बासमती तांदळाचे दर तेजीत

बासमती तांदळाचे दर तेजीत

Published on

मार्केट यार्ड, ता. २७ ः नवीन वर्ष आणि रमजानपूर्वी देशांतर्गत बासमती तांदळाच्या मागणीत वाढ झाली आहे. तसेच, इराण, इराक, दुबई आदी देशांकडून निर्यात मागणीत उचल दिसत आहे. गेल्यावर्षीचा जुना स्टॉक जवळपास संपल्याने बाजारात उपलब्धतेची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे विविध प्रकारच्या बासमती तांदळाच्या दरात क्विंटलमागे एक हजार रुपयांची वाढ झाली आहे.

सप्टेंबर महिन्यात हरियाना, पंजाबसह मध्यप्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रात झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. धान भिजल्याने तुकड्याचे प्रमाण वाढले असून, खराब धानाचे प्रमाणही लक्षणीय आहे. परिणामी गुणवत्तापूर्ण बासमतीचे उत्पादन कमी झाले असल्याची माहिती व्यापारी अभय संचेती यांनी दिली.
कृषी खात्याच्या आकडेवारीनुसार, पंजाब हा देशातील बासमती तांदूळ निर्यातीतील सर्वात मोठा वाटा उचलतो. २०२४-२५ या हंगामात देशातील एकूण ६० लाख टन बासमती निर्यातीपैकी पंजाबचा वाटा तब्बल ४० टक्के होता. मात्र, यंदाच्या पूरपरिस्थितीमुळे हा आकडा मोठ्या प्रमाणावर घटला आहे. पंजाबमधील सुमारे सहा लाख एकर क्षेत्रातील खरीप पिके अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झाली आहेत. यात बासमती, गैर-बासमती धानाचा समावेश आहे. गुरदासपूर, पठाणकोट, फाजिल्का, तरणतारण, फिरोजपूर आणि होशियारपूर हे जिल्हे सर्वाधिक प्रभावित झाले असल्याचे तेथील सरकारने सांगितल्याची माहिती मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांनी दिली.

यंदा हरियाना आणि पंजाबमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. भात काढणीच्या हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिके पाण्याखाली गेली होती. त्यामुळे उत्पादनात प्रमाणाबरोबरच दर्जाही घसरला आहे. बासमती तांदूळ हा भारताचा महत्त्वाचा निर्यात घटक असून, त्यावर लाखो शेतकरी आणि ग्राहक अवलंबून आहेत. मागील वर्षाचे साठे संपण्याच्या मार्गावर आहेत. या वर्षीचे कमी उत्पादन ही धोक्याची बाब आहे.
- अभय संचेती, ज्येष्ठ व्यापारी, मार्केट यार्ड

घाऊक बाजारातील दर (क्विंटलमध्ये)

- प्रकार - डिसेंबर २०२४ दर - डिसेंबर २०२५ दर
- बासमती ११२१ - ९५ ते ११० - ११० ते १२५
- बासमती १५०९ - ७५ ते ८५ - ९० ते ११०
- बासमती पारंपरिक (आखा) - १०५ ते १२० - १०५ ते १२०
- बासमती दुबार/ तिबार - ४५ ते ६५ - ५५ ते ७५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com