मेट्रोच्या कामामुळे कासारवाडीत कोंडी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 नोव्हेंबर 2018

पिंपरी - मेट्रोच्या कामासाठी अधूनमधून बंद असणारा ग्रेड सेपरेटर, चारचाकी वाहन विक्रेत्यांनी रस्त्यावर केलेले अतिक्रमण, सेवारस्त्यावर थांबणाऱ्या खासगी ट्रॅव्हलच्या बस, यामुळे कासारवाडी परिसरातील वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. वाहतूक पोलिस आणि महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे कोंडीत दररोज भर पडत आहे. 

गेल्या आठवड्यापासून महामेट्राने नाशिक फाटा परिसरात खांबाच्या उभारणीला सुरवात केली आहे. या रस्त्यावर तीन ठिकाणी खोदाईचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे येथील वाहतूक विस्कळित झाली आहे. पुण्याहून पिंपरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर चारचाकी वाहनांचे विक्रेते आपल्याकडे विक्रीसाठी आलेल्या गाड्या भर रस्त्यातच उभ्या करतात. कासारवाडी चौकापासून ते शंकरवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर ही परिस्थिती आहे. त्यामुळे मुख्य रस्ता अरुंद झाला असून, वाहनचालकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. सेवारस्त्यावर खासगी बस प्रवासी घेण्यासाठी थांबतात. त्यामुळे या रस्त्यावर कायम वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. याखेरीज याच रस्त्यावर गाड्या दुरुस्ती करण्याची दुकाने असून, तिथे भर रस्त्यावर गाड्यांच्या दुरुस्तीची कामे सुरू असतात. त्याचा फटका सेवारस्त्यावरील वाहतुकीला बसत आहे. सेवारस्ता पूर्णपणे उखडला असून, तिथून गाडी चालवणे दिवसेंदिवस कठीण होत चालल्यामुळे वाहनचालक हैराण झाले आहेत.

अतिक्रमणांवर कारवाई हवी
कासारवाडी परिसरातील सेवारस्त्यालगत झालेल्या अतिक्रमणांवर महापालिकेने कारवाई करण्याची आवश्‍यकता आहे. मात्र, प्रशासन त्याकडे काणाडोळा करत आहे. सतत होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी या रस्त्यावर ट्रॅफिक वॉर्डन आणि वाहतूक पोलिस असणे आवश्‍यक आहे. मात्र, वाहतूक पोलिस या ठिकाणी नसतात. त्यामुळे कोंडीची समस्या गंभीर बनत चालली असल्याची कैफियत या परिसरातील नागरिकांनी मांडली.

Web Title: traffic jam in karsarwadi Due to Metro work