पारंपरिक शेतीसोबत फलोत्पादन, भरडधान्य आणि भाजीपाला उत्पादनावरही लक्ष केंद्रित करावे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

narendra singh tomar

फलोत्पादन पिकांमधील मूल्यसाखळी क्षमतावृद्धी व संधी या विषयावर पुणे शहरात राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली.

पारंपरिक शेतीसोबत फलोत्पादन, भरडधान्य आणि भाजीपाला उत्पादनावरही लक्ष केंद्रित करावे

पुणे - भारत हा खाद्यान्न उत्पादनात स्वयंपूर्ण झाला आहे. अन्य शेती उत्पादनातही भारत हा पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे भारताला आता फुलशेती, फलोत्पादन आणि भाजीपाला उत्पादनाच्या क्षेत्रातही चांगली संधी आहे. या संधीचा फायदा घेत, शेतकऱ्यांनी पारंपरिक खाद्यान्न शेतीसोबत फलोत्पादन, भरडधान्य आणि भाजीपाला उत्पादनावरही लक्ष केंद्रित केले पाहिजे, अशी अपेक्षा केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी मंगळवारी (ता.१) येथे एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली.

केंद्र सरकार क्लस्टर कार्यक्रम, शेतकरी उत्पादक संघ (एफपीओ), फलोत्पादन मिशनद्वारे लहान शेतकऱ्यांना एकत्रितपणे काम करून, याच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण उत्पादन करण्यासाठी प्रोत्साहन देत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

फलोत्पादन पिकांमधील मूल्यसाखळी क्षमतावृद्धी व संधी या विषयावर पुणे शहरात राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेचे उद्घाटन आज तोमर यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार, फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे सचिव मनोज आहुजा, अतिरिक्त सचिव डॉ.अभिलक्ष लिखी, राज्याच्या कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, केंद्रीय सहसचिव प्रिय रंजन, केंद्रीय फलोत्पादन आयुक्त प्रभात कुमार, राज्याचे कृषी आयुक्त धीरज कुमार आदी उपस्थित होते.

तोमर पुढे म्हणाले, ‘केंद्र सरकार ॲग्री स्टार्टअप, कृषी विमा, बाजारपेठेची उपलब्धता आदी माध्यमांतून शेतकऱ्यांना संपन्न करण्याचे प्रयत्न करत आहे. सुशिक्षित युवकांनी नव्या तंत्राचा वापर करून शेती करावी, यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. याचा परिणाम म्हणून नवी पिढी आधुनिक पद्धतीने शेती करण्याकडे तर शेतकरी नैसर्गिक शेतीकडे आकर्षित होत आहेत. कृषी क्षेत्रात नवे प्रयोग करणाऱ्यांना प्रोत्साहन देऊन देशाला कृषी क्षेत्रातील अग्रणी राष्ट्र बनविता येईल.’

डॉ. अभिलक्ष लिखी यांनी प्रास्ताविक केले. केंद्र सरकारने फलोत्पादन क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारच्यामदतीने उत्तमता केंद्र सुरू केले आहेत. महाराष्ट्रात असे चार केंद्र असल्याचे लिखी यांनी प्रास्तविकात सांगितले. सहसचिव प्रिय रंजन यांनी सादरीकरणाद्वारे भारतातील फलोत्पादनाच्या स्थितीबाबत माहिती दिली. यावेळी तोमर यांच्या हस्ते चांगली कामगिरी करणाऱ्या कृषी क्षेत्रातील नवउद्यमी (स्टार्टअप्स), कृषी उत्पादक संस्था, मूल्य साखळी, बँक प्रतिनिधी आदींचा सत्कार करण्यात आला. यावेळी 'ऑरगॅनिक पॅकेज ऑफ प्रॅक्टिस फॉर हॉर्टीकल्चर क्रॉप्स' आणि 'मिशन ऑरगॅनिक व्हॅल्यू चेन' या दोन पुस्तिकांचे प्रकाशन करण्यात आले.

कृषी उत्पादनांवर आधारित प्रदर्शन

या परिषदेच्या निमित्ताने शेती उत्पादनांवर आधारित एक प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनात सेंद्रिय शेती उत्पादने, कृषी प्रक्रिया उद्योग, शेतीसाठी सौर तंत्रज्ञान, सिंचन क्षेत्रातील तंत्रज्ञान, केंद्र व राज्य शासनाच्या कृषी संबंधित विभागाचे कार्य, फलोत्पादन क्षेत्राशी संबंधित नवोपक्रम, मधमाशी पालन, फलोत्पादन आणि भाजीपाला उत्पादनातील नवे तंत्रज्ञान विषयक स्टॉल्स लावण्यात आलेले आहेत.