पर्यटकांची सिंगापूर, थायलंडलाही पसंती

सकाळ वृत्तसेवा
Monday, 4 November 2019

काश्‍मीरकडे पर्यटकांची पाठ ! 
देशाच्या पर्यटनाचे नंदनवन समजल्या जाणाऱ्या जम्मू- काश्‍मीरमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून निर्बंध आहेत. त्यामुळे यंदाच्या सीझनमध्ये पर्यटकांनी काश्‍मीर टाळले आहे. त्याऐवजी देशांतर्गत पर्यटनासाठी राजस्थान, केरळ, हिमाचलला अधिक पसंती मिळत असल्याचे पर्यटन व्यावसायिकांनी सांगितले.

ऑक्‍टोबर, नोव्हेंबर महिन्यात बहरतो पर्यटनाचा सीझन; आसाम, मेघालयामध्येही गर्दी
पुणे - दिवाळीच्या सुट्यांची पर्वणी साधत पर्यटकांची पावले मोठ्या संख्येने घराबाहेर पडत आहेत. देशांतर्गत पर्यटनासाठी केरळ यंदाही फेव्हरेट डेस्टिनेशन ठरत असून, ईशान्य भारतातील मेघालय, आसामलाही आता पसंती मिळत आहे, तर परदेशात जाण्यासाठी सिंगापूर, थायलंड आणि इंडोनेशियाला पर्यटकांची पसंती आहे. 

ऑक्‍टोबर - नोव्हेंबरपासून पर्यटनाचा सीझन बहरतो. या कालावधीत पर्यटनासाठी ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण जास्त असले, तरी आता सर्वच वयोगटातील नागरिक पर्यटनासाठी आवर्जून बाहेर पडत आहेत. कुटुंबासह फिरण्याऐवजी ग्रुप जमवून पर्यटनाला जाण्याचा ट्रेंड सध्या लोकप्रिय झाला आहे. महाराष्ट्रात यंदा पाऊस जास्त झाला, तरी त्याचा कोकण - गोवा वगळता कोठेही परिणाम झालेला नाही. पर्यटकांनी सुमारे दोन - तीन महिन्यांपूर्वीच प्रवासाचे बेत निश्‍चित केलेले असल्यामुळे त्यांना आरक्षण, प्रवासाची तिकिटे आदींच्या समस्या उद्‌भवत नसल्याचेही दिसून आले.

देशांतर्गत पर्यटनासाठी केरळ हे कायमच पर्यटकांच्या आवडीचे ठिकाण आहे, तर त्या पाठोपाठ अंदमान -निकोबार, सिमला, राजस्थान, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेशमधील सांची तसेच आसाम, मेघालय आदींसाठी पसंतीक्रम आहे.
या बाबत भाग्यश्री ट्रॅव्हल्सचे विवेक गोळे म्हणाले, ‘‘केरळमधील वातावरण या काळात अतिशय आल्हाददायक आहे. निसर्ग सौंदर्याची एक अविस्मरणीय अनुभूती अनुभवण्यासाठी लोक केरळला प्राधान्य देताना दिसत आहेत. केरळची संस्कृती आणि जीवनमानही पर्यटकांना आवडते.’’

अंदमान- निकोबारच्या सहली आयोजित करणारे नीलेश हॉलिडे ट्रॅव्हल एजन्सीचे कॅप्टन नीलेश गायकवाड म्हणाले, ‘‘स्वातंत्र्यवीर सावरकरांचे आकर्षण भारताच्या सीमेवरील अंदमानबद्दल पर्यटकांना कुतूहल आहे. त्यामुळे तेथे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच देशांतर्गत पर्यटनासाठी सीमेजवळील स्थळांनाही पसंती मिळत आहे.’’

गिरिकंद ट्रॅव्हल एजन्सीचे अखिलेश जोशी म्हणाले, ‘‘आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या फारशा सुट्या नसतात. त्यामुळे जवळचे लोकेशन म्हणून महाबळेश्‍वर, पाचगणी, कासपठार आदी ठिकाणी जातात. भरपूर सुट्या असलेले कर्मचारी कर्नाटक, राजस्थान, केरळ, हिमालच प्रदेशकडेही जातात.’’

‘मॅंगो हॉलिडे’चे मिलिंद बाबर म्हणाले, ‘‘परदेशात पर्यटनासाठी जाणारे बहुतांश पर्यटक हे ग्रुपने जातात, कारण ट्रॅव्हल एजन्सीचे व्यवस्थापन त्यांची सगळी व्यवस्था करतात. त्यामुळे कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही, म्हणून ग्रुपने जाण्याला प्राधान्य वाढत आहे.’’ यूरोप आणि जपानला जाणाऱ्यांचीही संख्या वाढत आहे, असेही त्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tourists also like Singapore Thailand