गुंतवणुकीसाठी पर्यटन प्रमुख उद्योग - आदित्य

aditya-rohit
aditya-rohit

पुणे - ‘‘महाराष्ट्रात किल्ले, मंदिरे, अभयारण्ये, निसर्ग अशी खूप पर्यटनस्थळे आहेत; त्यांची नव्याने उभारणी करताना महाराष्ट्रातील पर्यटन हा गुंतवणुकीसाठी प्रमुख उद्योग राहणार आहे,’’ असे राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी शनिवारी पुण्यात स्पष्ट केले. स्थानिक पातळीवर रोजगार आणि बाजारपेठनिर्मितीच्या उद्देशाने आखलेल्या कर्जत-जामखेडमधील पर्यटन आराखड्याला प्राधान्य देण्याचा शब्दही ठाकरे यांनी दिला.

कर्जत-जामखेड इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट फाउंडेशनचे उद्‌घाटन ठाकरे यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे, आमदार रोहित पवार, अभिनेते मिलिंद गुणाजी, चित्रपटनिर्माते-दिग्दर्शक नागराज मंजुळे, चित्रपटनिर्मात्या दीपशिखा देशमुख या वेळी उपस्थित होते. फाउंडेशनचा लोगो आणि संकेतस्थळाचे लोकार्पण झाले. लेखक अरविंद जगताप यांनी उपस्थितांशी संवाद साधला. 

तटकरे म्हणाल्या, ‘‘आपापल्या मतदारसंघाच्या विकासातून सबंध राज्याला हातभार लागू शकतो, हेच या फाउंडेशनच्या कामातून दिसते.’’ 

‘‘प्रत्येक घटकाला पुढे नेण्यासाठी फाउंडेशनची उभारणी झाली असून, त्यासाठी कर्जत-जामखेड ब्रॅंड करण्याचे नियोजन आहे,’’ असे पवार यांनी सांगितले. गुणाजी, देशमुख आणि मंजुळे यांनीही मनोगत व्यक्त केले.

बुके नेमका कुठे जाणार?
पर्यटनमंत्री म्हणून आदित्य यांचे काम खूप चांगले आहे. त्यातून धडाडी दिसते, असे पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले. मात्र, ठाकरे-तटकरे या आडनावांचा उच्चार करताना कार्यक्रमांत आमचा गोंधळ उडतो आणि ‘बुके’ नेमका ठाकरे की तटकरे यांच्याकडे जाणार? हे कळत नाही, अशी मिस्कील टिप्पणी तटकरे यांनी करतानाच हशा  पिकला.

‘पर्यटन खाते म्हणजे शिक्षा नव्हे’
मंत्रिमंडळ वाटपात पर्यटन खाते मिळालेला मंत्री शिक्षा समजायचा. मात्र, तसे काही नाही. त्यामुळेच मी हे खाते आवर्जून मागून घेतले, असे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले. या खात्यामुळे फिरणे, पाहणे होते, असेही त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com