esakal | Pune : राजीव गांधी प्राणीसंग्रहालय सुरु होण्याची पर्यंटकांना प्रतिक्षा
sakal

बोलून बातमी शोधा

pune

राजीव गांधी प्राणीसंग्रहालय सुरु होण्याची पर्यंटकांना प्रतिक्षा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कात्रज : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले होते. तेव्हापासून कात्रजचे स्व. राजीव गांधी प्राणी संग्रहालय बंद आहे. कात्रजच्या प्राणीसंग्रहालयाला मागील १८ ते १९ महिन्यांपासून कुलुप आहे. पालिकेकडून शहरातील काही उद्याने खुली करण्यात आली आहेत. मात्र, त्या पार्श्वभूमीवर प्राणीसंग्रहालय कधी चालू होणार असा प्रश्न पर्यटकांकडून केला जात आहे. शहरातील पर्यटक उद्याने खुली झाल्याच्या गैरसमजातून प्राणीसंग्रहालयाला भेट देण्यासाठी येत आहेत.

सुटीच्या दिवशीतर गेटसमोर गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळते. मात्र पर्यटकांची निराशा होत आहे. खास करून बच्चे कंपनीचे मुख्य आकर्षण असलेले हे प्राणी संग्रहालय पाहता न आल्याने लहानग्यांचा हिरमोड झाल्याचे पाहायला मिळत आहे. मंदिरे, हॉटेल, उद्याने खुली झाली आहेत. मात्र प्राणीसंग्रहालयाला परवानगी देण्यात आलेली नाही. परंतु, उद्याने ज्या प्रमाणे खुली करण्यात आली त्या पार्श्वभूमीवर कोरोनाचे सर्व नियम पाळून प्राणीसंग्रहालयही खुले करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

मी पिंपरी चिंचवडमधून कुटुंबासह प्राणीसंग्रहलयात आलो होतो. पण, इथे आल्यावर निराशा झाली आहे. उद्यान बंद असून गेटवरील सुरक्षारक्षकाने दिवळीनंतर चालू होणार असल्याचे सांगितले. माहिती नसल्याने आमची फेरी वाया गेली आहे. प्रशासनाने काही नियमांचे बंधन करून लवकर प्राणी संग्रहालय चालू करावे असे वाटते. - नितीन वेल्हाळ, पर्यटक

शासनाने कोणतेही प्राणीसंग्रहालय खुले करण्यासाठी परवानगी दिलेली नाही. जोपर्यंत आदेश येत नाही तोपर्यंत प्राणीसंग्रहालय खुले करण्यात येणार नाही. त्यामुळे लोकांनी उद्याने खुली झाली आहेत असे समजून प्राणी संग्रहालयासमोर गर्दी करु नये - ज्ञानेश्वर मोळक, अतिरिक्त आयुक्त, महापालिका.

loading image
go to top