधन प्रतिक्रिया अरुण वीर
‘‘कामगारांच्या प्रश्नावर तत्त्वांनी चालणारे व्यक्ती म्हणजे बाबा आढाव. आपल्या घटकांना न्याय मिळावा, यासाठी कायम प्रामाणिकपणे काम करणारे बाबा होते. मार्केट यार्ड येथील कामगार, कष्टकरी वर्ग, रिक्षा चालक, कागद, काच, पत्रा वेचक यांच्यासह गोर गरिबांच्या न्यायासाठी लढणारा कामगार नेता म्हणून त्यांची ख्याती होती. मार्केट वर्गातील सर्व व्यापारी संघटनांना बाबांविषयी मोठा आदर होता. त्यांनी व्यापाऱ्यांच्या न्यायासाठी देखील आंदोलन केले आहे.
- विलास भुजबळ, माजी अध्यक्ष, अडते असोसिएशन
- -----
डॉ. बाबा आढाव यांच्याशी जवळपास चाळीस वर्ष माझे जवळिकीचे संबंध जुळले. चेंबरच्या नात्याने हमाल पंचायतसोबत दर तीन वर्षांनी करार व्हायचा आणि त्या प्रत्येक कराराला बाबा स्वतः उपस्थित राहायचे. हमाल कामगारांविषयी त्यांना असलेला जिव्हाळा अतूट होता. कामगार कष्टकरी वर्गाप्रती निःस्वार्थी वृत्ती, प्रामाणिक नेतृत्व आणि अढळ निष्ठा म्हणजे बाबा आढाव. त्यांची कार्यप्रणाली अद्वितीय होती.
- राजेश शहा, माजी अध्यक्ष, दि पूना मर्चंट्स चेंबर
------
कामगार नेते बाबा आढाव हे कष्टकरी वर्गाचे खरे कैवारी होते. आयुष्यभर त्यांनी श्रमिकांच्या हक्कांसाठी संघर्ष केला, न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरायला कधीही मागेपुढे पाहिले नाही. त्यांचे कार्य एवढे खोलवर रुजले होते, की त्यांनी संपूर्ण जीवनच कष्टकरी कामगारांच्या प्रगतीसाठी वाहून घेतले होते. अनेक आंदोलनांतून, कायद्यांवर ठोस भूमिका घेऊन, संघटनांना बळकटी देऊन, त्यांनी कामगारांना सन्मान, सुरक्षितता आणि अधिकार मिळवून देण्याचा अथक प्रयत्न केला. बाबांच्या जाण्याने कामगार चळवळीसमोर एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
- पोपटलाल ओस्तवाल, माजी अध्यक्ष, दि पूना मर्चंट्स चेंबर

