इंदापूरचे व्यापारी वाट पाहत बसले, पण प्रशासनाने... 

डॉ. संदेश शहा 
Monday, 11 May 2020

इंदापूर शहरात एकही कोरोना रुग्ण नसताना इंदापुरात व्यापाऱ्यांना मात्र दुकाने सुरू करण्यासाठी प्रशासनाने अद्याप परवानगी दिलेली नाही. 

इंदापूर (पुणे) : बारामती शहर कोरोनामुक्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने बारामतीत दुकाने रोटेशन पद्धतीने उघडण्यास परवानगी दिली आहे. मात्र, इंदापूर शहरात एकही कोरोना रुग्ण नसताना इंदापुरात व्यापाऱ्यांना मात्र दुकाने सुरू करण्यासाठी प्रशासनाने अद्याप परवानगी दिलेली नाही. त्यामुळे प्रशासनाच्या दुटप्पी भूमिकेमुळे इंदापुरातील व्यापारी हवालदिल झाले आहेत. 

पोलिसांनी आणखी काय करायचे? वऱ्हाडी नव्हते, मग नवरीचे मामाही झाले...

पुणे शहर व बारामतीमध्ये कोरोनाचा उद्रेक पाहून इंदापूरचा देखील "रेड झोन'मध्ये समावेश करण्यात आला. त्यामुळे शहराचे सर्व अर्थकारण ठप्प झाले. गेल्या 51 दिवसांच्या संचारबंदीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र, आता बारामती कोरोनामुक्त आहे. त्यामुळे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी तेथील दुकाने रोटेशन पद्धतीने सुरू केली. त्यातून बारामतीच्या अर्थकारणाने आता गती घेतली आहे. मात्र, कोरोनामुक्त इंदापुरात अद्याप परवानगी दिलेली नाही. 

कुलकर्णी दांपत्याचा फुटला अश्रूंचा बांध...म्हणाले, "सुप्रिया सुळे यांच्यामुळे...' 

तहसीलदार सोनाली मेटकरी, पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर, नगराध्यक्षा अंकिता शहा, नगरपरिषद मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल व सहकाऱ्यांनी केलेल्या नियोजनास इंदापूरकरांनी प्रतिसाद दिला. त्यातून इंदापूर कोरोनामुक्त राहिले. त्यामुळे व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू करण्याबाबत राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांना साकडे घातले. त्यांनी तहसीलदारांना दुकाने सुरू करण्याचा सूचना केल्या. त्यानुसार तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी आज सकाळी 10 वाजता आदेश काढण्याची तयारी सुरू केली. मात्र, सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत आदेश निघाला नाही. प्रशासनाच्या या दुटप्पी भूमिकेमुळे व्यापारी चिंताक्रांत झाले आहेत. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

यासंदर्भात व्यापारी संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार गुजर म्हणाले, ""सरकारने व्यापाऱ्यांना सहानुभूतिपूर्वक व्यापार सुरू करण्यास परवानगी द्यावी. व्यापारी सर्व अटींचे पालन करून व्यापार करतील.'' नगरसेवक भरत शहा म्हणाले, ""व्यापाऱ्यांना न्याय मिळावा म्हणून माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना व्यापाऱ्यांनी निवेदन पाठवले आहे.'' तहसीलदार सोनाली मेटकरी म्हणाल्या, ""व्यापारी दुकाने रोटेशन पद्धतीने सुरू करण्यासाठी प्रांताधिकाऱ्यांशी संपर्क साधला असून, यासंदर्भात लवकरच आदेश निघेल.''  
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Traders from Indapur waited, but the administration did not allow the shops to open